Maharashtra News Update : दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 13 April: महाराष्ट्रातील सर्व राजकीय व प्रशासकीय घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर.
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणी आरोपीला सेवेतून बडतर्फ करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी 

पुणे : पुण्यातील ‘बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया’त पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थिनीने सहाय्यक संचालकाच्या लैंगिक छळ आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी आरोपी डॉ. ए. बिन्नियमिन (५०) याला नुकतीच अटक केली आहे.

dharashiv Shivsena : धाराशिव जिल्हयातील शिवसैनिकांची नाराजी उफाळली

धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर निवडणुकीत झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवला. सोलापुरात धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. या सर्व नेत्यांच्या समोरच धाराशिव येथील पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीदरम्यान शिवसैनिकांनी निवडणुकीतील घडामोडींवर चर्चा करत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी भाजपच्या दावणीला शिवसेना बांधल्याचा आरोप करण्यात आल्याने खासदार श्रीकांत शिंदे भडकले होते. धाराशिव जिल्हयातील शिवसैनिकांची नाराजी उफाळली आली होती.

Pratibha Chakankar : एक रुपयांचा व्यवहारदेखील केला नाही

अहिल्यानगर : नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलीस ठाण्यात तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांचा आणि मुलगा चिन्मय याचाही जबाब नोंदवण्यात आला. समता संस्थेमध्ये आपल्या नावावर असलेले खाते हे बनावट असून आपण त्यावर एक रुपयांचा व्यवहारदेखील केला नाही, त्यातील सर्व सह्या बनावट असल्याचा दावा प्रतिभा चाकणकरांनी केला.

Shrikant Shinde : आदेशानेच संपर्कप्रमुख नेमण्यात आले

धाराशिवमध्ये रविवारी घडलेल्या प्रसंगाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती आहे. तिथे काल काय घडलं, कसं घडलं हा सर्व आमच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. आम्ही बसून तो नक्कीच सोडवू, असे उत्तर श्रीकांत शिंदे यांनी दिले. सोलापूर, धाराशिव आणि माढा या लोकसभा मतदारसंघांचा आढावा आम्ही या बैठकीत घेतोय, एकनाथ शिंदेंच्या आदेशाने संपर्कप्रमुख नेमण्यात आलेले आहेत, असेही श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

मनपा भूखंड अतिक्रमणावरून भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष

जळगाव शहरा लगत असलेल्या मोहाडी शिवारातील मनपा भूखंड अतिक्रमणावरून मनपा महापौर दीपमाला काळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला उप प्रदेशाध्यक्ष प्रतिभा शिंदे एकमेकांना आव्हान देत असल्याचं पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष पाहायला मिळत आहे. मनपा भूखंडावर काही आदिवासींनी अतिक्रमण केले असून ते बेकायदेशीर असल्याचा दावा महापौर दीपमाला काळे यांनी केला आहे. तर ते काढण्यावर काळे ठाम आहेत. तर ते कोणत्याही परिस्थितीत काढले जाणार असल्याचा इशारा त्यांनी अतिक्रमण धारकांसह अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिंदे यांना दिला आहे.

केंद्र सरकारच्या बँकिंग सुधारणा कायद्याचा दिग्गजांना फटका

केंद्र सरकारच्या बँकिंग सुधारणा अधिनियम 2025 नुसार सलग दहा वर्षे जिल्हा बँकेचे संचालक राहिले त्यांना आता निवडणूक लढवता येणार नाही. याचा फटका दिग्गजांना बसणार आहे. जिल्हा बँक ताब्यात असेल तर कुठलीही निवडणूक जिंकता येते, याची खात्री आणि अनुभव असलेल्या नेत्यांनी यावर आपल्या वारदारांना संचालक मंडळात पाठवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

अमरावतीतही 180 तरुणींचे लैंगिक शोषण, 350 व्हिडिओ व्हायरल? भाजप खासदाराच्या गंभीर आरोपाने खळबळ

अमरावतीच्या परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर नावाच्या युवकाने 180 तरुणींचे लैंगिक शोषण करून 350 व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. तसेच त्यांनी या तरूणाने तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून ब्लॅकमेल करून इच्छा नसतानाही लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोप केला आहे. तर याप्रकरणी तात्काळ पोलिसांनी एसआयटी स्थापन करावी, संध्याकाळपर्यंत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक करावी अशी मागणी केली आहे. तर ही मागणी मान्य न झाल्यास बुधवारी एसपी कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा बोंडेंनी दिला आहे.

आगामी तीन वर्षात शिंदेंची सेना भाजपला तोडीस तोड पक्ष संघटन उभ करणार : श्रीकांत शिंदे

श्रीकांत शिंदे यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांना आगामी तीन वर्षासाठी कार्यक्रम दिला असल्याचे सांगितलं जात आहे. ज्या पद्धतीने भाजपने बूथ लेवल रचना पक्षामध्ये अस्तित्वात आहे. भाजपने प्रत्येक ग्रुपला एका पदाधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. त्याच पद्धतीने शिवसेनेचे देखील बूथ लेवल ला पदाधिकारी नेमण्याची योजना आहे.

