

Beed Social Harmony: अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देत असतानाच त्यांनी विठुरायाकडे घातलेले साकडे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
मागील दीड-दोन वर्षापासून बीड जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक परिस्थिती बिघडली आहे. जातीयता वाढल्याने राज्य आणि देश पातळीवर बीड जिल्हा बदनाम झाला. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज 'माझ्या बीड जिल्ह्यातील सामाजिक एकोपा आणि सलोखा अबाधित राहू दे' असे साकडे घातले आहे.
देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा संदेशात धनंजय मुंडे यांनी 'हे पांडुरंगा, माझ्या मराठवाड्यावर आलेले जलसंकट दूर कर; शेतकरी बळीराजा सुखावेल यासाठी आशीर्वाद दे. माझ्या बीड जिल्ह्यात सामाजिक एकोपा आणि सलोखा अबाधित राहू दे, हीच आजच्या पावन दिनी प्रार्थना केली आहे.
बीड जिल्ह्यातील सामाजिक वातावरण गेल्या काही महिन्यापासून बिघडले आहे. जिल्ह्यात होणाऱ्या कुठल्याही राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी घटनेला जातीय वळण देण्याचे प्रकार वाढले आहे. विशेषतः मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून झालेले अपहरण आणि निर्घृण हत्या याला कारणीभूत ठरल्याचे पहायला मिळाले.
या हत्या प्रकरणाआधी आरक्षणाच्या मुद्यावरून बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भडकला होता. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने यात अधिक भर पडली. मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षात पुढे जातीयवादाला खतपाणी घालण्याचे काम झाले.
महादेव मुंडे, बापू आंधळे, विलास घुले, लक्ष्मण वाकडे, तौहीद खान यांच्या हत्या आणि त्यातील आरोपींकडे जात म्हणून पाहिले गेले. राजकीय नेत्यांनी या हत्या प्रकरणांचा आपल्या राजकारणासाठी वापर केल्याचेही दिसून आले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने त्यांना आपले मंत्रीपद गमवावे लागले.
आता जेव्हाही धनंजय मुंडे यांच्या मंत्रीमंडळात परतण्याच्या चर्चा किंवा हालचाली सुरू होतात, तेव्हा तेव्हा मुंडे यांच्या मार्गात संतोष देशमुख प्रकरणावरून झालेले आरोप आड येतात. आपल्या राजकीय पुनर्वसनामध्ये बीड जिल्ह्यातील बिघडलेला सामाजिक एकोपा आणि एकता हे दोन प्रमुख मुद्दे अडचणीचे ठरत असल्याची जाणीव धनंजय मुंडे यांना प्रकर्षाने होत आहे.
या संकटातून विठ्ठल, पांडुरंगच आपल्याला बाहेर काढू शकतो, हा विश्वास धनंजय मुंडे यांना आहे. यातूनच त्यांनी विठुरायाला साकडे घालत बीड जिल्ह्यातील सामाजिक एकोपा आणि सलोखा कायम राहू दे, अशी मागणी पांडुरंगाकडे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.