

पुणे पोलिसांनी अखेर नवले ब्रिज येथे ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना हटवलं. यावेळी पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यानंतर आंदोलकांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली. त्यामुळे काहीवेळ येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. अखेर चार तासांनंतर मुंबई-बंगळूरु महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात पोलिसांना यश आलं.
नसरापूर येथील चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्यानंतर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. गेल्या चार ते साडेचार तासांपासून नवले पुलावर चिमुरडीचे प्रेत ठेवण्यात मुंबई -बंगळूरू महामार्ग अडवण्यात आला होता. नवले पुलावर या चिमुरडीचे प्रेत ठेवण्यात आले असून तिला न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करत आंदोलकांची धरपकड सुरू केली.
नसरापूर चिमुरडी अत्याचार व हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद पुण्यात उमटताना दिसून येत आहे. या प्रकरणावरून ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी मुंबई- बंगळुरू महामार्गावरच सुरू केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे गेल्या अडीच तासांपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहेत. याचदरम्यान या आंदोलन स्थळी आता पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार हेही दाखल झाले आहेत. त्यांनीही पीडितेच्या कुटुंबाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण नातेवाईकांनी त्यांच्यासमोरही तीव्र रोष व्यक्त केला.
नसरापूर येथे चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाच केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं कळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत पुण्याच्या नवले पुलावरच ठिय्या मांडला आहे. जोवर न्याय मिळत नाही,आरोपीला शिक्षा होत नाही, तोवर येथून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलानमुळे मुंबई-बंगळुरू महामार्ग ठप्प झाला असून या सुमारे 10 किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. नवले पुलावर या चिमुरडीचे प्रेत ठेवण्यात आले असून तिला न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भोर येथे पीडित चिमुरडीच्या कुटुंबाची भेट घेतली. ही घडलेली घटना अमानुष असून गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करीत असल्याचं स्पष्ट केलं. चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा हा तिसरा गुन्हा आहे. जर पहिल्याच गुन्ह्यात त्याला कठोर शिक्षा झाली असती तर महाराष्ट्राच्या दोन लेकी वाचल्या असत्या. या नराधमाची फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन त्याला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.
पुणे जिल्ह्यातल्या भोर येथील नसरापूर अत्याचार प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय आणि विकृती मनोवृत्तीचा भाग असल्याच म्हणत त्यांनी अशी विकृती बाबत कठोर कायदे करणे गरजेचे आहे. आरोपीला तत्काळ अटक करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक खटल्यावर चालवून लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात अवघ्या 3 वर्षांच्या निरागस मुलीवर 65 वर्षीय विकृत व्यक्तीने अत्याचार करून तिची निर्दयी हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या अमानुष घटनेनंतर आता नवले पुलावर नागरीकांनी आक्रोष केला. तर 'आरोपीला फाशीची शिक्षा द्या' अशी मागणी करत चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आला आहे. तसेच रास्तारोको करण्यात आला आहे.
सोलापूर शहरालगतच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला असून, संपत्तीच्या वादातून दिरानेच आपल्या भावाच्या संसारावर तलवारीने घाव घालत वहिनी, पुतणी आणि पुतण्याचा जीव घेतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मयत गायत्री सुधाकर मस्के, मुलगी प्रिया मस्के आणि मुलगा शिवराज मस्के हे तिघेही पतीच्या निधनानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कसाबसा संसार करत होते . कुटुंबप्रमुख गेल्यानंतर मयत गायत्री आपल्या लेकरांना सांभाळत संघर्षमय जीवन जगत होती. मात्र, काही दिवसांपासून संपत्तीच्या वाटणीवरून वाद होत होते.त्याच कुटुंबावर मध्यरात्री रक्तरंजित संकट कोसळले.
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील ६ महिने गरोदर विवाहितेचा एक लाख रुपयाच्या मागणीसाठी छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी आरोपी पती दिनेश महादेव कदम वय ३४ वर्षे व सासू मिनाक्षी महादेव कदम वय ५७ वर्षे या दोन्ही आरोपींना या गुन्ह्याखाली दोषी धरून १० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ३५ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास प्रत्येकी ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा आज ठोठावली.
जालना जिल्ह्यातील परतुरचे ज्येष्ठ नेते सुरेश जेथलिया यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. सडपातळ शरीरयष्टी आणि नियमित व्यायाम करणाऱ्या सुरेश जेथलिया यांच्या अकाली जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. विधानसभा आणि विधान परिषद सदस्य त्याचप्रमाणे स्थानिक नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी जात, धर्म आणि पक्षविरहित संबंध जोपासले.
नसरापूर येथील पीडित कुटुंबीयांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून संवाद साधला आहे. पीडित मुलीच्या वडिलांशी त्यांनी चर्चा करून आरोपीला फाशीची शिक्षाच होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले.
पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई लोहमार्ग येथे बढतीवर बदली झाल्याने त्यांना पुणे शहर पोलीस दलातून शुक्रवारी कार्यमुक्त करण्यात आले. नव्या पदावर रुजू होण्यापूर्वी महिला सहायक पोलीस निरीक्षकानी खासगी व्यक्ती मार्फत बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉनरेड जवळ २८ लाख घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. या घटनेनंतर या महिला पोलीस अधिकार्याची पोलीस आयुक्तालयातील रुमचा सर्च घेतला जात आहे.
नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून करणाऱ्या नराधमाला तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी. आम्हाला आश्वासन नको, तर कृती हवी आहे. तत्काळ फाशीची शिक्षा देऊन सरकारने एक उदाहरण घालून द्यावं. आधीच्या दोन गुन्ह्यांमध्ये आरोपीला जामीन कसा मिळाला, असा सवालही खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेतील गैरहजेरीवरून मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी नगरसेवकांना खडे बोल सुनावले आहेत. पक्षशिस्त पाळणार नसाल तर निधी देताना विचार केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. महत्वाच्या प्रस्तावाच्या वेळीला नगरसेवकांनी अनुपस्थित राहणं, ही गंभीर बाब आहे. यापुढे सभागृहातील कामकाजात कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानंतर बंद करण्यात आलेला मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका पुन्हा तब्बल 9 वर्षांनंतर सुरू होणार आहे. रस्त्याची आणि पुलाची कामे झाल्याने हा टोल पुन्हा सुरू करण्यात आला आहे, ही टोलवसुली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून होणार आहे. मात्र, टोल पुन्हा सुरू होऊ देणार नाही, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.
नसरापूर येथे चिमकुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आंदोलन केले. या आंदोलकांची पुण्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली. आक्रमक आंदोलकांची फोनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं करून दिलं, त्यामुळे आंदेालक शांत झाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाढणारी ताकद पाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं तोंड कडू झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीतून पळ का काढला, याचं उत्तर आधी संजय राऊतांनी द्यावं, असा सवाल खासदार ज्योती वाघमारे यांनी विचारला आहे.
मुंबईच्या दहिसर रावलपाडा परिसरात एका खाजगी टुरिस्ट गाडीवर बेकायदेशीरपणे पोलीस दिवे लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून रात्रीच्या वेळी या वाहनाच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खाजगी गाडीवर पोलीस दिवे लावणे नियमबाह्य असल्याने नागरिकांनी मुंबई पोलिसांना ट्विटरद्वारे कारवाईची मागणी केलीय. सध्या पोलीस संबंधित वाहनधारकाचा शोध सुरू आहे
सीएम देवेंद्र फडणवीस यांनी भोरमधील चिमुकलीच्या हत्येच्या प्रकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असून दोषींना लवकरात लवकर शिक्षा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आप पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खासदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. पंजाबमध्ये त्यांच्या विरोधात कठोर कारवाई सुरू झाली आहे. खासदार संदीप पाठक यांच्यावर दोन अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. पक्षांतरानंतरच ही कारवाई सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर येथे एका लहान मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून स्थानिकांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
पुण्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा मेमध्ये सुरू होईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र तांत्रिक कामे आणि चाचण्या अपूर्ण असल्याने १५ मेचा मुहूर्त पुढे ढकलला गेला. आता १५ जूनची नवी तारीख दिली असून, प्रकल्पाच्या विलंबामुळे पुणेकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी हे दोघे बारावी परीक्षा निकाल जाहीर करणार आहेत. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.
भारताच्या १६ व्या जनगणनेला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील आठ हजाराहून अधिक नागरिकांनी स्व-गणना केली आहे. जनगणना कायदा १९४८ च्या तरतुदींनुसार राबवला जाणारा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम आहे. प्रभावी धोरण निर्मितीला पूरक ठरणारा आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देणारा विश्वसनीय माहितीचा संग्रह (डेटा) निर्माण करण्यासाठी सक्रिय लोकसहभाग आवश्यक आहे, जिल्ह्यातील सर्व आपली जबाबदारी मानून या प्रक्रियेत सक्रियपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी केले आहे.
पुलावर ट्रॅक्टरचा टायर निखळून पडल्याने ट्रॅक्टर रस्त्यात बंद उभा आहे. परिणामी जळगावातील मुंबई-नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या एक तासापासून जळगावातील मानराज पार्क इथल्या पुलावर वाहतूक ठप्प झाली असून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी न आल्याने वाहनधारकांनीच वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू केलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अण्वस्त्रधारी देश बनण्यापासून रोखणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. इराणच्या हाती अण्वस्त्रे लागली, तर ते संपूर्ण जगासाठी मोठा धोका ठरेल. त्यामुळे इराणवर कडक निर्बंध आणि दबाव कायम ठेवण्याची गरज आहे, असे ट्रम्प यांनी 'नाटो' देशांना म्हटले आहे.
