जानकरांचा परभणीतून लोकसभा लढवण्याचा निर्णय कोणाच्या पथ्यावर पडणार?

मराठा, ओबीसींचे राजकीय आरक्षण या दोन मुद्यांवर राज्यातील महाविकास आघाडी सरकार व भाजपवर असलेली नाराजी लक्षात घेऊन जानकरांनी परभणीतून लढण्याचा निर्णय घेतला असावा. (Mahadev Jankar)
Mahadev Jankar Rsp Leader

Mahadev Jankar Rsp Leader

Sarkarnama

परभणी ः राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते सर्वेसर्वा महादेव जानकर सध्या राज्यभरात फिरून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. (Rsp) पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात प्रभाव असलेल्या जानकरांनी (Mahadev Jankar) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत थेट बारामतीतून निवडूक लढवत पवारांना कडवे आव्हान दिले होते. (Parbhani) त्यामुळे त्यांना कुठलाही राजकीय पक्ष हलक्यात घेण्याची चूक करणार नाही.

२०२४ मध्ये जानकर पुन्हा बारामतीतून लढणार असे ठरले होते, त्या दृष्टीने त्यांची तयारी देखील सुरू होती, पण अचानक त्यांनी आता आपला मोर्चा मराठवाड्याकडे वळवला आहे. मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदारसंघातून आपण निवडूक लढवणार असल्याचे जानकर यांनी नांदेडात जाहीर केले.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघात रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे हीच काय ती रासपची जिल्ह्यातील `असेट` म्हणावी लागेल. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रासपची पाटी कोरी आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यामुळे गंगाखेड तालुक्यात रासपची ताकद असली तरी ती अद्याप जिल्ह्यात पोहचलेली नाही.

काॅंग्रेसचे नगरसेवक देशमुख यांनी पक्ष सोडल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षासोबत युती करून आगामी महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे रासपची जिल्हाभरात चर्चा सुरू झाली आहे. या शिवाय जिल्ह्यात विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात प्रभाव पाडू शकती एवढी धनगर समाजाची मतदार संख्या या जोरावर जानकरांनी परभणीतून लोकसभा लढण्याची घोषणा केली असे आता बोलले जाते.

परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गद्दारीचे ग्रहण या पक्षाला लागलेले असले तरी मतदार मात्र कायमच शिवसेनेच्या पाठीशा कायम उभा राहिल्याचे गेल्या २०-२५ वर्षात सातत्याने दिसून आले आहे. त्यामुळे जानकरांनी परभणीतून लढण्याची घोषणा केली असली तरी त्यांच्यासाठी इथे विजय मिळवणे शक्य नाही. बारामतीत दाखवली तेवढी करामत ते इथे दाखवू शकले तरी देव पावला,असे म्हणावे लागेल.

काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येतो. जिल्ह्यात काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तेचे समसमान वाटप करुन घेतले अशीच काहीशी परिस्थिती आहे. महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये देखील या दोन्ही पक्षांची चांगली ताकद आहे.

<div class="paragraphs"><p>Mahadev Jankar Rsp Leader</p></div>
सावंतांचा भाजप प्रवेश ठरणार `एकला चलो रे`, जिल्ह्यातून कोणाचीच साथ नाही..

त्यामुळे परभणी शहर विधानसभा आणि लोकसभेची जागा शिवसेनेकडे आणि उर्वरित जिल्ह्यात मग इतर पक्ष असेच काहीसे राजकीय गणित इथे पहायला मिळाले आहे. त्यामुळे जानकरांच्या उमेदवारीने होणारे मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार? याचेच गणित जिल्ह्यातील इतर पक्षाच्या नेत्यांना मांडावे लागणार आहे.

मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण या दोन मुद्यांवर राज्यातील महाविकास आघाडी सरकार व विरोधी पक्ष भाजपवर असलेली नाराजी लक्षात घेऊन जानकरांनी परभणीतून लढण्याचा निर्णय घेतला असावा, असेही बोलले जाते. पण याचा नफा-तोटा हा सत्ताधारी किंवा विरोधक यांच्याही वाट्याला जाऊ शकतो. त्यातून जानकरांची रासप कुठवर मजल मारू शकले हे देखील महत्वाचे ठरणार आहे. तुर्तास जानकरांनी शिवसेना-राष्ट्रवादीच्या गोटात चर्चेला तोंड फोडले एवढे मात्र निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com