Maharashtra Politics Live Update : विधानपरिषदेसाठी भाजपकडून ११ उमेदवारांची नावे जाहीर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : मध्यरात्री मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मागे, यासह रविवारी दिनांक ३१ मे रोजीच्या राज्यसह देशभरातील राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

विधानपरिषदेसाठी भाजपकडून ११ उमेदवारांची नावे जाहीर

राज्यातील विधानपरिषदेच्या 17 जागांवर निवडणुका होणार असून भाजपला ११, शिंदेंच्या शिवसेनेला ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागा गेल्या आहेत. आता या निवडणुकीसाठी भाजपने ११ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. या यादीत २४ तासांच्या आधी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचाही समावेश आहे.

देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांना छत्रपती संभाजीनगर - जालना विधान परिषदेसाठी उमेदवारी

छत्रपती संभाजीनगर - जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक - 2026 साठी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून (माजी जिल्हा परिषद अध्यक्षा) सौ. देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांची घोषणा करण्यात आलीय.

भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशीही विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशीही सायंकाळी वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून भंडाऱ्याचा तापमान ४५ अंश डिग्री सेल्सिअस वर पोहोचल्याने प्रचंड उघडा निर्माण झाला होता. या उकळ्यामुळे नागरिकांसह पाळीव जनावर आणि पशुपक्षीही हैराण झाले होते. आज सायंकाळच्या सुमारास आलेल्या या मान्सूनपूर्व पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

नाशिक विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, येवल्यातील नरेंद्र दराडे यांचे नाव जाहीर

विधान परिषदेची नाशिकची जागा शिंदे सेनेला सुटल्यावर त्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर या जागेवर येवल्यातील नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या पूर्वी दराडे हे शिवसेना (उद्धव ठाकरे) कडून निवडून आले होते. यावेळी आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी या अंजुम कांदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, विजय करंजकर अशा पदाधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा होत असताना शेवटच्या क्षणी माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाली आहे.

सांगली - सातारा विधानपरिषद निवडणूकीत शिवसेनेकडुन उमेदवारी नाही - मंत्री उदय सामंतांचे स्पष्टीकरण

सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी कोणाला दिली नाही, अशी भूमिका उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली आहे. तानाजी पाटील यांनी आमच्याशी कोणत्या प्रकारची चर्चा न करता हा अर्ज भरला आहे. शिवसेनेने अर्ज भरायला सांगितलं नव्हतं. मात्र ते उमेदवारी अर्ज माघार घेतील, असा विश्वास असल्याचं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

१ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. यामुळे कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी.

* शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये

* ⁠विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा सर्वांनाच सुखद धक्का

कोकण दौऱ्यावर असलेल्या मंत्री सरनाईक यांनी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर बसस्थानकाला भेट दिली. नव्याने उभारलेल्या या आधुनिक बसस्थानकात संध्याकाळीही प्रवाशांची मोठी वर्दळ होती. बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि उपलब्ध सुविधांबाबत आपुलकीने चौकशी केली. यावेळी त्यांनी बसस्थानकातील प्रसाधनगृहे, हिरकणी कक्ष आणि इतर प्रवासी सुविधांची पाहणी करून स्वच्छता व व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. तसेच प्रवाशांसोबत बसून एसटीच्या कॅन्टीनमधील गरमागरम वडापाव आणि कॉफीचा आस्वाद घेत सर्वांनाच सुखद धक्का दिला.

विषारी दारू मृत्यू प्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

पुणे व पिंपरी-चिंचवड विषारी दारू मृत्यू प्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि औद्योगिक अल्कोहोल (मिथेनॉल) वितरणावर कडक नियंत्रणाबाबतची मागणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मान्सूनचे १० जूनपूर्वी राज्यात आगमनाची शक्यता धूसर

राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून १ जूनपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत मान्सून च्या आगमनाची शक्यता नाही. कोकणासह प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अनिकेत तटकरे उद्या कोकण विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार

महायुतीत कोकण (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार हे आता निश्चित झाले आहे, त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे उद्या उमेदवार भरणार असल्याची माहिती आहे.

