संभाजी थोरात
Satara Political News : सातारा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र, महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे राजेंना टक्कर देण्यासाठी कोणता उमेदवार महाविकास आघाडी देणार याची चर्चा आहे. ही जागा 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाकडे आहे. मात्र, या जागेवर काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे येत आहे. चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले तर साताऱ्यात हेविवेट नेत्यांची हाय होल्टेज लढत होईल.
उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्या नावाची घोषणा झाली नसली तरी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, तर पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना शरद पवार यांनी आदेश दिले तर लढू, असे सांगत आपण लढण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत. सुरुवातील उदयनराजे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार नसल्याने त्यांना ही निवडणूक सोप्पी जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीच्या चर्चेने ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी त्यांना पराभूत करत ही जागा राष्ट्रवादीकडेच ठेवली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर महायुतीत ही जागा अजित पवार गटाकडे गेली. मात्र, उदयनराजे हे कमळ चिन्हावरच लढणार असल्याने ही जागा अजित पवार गटाकडून भाजपला सोडण्यात आल्याची चर्चा आहे.
पृथ्वीराज चव्हाण हे उमेदवार असतील तर कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या मतदारसंघात ते प्रभावी ठरतील. त्याचबरोबर कोरेगाव, वाई या विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा गट मोठा आहे, त्यामुळे तिथंही चांगलं मतदान होईल. शिवाय पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेचा फायदा शहरी भागातदेखील होईल.
महायुतीतल्या नेत्यांमध्ये असलेल्या अंतर्गत धुसफुशीचा फटका आपल्याला बसू नये म्हणूनही उदयनराजे काळजी घेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, श्रीनिवास पाटील किंवा पृथ्वीराज चव्हाण या दोघांपैकी इतर कोणी उमेदवार असेल तर या निवडणुकीत उदयनराजेंचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळेच श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीच्या कारणाने माघार घेतल्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची उमेदवार म्हणून जोरदार चर्चा आहे.
(Edited By Roshan More)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.