Maharashtra Politics Live Update : अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या अंतरिम महासचिवपदी माजी आयएफएस अधिकारी कृष्ण मोहन यांची नियुक्ती

Marathi Breaking Live Headlines Updates : मुंबईतील मानखुर्दमध्ये मुसळधार पावसामुळे चाळ कोसळली, आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, यासह आज दिवसभरातील पावसासह सर्व महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊया.
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

इयत्ता 11 वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-1 चे सुधारित वेळापत्रक जाहीर

राज्यात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे.या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. याचदरम्यान, इयत्ता 11 वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी 8 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या अंतरिम महासचिवपदी माजी आयएफएस अधिकारी कृष्ण मोहन यांची नियुक्ती

अयोध्येतील राम मंदिर दानपेटीतील देणगी चोरी प्रकरणामुळे देशभरात मोठा वादंग निर्माण झाला आहे. या आर्थिक अपहाराच्या घडामोडींदरम्यानच सोमवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत विद्यमान महासचिव चंपत राय यांचा राजीनामा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मंजूर केला. याचवेळी दुसरे ट्रस्टी अनिल मिश्रा यांचाही राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. यानंतर ट्रस्टच्या अंतरिम महासचिवपदी माजी आयएफएस अधिकारी कृष्ण मोहन यांची नियुक्ती करण्यात आली.

Nashik Rain : सावधगिरी म्हणून नाशिकमधील शाळा बंद करण्याचे निर्देश

Summary

राज्याच्या विविध भागात पावसाचा कहर पहायला मिळत आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळित झाले आहे. अशातच आता नाशिकमध्ये उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. आज नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री आणि महापौर हिमगौरी आडके यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. आयुक्त मनीषा खत्री यांनी म्हटले की, ‘200 मिमीच्या वर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आपल्याकडे ढगफुटीची शक्यता आहे, एका दिवसात जास्त पावसाची शक्यता आहे. आज सायंकाळी 6 वाजेपासून पाऊस सुरू होईल. मध्यरात्री 1 ते 10 पर्यंत अति मुसळधार पाऊस येईल. सकाळी नंतर पाऊस कमी होईल. पण नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाह जास्त असेल. सावधगिरी म्हणून शाळा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई- पुणे मार्गावरील 17 ट्रेन्स रद्द, वाचा संपूर्ण यादी

मुंबई, पुण्यासह घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. या अतिवृष्टीमुळे लोणावळा-कर्जत विभागातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिन दरम्यान भीषण दरड कोसळली आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने मोठा पाऊल उचलले आहे. डेक्कन क्वीन, इंद्रायणी, सिंहगड यांसारख्या महत्त्वाच्या १७ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय ३१ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. १८ गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.

आषाढी वारीच्या निमित्ताने महापौर मंजूषा नागपुरे यांची पाणी कपात मागे घेण्याची घोषणा

आषाढी वारीच्या निमित्तानं महापौर मंजुषा नागपुरे यांची पाणी कपात मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊसही सुरु असल्यानं धरणांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळं सध्यातरी पाण्याचा प्रश्न सुटला असल्याचं चित्र आहे.

पुणे–मुंबई द्रुतगती मार्गासह जुना महामार्ग बंद! मावळ, ताम्हिणीतील पर्यायी मार्गही बंद

पुणे : मुसळधार पाऊस, दरड कोसळण्याच्या घटना आणि पूरसदृश परिस्थितीमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दोन्ही दिशेतील (पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे) वाहतूक थांबविण्यात आली असून, नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय पुणे-मुंबई प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नाशिक शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

- नाशिक शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

- अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेचा निर्णय

- हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुट्टी घोषित

- मनपा क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

- नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आदेश जारी केले

- पुढील ४८ तासांत अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचे परिपत्रकात नमूद

नाशिकमधील शाळा -कॉलेज उद्या बंद 

नाशिकमध्ये उद्या ढगफुटीची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ व दिंडोरी येथील शाळा व कॉलेज बंद राहणार आहे.

Marine Drive Hightide मुंबईत हायटाईडच्या पार्श्वभूमीवर समुद्राला मोठं उधाण

मुंबईत मुसळधार पाऊस आणि हायटाईडच्या पार्श्वभूमीवर समुद्राला मोठं उधाण आलं आहे. उंच लाटा किनाऱ्यावर आदळत असून समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून सुरक्षित अंतर राखण्याचं आणि अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन केलं आहे.

उद्या नाशिक जिल्ह्यातील सर्व पर्यटळस्थळे बंद 

भारतीय हवामान विभागाने मंगळवार दि. 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्याला हाय अलर्ट जारी केला आहे. त्यापार्श्भूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर दरम्यान ढगफुटी होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील सर्व पर्यटनस्थळे उद्या बंद राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर बंद असणार आहे. संप्तशृंगी देवस्थान देखील बंद राहणार असल्याचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. जवळपास ३०० एमएम पाऊस नाशिकमध्ये पडू शकतो.