अकलूजमधील दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाचा छापा; पामतेलाचा साठा आढळला

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील दूध संकलन केंद्रावार छापा टाकला आहे. या दूध संकलन केंद्रात ९९७ किलो पामतेलाचा साठा आढळून आला आहे. ह्या तेलसाठ्याचा उपयोग दूध भेसळीसाठी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने घेतली उदय सामंतांची भेट

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यावेळी सामंत यांनी सीमावर्ती भागातील मराठा बांधवांना आम्हाला आत्मीयता आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आचारसंहिता संपल्यानंतर एकीकरण समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

आमच्या नेत्यांच्या आदेशाचे पालन करणं आमचं कर्तव्य : भरत गोगावलेंचं मोठं विधान

महेंद्र दळवींनी रायगडची जागा भाजपला देऊ;पण राष्ट्रवादीला देणार नाही, असे स्पष्ट केले आहे, यावर भरत गोगावले म्हणाले, असं काही नाही. भाजपने रायगड आम्हाला नको, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या नेत्यांकडून काय आदेश येतो, त्याचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांच्याशी चर्चा करू.

विषारी दारूप्रकरणी दापोडीचे पीआय प्रदीप पाटील यांची उचलबांगडी; चौघे निलंबित

पुणे, पिंपरी चिंचवड येथील विषारी दारूप्रकरणी दापोडी पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पीआय प्रदीप पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या पोलिस ठाण्यातील चौघांचे यापूर्वीच निलंबन करण्यात आले आहे. आता पाटील यांची बदली करण्यात आली आहे.

आचार संहितेमुळे चौंडीत विकास कामांचे भूमिपूजन केले नाही : मुख्यमंत्री

चौंडी येथे जे निर्णय घेतले आहेत, ती सर्व कामे सरकारने पूर्ण केली आहेत. चौंडीचा विकास आराखडा मंजूर झालेला आहे. प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. विधान परिषदेची आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला त्याचे भूमिपूजन करता आले नाही. आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही त्याचे भूमिपूजन करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

Jalgaon News : बहुजन मुक्ती पार्टीचे इंधन दरवाढ विरोधात देशभर 'धक्का मारो' आंदोलन

पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात तसेच स्मार्ट मीटरच्या नावाखाली होणाऱ्या कथित जनतेच्या लुटीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीतर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर 'धक्का मारो' मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रातील अन् राज्यातील जनविरोधी धोरणांचा निषेधासाठी देशव्यापी आंदोलन आयोजित करण्यात आला होते.

Jalna Accident : अंतरवाली सराटीहून परतीना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर अंतरवाली सराटीहून परतीच्या प्रवासा दरम्यान इंदापूर इथले मराठा बांधवाचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. बीड मधील मराठा समन्वयकांनी जखमींच्या उपचाराची जबाबदारी घेतली आहे.

MLC Election : विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून डाॅ. विवेक नावंदर यांना उमेदवारी जाहीर

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून डाॅ. विवेक नावंदर यांनी उमेदवारी जाहीर झाली आहे. आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करून डाॅ. नावंदर यांची उमेदवारीची घोषणा केली. डॉ. नावंदर परभणी शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे शहरप्रमुख आहेत.

Neelam Gorhe : विषारी दारूकांडमध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबीयांच्या वारसांना नोकरी मिळणे खूप महत्वाचे; नीलम गोऱ्हे

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये फुगेवाडी मधल्या मृतांच्या नातेवाईकांच सांत्वन केले. या प्रकरणातील सर्वच दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. कारवाई करून ही पुन्हा दारू विक्री सुरू होते, ही गंभीर बाब आहे, असे गोऱ्हे यांनी म्हटले. मृतांच्या नातेवाईकांना नोकरी मिळणे खूप महत्वाचे असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं.

Ramdas Athawale : अवैध हातभट्टी दारू विक्री कायमस्वरूपी बंद करायला हवी; रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पुण्यातील पिंपरी-चिंचवड इथं विषारी दारूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केलं. हातभट्टी दारू कायम स्वरुपी बंद करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केलं. पोलिस कारवाई करतात. मात्र पुन्हा काही दिवसांनी दारू विक्री सुरू होते. ती कायम स्वरुपी बंद होणे गरजेचे असल्याचं ते म्हणाले.

