

तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कारभार स्विकारल्यानंतर धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. आज त्यांनी राज्यभरातील ५३ ठिकाणी धाडी टाकून भेसळ करणाऱ्या ३३ जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील पतंजली आयुर्वेदच्या गोडाऊनमध्ये छापेमारी करत तब्बल ७३ लाखांचा बनावट औषधांचा साठा जप्त केला आहे.
देशभरात मोठा चर्चेचा विषय ठरलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेनं दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवरुन आता न्यायालयानं केंद्र सरकार आणि सोशल मीडियाच्या 'X' ला नोटीस बजावली असल्याचं समोर येत आहे. याचवेळी न्यायालयानं दीपके CJP चे 'X' अकाऊंट पुन्हा सुरुवात करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. न्यायालयानं यावेळी या प्रकरणात कोणताही निर्णय घेण्याआधी सरकारची बाजू ऐकणे गरजेचं असल्याचं महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.
राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षण व कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. कारण सरकारच्या शिष्टमंडळाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात अपयश आल्याची माहिती समोर येत आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांचा समावेश असलेल्या सरकारच्या शिष्टमंडळाला जरांगे यांच्यासोबतच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर तोडगा काढता आला नाही. यामुळेच जरांगे पाटील उपोषणाच्या निर्णयावर अद्यापही ठाम असल्याची माहिती समोर येत आहेत.
राज्यातील शेतकरी कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं मेटाकुटीला आला आहे. याचदरम्यान, जुन्नर येथील एका शेतकऱ्यानं तहसीलदारांना पत्र लिहित धक्कादायक मागणी केली आहे. शेतीतील पिकांवर होत असलेला दिवसेंदिवस वाढत जाणारा उत्पादन खर्च आणि कोसळणारा बाजारभाव यामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. याच धर्तीवर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील शेतकरी सुनील उकिर्डे यांनी तहसिलदारांना चक्क गांजाची लागवड करण्याची परवानगी तहसीलदारांना पत्र पाठवत केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळाकडून अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची भेट घेतली. यावेळी राज्यात आत्तापर्यंतच्या सापडलेल्या एकूण नोंदींसह इतर काही मुद्द्यांवरुन मनोज जरांगे आणि विखे पाटील यांच्यात एकमत होऊ शकलं नाही. यावेळी जरांगे पाटलांनी, यानंतर नाही जमणार म्हणत उपोषण करणारच…’ अशी ठाम भूमिका बोलून दाखवली.
राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेच्या भेटीसाठी शुक्रवारी सायंकाळी अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समवेत आमदार प्रसाद लाड आहेत. यावेळी विखे-पाटील यांनी मराठा समाज बांधवाला न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचे स्पष्ट करीत ५८ लाख नोंदीपैकी १२ लाख जणांना प्रमाणपत्र दिले असल्याचे स्पष्ट केले.
परभणी जिल्ह्यात शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळत भाजप कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहरातील शिवाजी महाराज पुतळा परिसरात हे आंदोलन करण्यात आले.
देशभरातील यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा परिणाम दिसून येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार, देशात सरासरीच्या केवळ 90 टक्के पाऊस पडू शकतो. यापूर्वी एप्रिलमध्ये 92 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, बदलत्या हवामान परिस्थितीमुळे हा अंदाज घटवण्यात आला आहे. कमी पावसामुळे शेती आणि पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून, शेतकऱ्यांसमोर यंदा मोठं आव्हान उभं राहू शकतं.
परभणीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात तीव्र आंदोलन करत राहुल गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्यांचे दहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैधरित्या तयार होणारी गावठी विषारी दारू थेट पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पुरवली जात असल्याचा आरोप शिवबा संघटनेने केला आहे. या प्रकरणी गावठी दारूच्या भट्ट्या, वाहतूक आणि संबंधित रॅकेटबाबत पोलिसांकडे वेळोवेळी पुराव्यांसह तक्रारी करण्यात आल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. शिवबा संघटनेचे माऊली घोडे यांनी, “विषारी दारूने भरलेल्या गाड्या पकडून देऊनही मुख्य आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत." दोन महिन्यांपूर्वीच पोलिसांनी ठोस कारवाई केली असती तर आज 16 जणांचे जीव वाचले असते, असा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे आता पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील तेलगाव इथल्या लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखानासमोर लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर मुकादम व वाहतूक संघटनावतीने कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. कारखान्यात सुमारे महिनाभरापूर्वी बॅगजला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत कारखान्यातील कामगार भीमराव उर्फ बाबासाहेब बारीकराव चोपडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही पायांना गुडघ्याखालून सुमारे 50 टक्के भाजल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित कामगार सध्या कोणतेही काम करू शकत नसल्याचेही आंदोलकांनी सांगितले.
