Sangali News : सांगली-मिरज रोडवरील कृपामाई हॉस्पिटलजवळील रेल्वे पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे रेल्वे प्रशासनाने ऐनवेळी पत्र दिल्याने पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व खासदार संजय पाटील हे रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर भडकले. हा पूल धोकादायक झाला असेल तर त्याची माहिती पाच वर्षे आधीच द्यायला हवी होती. एवढ्या काळात पूल पाडून नवा बांधला असता. ‘तुम्ही झोपला होता काय,’ असा सवाल त्यांनी केला. रेल्वे पुलाच्या प्रश्नांसाठी मंगळवारी रेल्वे राज्यमंत्र्यांशी चर्चा करु, तोडगा न निघाल्यास दिल्लीत धडक मारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात Sangali Collector सांगली-मिरज रोडवरील रेल्वे पुलासंदर्भात आयोजित बैठकीनंतर पालकमंत्री डॉ. खाडे Suresh Khade बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, रेल्वेचे अधिकारी सरोजकुमार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. रेल्वेचे विभागीय अभियंता विकास कुमार ऑनलाइन चर्चेत सहभागी झाले होते.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, रेल्वे विभागाने मारुती मंदिराजवळील पुलाचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करून त्यावरून अवजड वाहतूक बंद करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे सांगली, मिरज शहरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. दोन महत्त्वाच्या शहरांना आणि जिल्ह्याच्या दोन भागांना जोडणारा हा पूल आहे. त्यावरून अवजड वाहतूक दीर्घकाळ बंद करणे परवडणारे नाही.
दुरुस्तीसाठी फार तर एक आठवडा अवजड वाहतूक बंद ठेवला जाईल. अवजड वाहतूक वळवण्यासाठी पर्यायी चांगले रस्ते नाहीत. असा निर्णय घेणे कठीण आहे. हा पूल दुरुस्त करा आणि तो इतका मजबूत करा की अवजड वाहतूक सुरू राहिली पाहिजे. त्यासाठी सर्वोत्तम अभियंत्यांची मदत घ्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी बैठकीतूनच चर्चा केली. रेल्वेचे अधिकारी हुकुमशाही पद्धतीने वागत आहेत. ते खपवून घेतले जाणार नाही. मंगळवारी पुन्हा रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याशी चर्चा करणार आहे. तेथे तोडगा न निघाल्यास दिल्लीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल.
राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार संजयकाका पाटील म्हणाले, माधवनगर पुलामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. आम्ही ते सहन करतोय. आता रेल्वे पूल पाडल्यास लोक आम्हाला दगड मारतील. रेल्वे इंग्रजकालीन पद्धतीने काम करते आहे. इथे ते खपवून घेणार नसल्याचा इशाराही दिला. रेल्वे पुलाबाबत अधिकार्यांनी हलगर्जीपणा केला आहे. त्याची जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.