MLC Election Ahilyanagar : उमेदवारी अर्ज भरण्याचा अजून पक्षाकडून आदेश नाही; प्राजक्त तनपुरे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त पुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून आता लक्ष लागले आहे, ते त्यांच्या विधान परिषद निवडणूक भूमिकेकडे! आता विधान परिषद निवडणूक अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. प्राजक्त पुरे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उत्सुकता लागली आहे. परंतु त्यांनी पक्षाकडून अजून कोणताही आदेश आलेला नाही, आदेश आल्यानंतर पाहू, अशी भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे.

Hingoli Accident : अपघातात जिल्हा परिषदेमधील दोन शिक्षकांचा मृत्यू

हिंगोली रिसोड राज्यमार्गावर दोन शिक्षकांचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत दोन्ही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे. सेनगाव शहराच्या जवळ हा अपघात झाला. गजानन पत्की व संतोष देसाई, अशी अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. ही दोघेही जण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू होते.

Sindhudurg Politics : सिंधुदुर्गच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा सामना..

सिंधुदुर्गच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. आमदार निलेश राणे यांनी पोलिस अधिक्षक मोहन दहिकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत दोन ते अडीच कोटी रूपये महिन्याला हप्ते वसूली होते असा आरोप केला होता. निलेश राणेंच्या या आरोपांवरून माजी आमदार वैभव नाईक यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभव नाईक यांना इशारा दिला आहे. निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल, ड्रग्स आणि गांजा मुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत असून, त्याला गालबोट लावण्याची हिमंत वैभव नाईक यांनी करू नये, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.

लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत. आता पात्र महिलांची संख्या 1 कोटी 66 लाखांवर आली आहे. 

अनिकेत तटकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट 

विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रायगडच्य जागेवरून रस्सीखेच सुरू होती. अखेर ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार सुनील तटकरे यांचे पुत्रे अनिकेत तटकरे हे येथून उमेदवार असतील. आपली उमेदवारी पक्की झाल्यानंतर अनिकेत तटकरे आपले वडील सुनील तटकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.

मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल

मनोज जरांगे पाटील हे संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले आहेत. काल ते उपोषणाला बसले होते. मध्यरात्री सरकारच्या मध्यस्थीनंतर त्यांनी उपोषण सोडले. दरम्यान, त्यांची तब्ब्येत खालवल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव, नाशिक दोन्ही जागा भाजपकडेच? आज दुपारी घोषणा होण्याची शक्यता

विधान परिषद निवडणुकीतील 17 जागावाटपांचा निर्णय आज दुपारी जाहीर होणार आहे. यामध्ये प्रतिष्ठेच्या जळगाव आणि नाशिक या दोन्ही जागा भाजपने आपल्याकडेच ठेवल्या आहेत. त्यात कोणताही बदल होणार नाही, असे संकेत देण्यात आलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दोन्ही जागांचे निर्णय गिरीश महाजन यांच्यावर सोपविला होत आहे. आज दुपारी या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा होऊन घोषणा होऊ शकते. त्यात भाजपने नाशिक आणि जळगाव आपल्याकडेच ठेवण्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे.

सरकारची तत्परता नव्हे तर लाचारी - लक्ष्मण हाके

मनोज जरांगेंचं उपोषण कोणाचं तरी पॉलिटिकल कोअर सेट करण्यासाठीचं नियोजित आंदोलन होतं. जरांगे उन्हात बसले म्हणून या शासनाने ही तत्परता दाखवली. ही शासनाची तत्परता नव्हती, तर ती त्यांची लाचारी बघायला मिळाली, अशा शब्दात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सरकारवर टीका केली आहे.

मनोज जरांगेंची तब्येत खालावली

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. त्यानंतर आता जरांगे यांची तब्येत खालावली आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटीला येण्यापूर्वी जरांगेंना उलट्यांचा त्रास होता. त्यानंतर आता संभाजीनगरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हवामान विभागाकडून मुंबईत पुढील 3 तासांसाठी यलो अलर्ट जारी

हवामान विभागाकडून पुढील 3 तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि हलक्या पावसाची दाट शक्यता आहे. मुंबई आणि पालघरमध्ये पाऊस कोळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

अखेर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण घेतलं मागे

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेलं उपोषण काल मध्यरात्री अखेर स्थगित केलं आहे. मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्यानंतर जरांगेंनी मध्यरात्री 1.15 वाजता उपोषण मागे घेतलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com