खासदार संजय जाधव यांच्या पक्षांतराच्या चर्चेला हवा...

खासदार रामराव वडकुते यांच्याकडे दूरदृष्टी होती, म्हणून त्यांना आधी सुचले. मला जरा उशीराने सुचले अन् आता बंडू जाधव यांना सुचलं, अशी जोरदार फटकेबाजी करत माजी आमदार सुरेश वरपडूकर यांनी खासदार संजय जाधव यांच्या पक्षांतराच्या चर्चेला हवा दिली. राज्यसभेवर भाजपकडून संधी मिळालेल्या खासदार रामराव वडकुते यांचा सत्कार काल पक्षाच्या वतीने करण्यात आला.

तळोदा तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ एकाच रात्री 6 शेळ्या ठार...

तळोदा तालुक्यातील रेवानगर येथे पहाटे बिबट्याने केलेल्या भीषण हल्ल्यात एकाच गोठ्यातील ६ शेळ्या ठार झाल्या. या घटनेमुळे पशुपालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात घबराट पसरली आहे.वसंत बुध्या पावरा यांच्या घराशेजारील गोठ्यात बिबट्याने शिरकाव केला. बिबट्याने एकामागून एक सहा शेळ्यांचा फडशा पाडला.

जमिनीच्या वादातून शेतकऱ्याची हत्या; बाप-लेक-नातवावर गुन्हा दाखल,

बीडच्या गेवराई तालुक्यातून एक थरारक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. जमिनीच्या किरकोळ वादातून ५७ वर्षीय शेतकऱ्याची हत्या करण्यात आली आहे. तर या प्रकरणात एकाच कुटुंबातील बाप, मुलगा आणि नातवावर गुन्हा दाखल झाला असून मयत अर्जुन माळी यांची काठ्या आणि दगडांनी निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाची शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू

रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांनी आपल्या मुलासह शिर्डी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावली आहे. अशोक खरात नॉमिनी असलेल्या १३२ खात्याच्या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावावर चार खाती असून त्यातील दोन खाती प्रतिभा चाकणकर आणि दोन त्यांच्या मुलाच्या नावावर आहेत. त्यांच्या खात्यातून दोन कोटी ४० लाखांचा व्यवहार झालेला आहे, त्या प्रकरणी चाकणकर यांची चौकशी करण्यात येत आहे.

मुंबै बॅंक ही मुंबईकरांची शिखर बॅंक : प्रवीण दरेकर

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही मुंबईकरांसाठी शिखर बॅंक आहे. सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी सहकार्य मुंबै बॅंकेच्या माध्यमातून होईल, असे बॅंकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले. मुंबईतील गांधीनगर येथे म्हाडाजवळ मुंबै बॅंकेच्या शाखेचे उद्‌घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले.

रांजणगाव गणपतीचे मंदिर साडेतीन महिने बंद राहणार

रांजणगाव गणपतीचे मंदिर १५ एप्रिल ते ३१ जुलै या साडेतीन महिन्यांच्या काळात भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. मंदिराच्या गाभ्याचे संवर्धन आणि इतर कामांसाठी हे मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि रांजणगावचे ग्रामस्थ यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

रोहित पवारने आता राजकारणात कसं टिकावं, याची काळजी घ्यावी : गोपीचंद पडळकर

आमदार रोहित पवारने राजकारणात कस टिकावं, याची काळजी केली तर बरं होईल. कारण रोहितचा जीव आणि त्याची पार्टी खूप छोटी झालेली आहे. कर्जत-जामखेडच्या लोकांनी रोहित पवाराची शिकार करू नये याची काळजी त्याने घ्यावी, बाकीच्यांना त्याने सल्ले देऊ नयेत, असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला.

नाशिकमधील 49  बिल्डरांच्या कारनाम्याची चौकशी करण्यासाठी एसआयटीची घोषणा

गृहप्रकल्पाचे क्षेत्र कमी दाखवून सरकारची फसवूणक करणाऱ्या नाशिकमधील ४९ बिल्डरच्या कारनाम्याची चौकशी करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एसआयटीची स्थापना केली आहे. नियम डावलून संबंधित बिल्डरांनी सरकारची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. त्याची चौकशी करण्यासाठी सरकारी पातळीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे

सोलापूर डीपीसीची निवडणूक तब्बल 9 वर्षांनंतर होणार

सोलापूर जिल्हा नियोजन समितीची यापूर्वी २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद/नगरपंचायतींची २०२१-२०२२ मध्ये मुदत संपल्याने डीपीसीवरील नियुक्त्याही संपुष्टात आल्या होत्या. आता जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद/नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्याने डीपीसीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