भोंदू अशोक खरात याला नवव्या गुन्ह्यात न्यायाधीश बी. बडवे यांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे, तसेच सहायक सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर यांनी युक्तिवाद केला. भोंदू खरातने फिर्यादी असलेल्या व्यापाराकडून अवतार पूजा करायची आहे, असे सांगून चार ते पाच कोटी रुपये या गुन्ह्यात उकळले आहे. याशिवाय फिर्यादीकडून महागडी कार भोंदू खरातने मृत्यूची भीती दाखवून आपल्या ताब्यात घेऊन नंतर ती स्वतः च्या नावावर करून घेतली. अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.
अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मुंबईत ऐतिहासिक कारवाई करत 349 किलो उच्च दर्जाचे कोकेन जप्त केले आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 1,745 कोटी रुपये आहे. या मोठ्या यशाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विभागाचे कौतुक केलं असून, अमली पदार्थ मुक्त भारतासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे म्हटलं आहे.
पुण्यातील भोर परिसरामध्ये एका चार वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या केली. भोर तालुक्यातील नसरापूर येथे हा प्रकार घडला. ही अल्पवयीन मुलगी नसरापूरला तिच्या आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आली होती. त्यावेळी एका नराधमाने तिला जवळच असलेल्या गुरांच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करुन तिची हत्या केली. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. गृहमंत्र्यांना या गोष्टींचा काही फरकच पडत नाही, त्यांना देणेघेणं नाही. काही झालं तरी गृहमंत्री राजीनामा देणार नाहीत. ते दूरच राहिलं, मोठं भाषण करणे, आम्ही प्रकरणाचा मुळाशी जाऊ म्हणणे, या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत. ज्याचं पोट जळालं, त्याला झळ लागली, आपण एका असुरक्षित राज्यात आहोत, याचं भान आपल्याला असलं पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
साताऱ्याजवळील श्री सिलोबा गड येथे पूर्वी खडतर, घसरडा आणि अरूंद, अशी पायवाट होती. मात्र आता हा रस्ता स्वच्छ, सपाट आणि चालण्यायोग्य झाला आहे. करंडी गावचे 67 वर्षाचे अशोक जाधव यांनी ना कुठलाही स्वार्थ ना प्रसिद्धीची अपेक् न ठेवता, आपल्या ग्रामदैवत सिलोबाप्रती श्रद्धा आणि स्वतःचा फिटनेस, यातून हा 3.5 किलोटरचा रस्ता बनवला आहे. गेल्या एका वर्षांत सुमारे साडेतीन किलोमीटरचा, रस्ता या डोंगरात श्रमदानातून तयार केला आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या भावना लक्षात घेवून दर सोमवारी मांस विक्री बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय परळी नगरपालिकेने घेतला आहे. असा निर्णय घेणारी परळी नगरपालिका पहिली पालिका ठरली आहे. नगरपालिकेच्या स्थायी समितीने एकमताने हा ठराव मंजूर केला. नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुंबई-पुणे अंतर कमी करणाऱ्या मिसिंग प्रकल्पात तब्बल 8.87 किमी लांबीच्या बोगद्यात एखादा अपघात घडून वाहतूक विस्कळीत होऊ नये, यासाठी सुरुवातीला अवजड वाहने आणि ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, हा मार्ग सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्यावरून ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणारे टँकर धावत असल्याचे चित्र समोर आले आहे.
रायगड जिल्ह्यातील वाहतूक कोंडीची परिस्थिती कायम असून, मुंबई-गोवा महामार्गावर सकाळपासून वाहनांच्या रांगा आहेत. काल दिवसभर आणि आज सकाळपासून नागोठणे माणगाव, इंदापूर शहराजवळ वाहनांच्या रांगा आहे. सलग तीन दिवस सुट्टयांमुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकर कोकणवासीय आणि पर्यटक कोकणाच्या दिशेने यायला निघाल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील पेट्रोल पंपावर देखील वाहनांची मोठी गर्दी.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील 729 गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली असून 18 गावात टँकर मंजूर, तर 59 गावात विहिरी अधिग्रहीत करण्यात आली आहेत. जिल्ह्याचा जून पर्यंतचा पिण्याच्या पाण्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून मुलाने बापाची हत्या केली. रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. मुलाने बापावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 65 वर्षीय मुसा हसन बागवान यांचा मृत्यू झाला. मुलगा आशपाक बागवान (वय 30) याला पोलिसांनी अटक केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज 2 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाइन हा निकाल पाहता येणार आहे. परीक्षेसाठी 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 7 लाख 99 हजार 773 विद्यार्थी विज्ञान शाखेचे, 3 लाख 80 हजार 692 कला शाखेचे तर 3 लाख 20 हजार 152 विद्यार्थी वाणिज्य शाखेचे होते. शिवाय 27 हजार 378 विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी तर 4 हजार 492 विद्यार्थी आयटीआय शाखेचे होते. बारावीची ही परीक्षा एकूण 9 विभागांमध्ये घेण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.