

मराठा समाजाच्या नेत्यांना आवाहन करताना मनोज जरांगे पाटील भावूक झाले. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या लढ्याचा उल्लेख करताना त्यांच्या भावनांचा बांध फुटला. 'तुम्हाला मराठ्यांच्या लेकरांची काळजी नाही का? आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय.', असा जरांगेंनी थेट आरोप केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान त्यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय जाहीर केला. सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने आता मुंबईत जाऊन आंदोलन करण्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. आझाद मैदानावर आंदोलन करण्याची त्यांची तयारी असून, यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील लोकांना प्रश्न विचारला आहे की, तुमच्यासाठी समाजातील सोन्यासारखी लेकरं महत्त्वाची आहेत की राजकीय पक्ष आणि नेते मोठे आहेत. आज आपल्या समाजातील तरुण मुले अन्यायाविरुद्ध लढत आहेत, परंतु समाज मात्र राजकीय पक्ष आणि नेत्यांचा प्रचार करण्यात व्यस्त आहे. ही अत्यंत खंत व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे. जगभरात ज्या समाजाने स्वतःची ओळख आणि प्रतिष्ठा निर्माण केली, त्या समाजातील लेकरांच्या हातातोंडाशी आलेला आरक्षणाचा घास आज हिरावून घेतला जात आहे.
मी आज तुमच्या लेकरांच्या आणि कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावून लढा देत आहे. त्यामुळे आता समाजाने ठरवायचे आहे की, नक्की कोणाला मोठे करायचे आहे. जर तुम्ही आजही पक्षाचा आणि नेत्याचाच पाठपुरावा करत राहिलात, तर भविष्यात तुमची मुले संकटात सापडतील आणि त्यांचे नुकसान होईल.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुम्ही पक्षाला आणि राजकीय नेत्यांना मोठे करणार आहात की स्वतःच्या मुलाबाळांचे भविष्य सुरक्षित करणार आहात? समाजातील नोकरदार वर्ग, शेतकरी आणि व्यावसायिकांची मुले आज हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. राजकीय नेत्यांची संपत्ती किंवा त्यांची गाडी तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या अडीअडचणीत कामाला येणार नाही.
जेव्हा संकट येईल किंवा आजारपण येईल, तेव्हा स्वतःची मुलेच तुमच्या पाठीशी उभी राहतील. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या मागे धावून स्वतःच्या मुलांच्या भविष्यावर तुळशीपत्र ठेवू नका. इतर लोक प्रगती करत पुढे गेले आहेत, परंतु मराठा समाजातील तरुण आजही मागे राहत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांपेक्षा आधी स्वतःच्या लेकरांचे भविष्य आणि त्यांची प्रतिष्ठा महत्त्वाची मानली पाहिजे.
त्यांनी मराठा समाजातील सर्व राजकीय कार्यकर्त्यांना इशारा देत म्हटले की, जर गावातील किंवा तालुक्यातील नेता गरिबांच्या आणि समाजाच्या मदतीला धावून येत नसेल, तर निवडणुकीच्या काळात अशा नेत्यांना पाडून टाकले पाहिजे. मराठा समाजाने आता आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे आणि स्वतःच्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.