अशोक खरातवर ED ची धडक कारवाई

अशोक खरात यांच्यावर ED ने PMLA अंतर्गत नाशिक, पुणे व शिर्डीत 11 ठिकाणी छापे टाकले. खंडणी, धार्मिक फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराचे आरोप समोर आले आहेत. बोगस खात्यांद्वारे पैशांची उकळपट्टी करून ती रक्कम जमिनीत गुंतवल्याचा संशय असून, तपासात महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat case : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी

नाशिमधील भोंदू अशोक खरातला आज कोर्टाने सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याची पोलीस कोठडी आज संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. उद्याही खरात अन्य एका गुन्ह्यात न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून केली जाऊ शकते.

Ravindra Chavan : समुद्रकिनाऱ्यांवर इको-टॉयलेट विथ बायो डायजेस्टर

रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांच्या सोयी-सुविधांचा विचार केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर इको-टॉयलेट विथ बायो डायजेस्टर आणि चेंजिंग रूम्सची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी सुरुवातीला १ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. त्यानंतर या विकासाला अधिक गती देण्यासाठी आता ४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली.

गोकुळ दूध संघात गैरव्यवहाराचा आरोप; ईडी चौकशीची मागणी 

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार शिवाजीराव पाटील यांनी केला आहे. या प्रकरणाची 'ईडी' मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. ३७०० नव्या संस्थांच्या नोंदणीवरही संशय व्यक्त करत प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात आली असून, ते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

भोंदू अशोक खरात प्रकरणाची आज महत्त्वाची सुनावणी

भोंदू अशोक खरातच्या प्रकरणात आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. तिसऱ्या गुन्ह्यातील त्याची पोलीस कोठडी संपत असून एसआयटी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करणार आहे. गर्भवती महिलेवरील अत्याचार प्रकरणात तो आतापर्यंत कोठडीत होता. चौथ्या गुन्ह्यासाठी पुन्हा ताबा मिळवण्याचा प्रयत्न होणार आहे. न्यायालयाचा निर्णय काय येतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

'गोकुळ' गैरव्यवहाराची ईडीमार्फत चौकशी करा - आमदार शिवाजी पाटील

गोकुळ दूध संघातील गैरव्यवहाराची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी मागणी केली आहे. एका बड्या मंत्रांच्या आशीर्वादाने गोकुळ मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आमदार पाटील यांचा आरोप. तत्कालीन विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी 3700 नवीन दूध संस्थांच्या नोंदणीला मंजुरी दिली. या मंजुरीची आणि इतर गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची आमदार पाटील यांची मागणी....

प्रतिभा चाकणकर पोलिस ठाण्यात हजर

शिर्डी पोलिस ठाण्यात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर या हजर झाल्या आहेत. त्यांचा पोलिसांकडून जबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. भोंदू अशोक खरात हा समता पतसंस्थेतील 132 खात्यांमध्ये नाॅमिनी आहे. त्यातील चार खाती चाकणकर कुटुंबीयांच्या नावे आहेत. दोन प्रतिभा चाकणकर यांच्या नावार तर दोन त्यांच्याी मुलांच्या नावावर खाती आहेत त्याचा नाॅमिनी अशोक खरात आहेत.

पुणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी

पुणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सभापतींना विषय समित्यांचे वाटप आणि विविध विषय समित्यांच्या सदस्यांच्या निवडीसाठी येत्या गुरुवारी (दि. १६ एप्रिल) जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत सध्या समित्यांविना असलेल्या तीन पदाधिकाऱ्यांना विषय समित्यांचा पदभार देण्यात येणार आहे. प्रत्येकी दोन समित्या अशा एकूण सहा समित्यांचे वाटप केले जाईल. यामध्ये अर्थ व शिक्षण, बांधकाम व आरोग्य, तसेच कृषी व पशुसंवर्धन समित्यांचा समावेश आहे.

‘नारी शक्ती वंदन संमेलना’ला आज मोदींची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘नारी शक्ती वंदन संमेलना’ला उपस्थित राहतील. याप्रसंगी ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

अशोक खरातच्या प्रॉपर्टीची सखोल चौकशी सुरू

अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिर, नाशिकचे कार्यालय आणि वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडी अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. त्यांच्या प्रॉपर्टीची मोजणी आणि सध्याच्या बाजारमूल्याचा तपास करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याचं पार्थिव सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रविवारी त्यांचं ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं होतं 

नाशिकचा भोंदू अशोक खरात याला तिसऱ्या गुन्ह्यात पोलिस कोठडी देण्यात आली होती. ती आज संपणार आहे. खरात विरोधात दाखल महिला लैंगिक अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यात SIT कडून आज पुन्हा खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com