Market Committee : फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Phulambri Market Committee) निवडणुकीत मागील गेल्या पंधरा वर्षापासून माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी आमदार हरिभाऊ बागडे यांनी भाजपकडून नेत्यांची फौजी उभी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेण्याचा चंग दोन्ही आजी-माजी आमदारांनी बांधला आहे.
बाजार समितीची स्थापना २००२ मध्ये करण्यात आली होती. पहिली तीन वर्ष यावर प्रशासकाने काळ गाजविला. बाजार समितीची प्रत्यक्ष पहिली निवडणूक २००५ मध्ये पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध करीत एकहाती सत्ता मिळवली होती. काँग्रेस पक्षासोबत राष्ट्रवादीही सत्तेत सहभागी झाली होती.
त्यानंतर २०११ मध्ये दुसऱ्यांदा बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. दुसऱ्यांदा काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने आपले बहुमत सिद्ध करीत वर्चस्व प्रस्थापित केले. (Haribhau Bagde) त्यानंतर तिसऱ्यांदा २०१६ मध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेस व राष्ट्रवादीने बाजी मारल्याने आतापर्यंत या बाजार समितीवर काँग्रेस पक्षाचा झेंडा राहिला आहे. (Bjp) सलग तीन निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांना येथे पराभव पत्करावा लागला होता.
२०१९ मध्ये दुसऱ्या सहकाऱ्याला संधी देण्यासाठी काँग्रेसचे सभापती संदीप बोरसे यांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेने खेळी करत काँग्रेस, राष्ट्रवादी, व भाजपच्या बळावर शिवसेनेचा सभापती बनवला. त्यामुळे आतापर्यंत भाजपला या बाजार समितीत झेंडा फडकवता आलेला नाही. यंदाच्या निवडणुकीत आमदार हरिभाऊ बागडे यांनी शिवसेना शिंदे गटाचे किशोर बलांडे यांना सोबत घेऊन भाजप-शिवसेना युतीचे मजबुत पॅनल तयार केले.
भाजप शिवसेना युतीच्या पॅनलमध्ये दोन जिल्हा परिषदेचे माजी सभापती, दोन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, एक माजी नगराध्यक्ष, तीन माजी पंचायत समिती सभापती यांच्यासह वजनदार सरपंचांना या निवडणुकीत संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली माजी सभापती, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, तर काही सरपंच व सोसायटी चेअरमन यांना उमेदवारी देऊन पॅनल तयार केले आहे.
त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कोणत्याही परिस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकविण्याचा चंग भाजप व काँग्रेसने बांधला आहे. विद्यमान आमदार बागडे यांना आपल्या कार्यकाळात बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. तर काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष काळे चौथ्यांदा बाजार समिती आपल्याकडे राखत येणाऱ्या विधानसभेत आपला दावा पक्का करण्याच्या तयारीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.