नीट पेपरफुटीमागे भाजपचं नेटवर्क काम करत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. भाजपने निवडणूक आयोग, पोलिस यंत्रणा आणि स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्थांवर नियंत्रण मिळवल्याचा दावाही त्यांनी केला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना भाजपचे किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करत असतात. बकरी ईद आणि कामाख्या देवी संदर्भातील वक्तव्यांचा दाखला देत, महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच कुर्बाण केलं आहे, असा घणाघात सोमय्या यांनी केला.
अंबरनाथ नगरपालिकेत लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन आणि एकनाथ शिंदे शिवसेनाविरुद्ध भाजप, असा नवा वाद उफाळून आला आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि शहर अभियंता कार्यालयात अनुपस्थित असल्याच्या मुद्द्यावरून भाजप नगरसेवकांनी थेट त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत अनोखे आंदोलन केले. शहराला पूर्णवेळ सक्षम अधिकारी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
डिझेल टंचाईविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरात शेतकऱ्यांनी अनोखा निषेध नोंदवला. आरेगाव इथले शेतकरी विनायकराव टाले यांनी कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी असल्याने चक्क ट्रॅक्टर बैलगाडीला बांधून 5 किलोमीटर अंतरावरील डोणगाव इथं पेट्रोल पंपावर नेला. “शेतीची मशागत सुरू आहे, पण डिझेलच मिळत नाही. ट्रॅक्टर उभे आहेत आणि शेतकरी हवालदिल झाला आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसू नये, असे आवाहन अंबड तहसीलदार यांचे मनोज जरांगे यांना केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना उन्हात बसून उपोषण करण्यापासून परावृत करण्याबाबत सहकाऱ्यांना तहसीलदारांनी पत्र दिलं आहे. आरोग्याची आणि जीविताची सुरक्षा राखणे, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे, असेही तहसीलदार यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता तहसीलदारांच्या आवाहनाला जरांगे कसा प्रतिसाद देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षावतीने आज साताऱ्यात पवई नाका परिसरात इंधन दरवाढ, महागाई, शेतकरी कर्जमाफीसाठी असणाऱ्या छत्रपती शिवाजी सर्कल इथं चक्काजाम आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले. या वेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनात उपस्थित होते. बैलगाड्यावरून काही शेतकरी या आंदोलनात उपस्थित झाले होते.
पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील विषारी दारू दुर्घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार, अशी माहिती मावळ लोकसभा क्षेत्राचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कथित विषारी दारूचे मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कठोर कारवाईचे आदेश दिले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांना आदेश देण्यात आले आहे. कोणाचीही गय करू नका. कठोर कारवाई करा, असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या पथकाने नांदेड शहरात पुन्हा एकदा कारवाई केली आहे. सीबीआयने शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 वेगवेगळ्या ठिकाणी 7 ते 8 तास चौकशी केली. पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून 2 विद्यार्थिनी आणि त्यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशी करण्यात आली.
कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयातील विविध कामांचा शुभारंभ आज होत आहे. मात्र, या संदरभात दिलेल्या जाहिरातूमधीन पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचा फोटो गायब असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महायुतीमधील वादातून की प्रशासकीय कारणाने त्यांचा फोटो गायब झाला या विषयी चर्चा सुरू आहे.
गावठी दारु तयार करून त्याची पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात विक्री करणाऱ्या योगेश वानखेडे या संशयिताला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने विक्री केलेल्या दारुमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात मिळून 13 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याने विक्री केलेले दारुचे कॅन देखील पोलिसांनी जप्त केले आहेत.
आनंद परांजपे यांची महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाव देण्यात आले होते. मात्र, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून परांजपे यांना पक्षाच्या कोट्यातून महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्षपद देऊ नये, अशी मागणी केली आहे.
तुम्हाला जाती पातीची फक्त मतं पाहिजेत का शेतकर्यांची नकोयत का ? असा संतप्त सवाल सत्तेत सहभागी असलेल्या रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. आज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी मंत्र्यांचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी जाण्यासाठी रवाना झाले आहे. महसूल मंत्री, मराठा उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, भाजप आमदार प्रसाद लाड, आमदार बच्चू कडू यांचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.