प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री डोळे बंद करून बसलेत काय?

भाजप ( BJP ) महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये ( Keshav Upadhye ) यांनी प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी विचारला सवाल
BJP Spokesperson Keshav Upadhye
BJP Spokesperson Keshav UpadhyeSarkarnama

अहमदनगर : अहमदनगर शहराजवळ प्रतीक बाळासाहेब काळे या 27 वर्षीय युवकाने 30 ऑक्टोबरला आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येपूर्वी ऑडिओ व व्हिडिओ संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला. यात त्याने राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, त्यांच्या पत्नी सुनीता गडाख व बंधू विजय गडाख यांच्यासह दहा जणांची नावे घेतली आहेत. प्रकरणी एमआयडीसी पोलिसी फिर्यादीत गडाख कुटूंबीय वगळता सात जणांची नावे घेतली आहेत. या प्रकरणी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काळे आत्महत्या प्रकरणी महाविकास आघाडी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. Did the Chief Minister close his eyes in the case of Pratik Kale suicide?

प्रतीक काळे याने आत्महत्या प्रकरणी गडाख कुटूंबीयांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन केले होते. या प्रसंगी भाजपचे किसान मोर्चा अध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब मुरकुटे उपस्थित होते. त्यांनी प्रशासनावर व महाविकास आघाडीवर टीका केली होती. मुरकुटे व केशव उपाध्ये यांनी आज थेट मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या वेळी नितीन दिनकर, ऋषिकेश शेटे आदी उपस्थित होते.

BJP Spokesperson Keshav Upadhye
बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरेंनी मंत्री शंकरराव गडाखांचा राजीनामा घ्यावा...

उपाध्ये म्हणाले, राज्यातील मंत्र्याच्या पी.ए.नी आत्महत्या केली आहे. 7 ते 8 दिवस झाले कोणतीही कारवाई नाही हे दुर्दैवी आहे. आत्महत्या करताना प्रतीक काळेने जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व त्यांच्या कुटूंबीयांचा स्पष्ट उल्लेख करूनही पोलिस व जिल्हा प्रशासन कारवाईला टाळाटाळ करत आहे. प्रतीक काळे हा मागील 6 वर्षांपासून गडाख यांच्या मुळा शिक्षण संस्थेत कार्यरत होता. काळेला दोन महिन्यांपासून मानसिक त्रास देण्यात आला. त्याला मारेकरी पाठविण्यात आले. हे मारेकरीच त्याचे मित्र असल्याने तो वाचला. काळेची बदनामी करून त्याच्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असे त्याने ऑडिओ क्लिपमध्ये सांगितले आहे. असे असूनही दहा पैकी केवळ सात जणांचाच उल्लेख फिर्यादीत करण्यात आला.

उपाध्ये पुढे म्हणाले, प्रतीक काळेने घेतलेल्या तीन नावांवर पोलिस गप्प राहत आहेत. एखादा राज्याचे जलसंधारण मंत्र्यांचे नाव घेऊन आत्महत्या केली तरीही चौकशी केली जात नाही. राज्यातील मंत्र्याचे हे पूजा चव्हाण नंतरचे हे दुसरे प्रकरण आहे. अहमदनगर जिल्ह्यात अस्वस्थ वातावरण आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी कोणतेही प्रकरण दाबू शकतात.

BJP Spokesperson Keshav Upadhye
पूजा चव्हाण प्रकरण आँडीओ क्लिप मधील राठोड पळाला....

प्रतीक काळेला न्याय द्यायचा असेल तर गडाखांनी राजीनामा द्यावा. पोलिस फिर्याद दाखल करायला धजावत नाहीत. त्यांच्यावर दबाव आहे. गडाखांचा राजीनामा घ्या अथवा त्यांना पदापासून दूर करून या प्रकरणी निपक्षपाती चौकशी व्हावी. राज्य सरकारने हे प्रकरण दाबण्याचा प्रकार केल्यास भाजप सीबीआय चौकशी करण्याची मागणी करेल. काळेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे, अशी मागणी उपाध्ये यांनी केली.

बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितले की, प्रतीक काळे याने आत्महत्या का केली हे सांगितले आहे. त्याने तयार केलेल्या ऑडिओ व व्हिडिओ क्लिपची चौकशी व्हावी. मागील वर्षी व त्यापूर्वीच्या घटनांची सखोल चौकशी व्हावी. महाविकास आघाडी सत्तेतून लोकांना त्रास देत आहे, असा आरोपही यावेळी मुरकुटे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com