Ahmednagar News : सरकारच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज देण्यात येते. मात्र यासाठी जिल्हा बँक कर्जधारक शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदर लावते. हे व्याजातील तीन टक्के वाटा राज्य सरकार तर तीन टक्के वाटा केंद्र सरकार भरत असते. हे व्याज थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे, असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. मात्र व्याज जमा करताना अनेक गंभीर अनियमितता आणि त्रुटींमुळे यात मोठा घोटाळा आहे का? याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे गट) व जिल्हा परिषद माजी सदस्य संदेश कार्ले यांनी केली आहे. (Latest Political News)
कार्ले यांनी याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना सांगितले,"हा एक मोठा संघटित घोटाळा असू शकतो. यात न्यायालयाचा आदेश असताना तीन वर्षांपासून नियमित कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. एकट्या नगर जिल्ह्यात ६३ कोटी रुपये जमा होणे गरजेचे असताना बहुतांशी व्याज अद्याप जमा असल्याचे दिसून येत नाही. याबाबत उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे असून यातून जिल्हा बँकेची कार्यपद्धती पुढे येईल."
शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज हे मुख्यत्वेकरून विविध कार्यकारी सेवा संस्था कर्ज पुरवठा करतात. काही शेतकऱ्यांना राष्ट्रीय बँका पीककर्ज पुरवठा करतात. परंतु या कर्जाला बँका व सेवसंस्था सहा टक्के व्याज आकारणी करतात व भरून घेतात. हे व्याज केंद्र सरकार तीन टक्के व राज्य सरकार तीन टक्के असे दरवर्षी देत असते. हे व्याज शेतकऱ्याच्या बचत खात्यावर जमा करावे, असे उच्च न्यायालयाने सहकार आयुक्तांना एका निकालात २०१८ ला आदेशीत केले आहे. असे असले तरी हे व्याज वेळेत आणि नियमित जमा झालेले नाही, असा आरोप कार्ले यांनी करत चौकशीची मागणी केली आहे.
सरकारने आजपर्यंत जिल्हा सहकारी बँकेला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांच्या वतीने १२ वेळा सन २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या तीन आर्थिक वर्षांचे सुमारे ६३ कोटी रुपयांचे व्याज 'पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने'अंतर्गत दिल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडून कार्लेंना मिळालेली आहे. परंतु हे व्याज आजअखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होते. त्यात फक्त काही प्रमाणात सन २०२०-२१ चे जमा झाल्याचे स्टेटमेंटवरून दिसते. परंतु नगर तालुक्यातच वरून पाठवलेल्या तारखा व जमा तारखा यांचा कुठेही मेळ लागत नसल्याचाही आरोप कार्ले यांनी केला आहे.
हातात असलेल्या माहितीच्या आधारावर कार्ले यांनी शेतकऱ्यांच्या पीककर्ज परताव्यात मोठ्या आर्थिक घोटाळ्याची शक्यता वर्तवली आहे. कार्ले म्हणाले, सर्व ठिकणी एकाच दिवशी पैसे जमा होणे आवश्यक असताना ते झालेले नाहीत. त्यात जवळपास आठ-दहा महिन्यांचा फरक आहे. यातील २०२१-२२ व २०२२-२३ चे व्याज अजूनही जमा झालेले नाही. वरील सर्व बाबी पाहता हे व्याज हडप होऊ शकते व शेतकऱ्यांना त्याबाबत मुकावे लागेल." (Scam News)
"केंद्र सरकारने दिलेले तीन टक्के व्याज परताव्याबाबत कुठलीही माहिती मिळत नसून ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाही झाले नाहीत. मग त्या व्याजाचे पैसे कुठे आहेत? एकट्या नगर जिल्ह्याची ही परस्थिती असताना एकूणच राज्यातील सत्य माहिती पुढे आल्यास मोठा घोटाळा यात आहे का?", असाही प्रश्न कार्ले यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.