मुसळधार पाऊस, वेगवान वाऱ्यांमुळे राज्य सतर्क; मुख्यमंत्र्यांचा परिस्थितीचा आढावा

राज्यात सुरू असलेल्या जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा आढावा घेतला. मुंबईत भरतीमुळे पाणी साचण्याचा धोका वाढला असून, वाऱ्यामुळे शेकडो झाडे कोसळली आहेत. दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत असून प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

रेड अलर्टमुळे सिंहगड घाट परिसर दोन दिवस पर्यटकांसाठी बंद

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन सिंहगड घाट परिसरात नागरिक आणि पर्यटकांच्या प्रवेशावर ६ व ७ जुलै रोजी तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव वनविभागाने हा निर्णय घेतला असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इंद्रायणी नदीच्या पुरामुळे आळंदीकडे जाणे टाळा; वारकरी आणि भाविकांना प्रशासनाचे आवाहन

आळंदी परिसरात इंद्रायणी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे नदीवरील सर्व प्रमुख पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शहरात प्रवेश करणे धोकादायक ठरत आहे. प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीकडे प्रवास न करण्याचे आवाहन केले असून, प्रवासात असलेल्यांनी सुरक्षित ठिकाणीच थांबण्याचा सल्ला दिला आहे.

फडणवीसांना सभागृहात दिली पावसाची अपडेट

आज दुपारनंतर प्रचंड वेगाने वारे वाहणार असून अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांनी केले आहे. फडणवीस यांनी सोमवारी सभागृहात निवेदन दिले. यामध्ये त्यांनी पाऊस आणि पूरपरिस्थितीच्यादृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचे सांगितले. नागरिकांनी शक्यतो प्रवास टाळावा. कोणीही अत्यावश्यक कारण असल्याशिवाय प्रवास करु नये. तरुणांनी या काळात पर्यटनासाठी धबधबे किंवा इतर ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले

विधानसभा सभागृहाची आजची बैठक स्थगित

विधानसभा सभागृहाची आजची बैठक अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर11.10 वाजता स्थगित झाली आहे. पुढील बैठक मंगळवार दिनांक 07 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार असल्याची अध्यक्षांनी जाहीर केले

कोकणात येणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या उशिरा धावताहेत

मुंबईवरून कोकणात येणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या उशिरा धावत आहेत. तुतारी एक्सप्रेस दोन तास उशिराने धावत आहे. मंगलरूएक्सप्रेस चार तास, तर कोकण कन्या एक्सप्रेस आणि पुणे एरणाकुलम साडेतीन तास उशिराने धावत आहे.

Pune Rain: इंद्रायणी नदीला पूरस्थितीची गंभीर, अडीशे नागरिक अडकले

इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाणी सातत्याने वाढत असल्याने आळंदी परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 250 नागरिक विविध ठिकाणी अडकले असून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

ट्रक आडवा उभा करून एक्सप्रेस वेवरील वाहतूक बंद

रावेत येथे ट्रक आडवा उभा करून एक्सप्रेस वेवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद.

विधीमंडळाचे कामकाज काही वेळासाठी पुढे ढकलावे : आमदार समीर मेघे

राज्यभरातील पूरपरिस्थिती बघता अनेक आमदार विधिमंडळात वेळेत पोहचू शकणार नाहीत. त्यामुळे आजचे कामकाज काही वेळासाठी पुढे ढकलावे अशी मागणी भाजप आमदार समीर मेघे यांनी केली आहे.

ताथवडे परिसरात घरांमध्ये शिरलं पाणी

पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस सुरू असून ताथवडे परिसरात घरांमध्ये पाणी शिरलं आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

अलिबाग- रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली आहे. ताम्हिणी घाट खचल्याने वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

मिसिंग लिंकवर दरड कोसळली,  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक बंद!

मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक दुसरीकडे वळवण्यात आली आहे. या घटनेमुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई प्रवास करू नये - MSRDC चं आवाहन

MSRDC ने एक्सवर पोस्ट करत नागरिकांना आवाहन केलं आहे. "दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे.

पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा. नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती", असं म्हणत प्रवास टाळण्याचं आवाहन MSRDC कडून करण्यात आलं आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

राज्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पार्श्वभीमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबईला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड,मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरारमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालयांना प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईतील मानखुर्दमध्ये मुसळधार पावसामुळे चाळ कोसळली, आठ जणांचा मृत्यू

मागील चार दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच आता मुंबईतील मानखुर्दमध्ये दु:खद दुर्घटना घडली आहे. तीन मजली चाळीचा भाग मुसळधार पावसामुळे कोसळल्याने 6 लहान मुलं, एका महिलेसह 8 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून आणखी काही लोक जण ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com