

Aurangabad district Bank : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खासदार संदिपान भुमरे यांनी आपले सुपुत्र आमदार विलास भुमरे यांना चेअरमन करत जिल्ह्याच्या राजकारणात आपले वजन सिद्ध केले आहे. नावातच सत्ता असल्याचे मोठ्या अभिमानाने सांगणाऱ्या सत्तारांची मात्र जादू आता ओसरली आहे, हे आजच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून स्पष्ट झाले. संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेला सुरुवातीची दोन वर्षे अध्यक्षपद देत भाजपने एका दगडात दोन पक्षी मारल्याचे दिसून आले आहे.
नऊ संचालकांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला पहिली दोन वर्षे अध्यक्षपद देत भाजपने त्यांचा सन्मान केल्याचे चित्र उभे केले असले तरी त्यानंतरची अध्यक्षपदाची दोन वर्षे भाजपासाठी महत्त्वाची असणार आहेत. 2029 लोकसभा निवडणुका जाहीर होतील नेमका तोच काळ भाजपने जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी निवडला. यातून भाजपने शिवसेनेचा इगो दुखावणार नाही याची काळजी घेतली तर दुसरीकडे आमदार अब्दुल सत्तार यांनाही रोखले. नुकत्याच झालेल्या महापालिका जिल्हा परिषद आणि छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुकीत भाजपने शिवसेनेला बॅकफूटवर नेले. महापालिकेत भाजपची स्वबळावर सत्ता आहे, तर जिल्हा परिषदेत फक्त एका सदस्य संख्येने कमी असलेल्या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेतील भुमरे-सत्तार या दोन नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून ठिणगी टाकली आणि दोघांच्या भांडणात अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासह विविध विषय समित्यांचे अध्यक्षपदही आपल्याचकडे राखले.
जालना-छत्रपती संभाजी नगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला अडचणीत आणू पाहणाऱ्या अब्दुल सत्तार यांची बंडखोरी भाजपने यशस्वीरित्या मोडीत काढली. भाजप महायुतीचे सुहास शिरसाट मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांचा करेक्ट कार्यक्रम मंत्री अतुल सावे यांनी शिवसेनेच्याच खासदार आणि पालकमंत्र्यांना हाताशी धरून केला. शिवसेनेला पहिली दोन वर्षे अध्यक्षपद देण्याची मागणी मान्य करून संदिपान भुमरे यांना आपल्या मुलाला अध्यक्ष करण्यासाठी पाठिंबा देण्याची खेळी भाजपने खेळली. त्याला शिवसेनेतील सत्तार विरोधक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक अंबादास दानवे यांचीही साथ लाभली.
निवडणूक विधान परिषदेचे असो की, मग महापालिका जिल्हा परिषद, आपल्या राजकीय डावपेसांच्या जोरावर बाजी पलटवण्यात माहीर असलेल्या अब्दुल सत्तार यांच्यावर मात्र जिल्हा बँकेच्या एकूणच सगळ्या निवडणुकीत नेत्यांच्या मागे फरपटत जाण्याची वेळ आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपला प्रचंड विश्वास असल्याचे सांगत पक्षांतर्गत आणि विरुद्ध विरोधी पक्षातील आपल्या राजकीय शत्रूंना पुरून उरणारे अब्दुल सत्तार यावेळी मात्र हतबल झाल्याचे चित्र होते.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली. अब्दुल सत्तार राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि त्यानंतरच्या महायुतीमध्ये मंत्री असताना पहिल्यांदा त्यांनी सहकार क्षेत्रात जिल्हा बँक ताब्यात घेत शिवसेनेला यश मिळवून दिले होते. दरम्यानच्या काळात जिल्हा बँकेचा कारभार 'सत्तार बोले आणि अध्यक्ष डोले', अशा पद्धतीचा राहिला.
तत्कालीन जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे सत्तार यांच्या मनमानी कारभाराला विरोध करू लागले तेव्हा तातडीने त्यांना अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले. अर्जुन गाढे-पाटील या आपल्या विश्वासू संचालकाला सत्तार यांनी अध्यक्ष केले होते. जिल्हा बँकेच्या कारभारात अब्दुल सत्तार यांच्या आदेशाशिवाय पानही हलत नव्हते. तेव्हाही संचालक मंडळात भाजपचे सदस्य होते मात्र, बहुमत शिवसेनेच्या बाजूने असल्यामुळे सत्तारांना रोखणे त्यांना त्यावेळी शक्य झाले नव्हते.
राज्यात सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार यांना स्थान मिळाले नाही तिथूनच त्यांच्या अध:पतनाची सुरुवात झाली असे बोलले जाते. सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात अवघ्या 2420 मतांनी निवडून आलेल्या सत्तार यांच्या हातातून सत्ता निसटू लागली. सिल्लोड नगरपरिषद सत्तार यांनी निर्विवाद राखली. मात्र, सोयगाव सिल्लोड पंचायत समिती त्यांच्या ताब्यातून गेली. एकीकडे मतदार संघात भाजपने त्यांची कोंडी सुरू केली तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे या नेत्यांनी सत्तार यांना दूर ठेवत जिल्ह्याच्या राजकारणात आपली ताकद वाढवली.
दबाव तंत्राचा वापर करत आपल्याला हवे ते पदरात पाडून घेण्यात माहीर असलेल्या अब्दुल सत्तार यांचा हा डाव जिल्हा बँकेच्या राजकारणात मात्र महायुतीतीलच मित्र पक्षांनी हाणून पाडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांची साथ देत सत्तार यांना खड्यासारखे बाजूला केले. कायम आक्रमक आणि सत्तेसाठी वाटेल ते करायला तयार असलेल्या अब्दुल सत्तार यांना भाजपचे मंत्री अतुल सावे शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ आणि खासदार संदिपान भुमरे या त्रिमूर्तींनी अखेर रोखलेच. सत्तार यांनी आपला मुलगा समीर याला जिल्हा बँकेचे अध्यक्ष करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, वातावरण विरोधात आहे हे लक्षात आल्यानंतर सत्तार यांनी दोन पावलं मागे घेण्याची तयारी दर्शवली. सत्तार यांचे दबाव तंत्र त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी यावेळी त्यांच्यावरच उलटवले.
जिल्हा बँकेत दुसऱ्यांदा शिवसेनेची सत्ता आली असली तरी यात अब्दुल सत्तार नाहीत, याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. सत्तार यांना रोखण्यासाठी भाजपने टाकलेला डाव शिवसेनेच्याच सत्तार विरोधकांनी यशस्वी करून दाखवला. मतदार संघात अडचणीत आलेल्या अब्दुल सत्तार यांना आता जिल्हा बँकेच्या राजकारणातूनही हद्दपार व्हावे लागले आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीतील निसट्या विजयानंतर मतदारांबद्दल नाराजी व्यक्त करत 2029 ची विधानसभा निवडणूक आपण लढवणार नाही असे जाहीर केले होते. मतदार संघातील दोन्ही पंचायत समिती विरोधकांच्या ताब्यात गेल्या आहेत. भाजपने इद्रीस मुलतानी या नव्या अल्पसंख्यांक चेहऱ्याला अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्षपद देत राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. या निवडीतून अब्दुल सत्तार यांच्या वर्चस्वाला आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत जोरदार धक्का देण्याची तयारी भाजपने केल्याचे बोलले जाते. एकूणच चार वेळा आमदार, तीन वेळा मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार यांचा करिष्मा आता कमी होऊ लागला आहे हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून दिसून आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.