Maharashtra Politics Live Update : “त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही, मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर टीका

Maharashtra Breaking News Today : नसरापूर घटनेनंतर भोर,राजगड तालुका बंदची हाक, निलम गोऱ्हे पीडित चिमुरडीच्या कुटुंबीयांना भेटणार, शिवसेना-भाजप युतीमध्ये धुसफूस, महिला आयोगाकडून नसरापूर घटनेची दखल यासह देश, राज्यभरातील महत्त्वाची घडामोडी एकाच क्लिकवर
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

बेटावद येथील अरिहंत एक्वा कंपनीस आग लागल्याने सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान

शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील पाणी फिल्टर कंपनीमध्ये संध्याकाळच्या वेळी अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे, या घटनेमध्ये लाखो रुपयांची साधनसामग्री आगीच्या भस्मस्थानी आल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, विशेष म्हणजे या कंपनीच्या काही अंतरावर पेट्रोल पंप असल्यामुळे पेट्रोल पंप देखील आगीच्या भस्मस्थानी येण्याची भीती होती, परंतु अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

“त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही, मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर टीका

राहुल गांधींना महिला विषयावर आता बोलण्याचा अधिकार नाही. भारतात पहिल्यांदा महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत संधी मिळत होती. मात्र काँग्रेस असा पक्ष आहे, ज्यांनी संख्याबळाच्या भरोशावर प्रतिगामी निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पालकमंत्री संजय राठोड अजंती पारधी बेड्यावर...

नऊ वर्षीय चिमुकली अनवी भोसले हिचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केल्या नंतर यवतमाळ जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक काढून अनवी भोसलेंचा उष्मघाताने मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर मंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या मतदारसंघातील नेर तालुक्यातील अजंती येथील पारधी बेड्यावर जाऊन मृतकच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी पारधी समाजातील नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या.

‘मिसिंग लिंक’ला शिंग्रोबांचे नाव देण्याची पडळकरांची मागणी

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ला ‘कनेक्टिंग लिंक’ म्हणण्याची सूचना देण्यात आली. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी त्याला शिंग्रोबा धनगरांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

अमरावती जिल्ह्यात पुन्हा परतवाडा प्रकारणाची पुनरावृत्ती; अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडीओ, फोटो आई आणि आजीला पाठवले...

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा प्रकारणाची पुनरावृत्ती झाला असून बेनोडा पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यातील पीडित आणि आरोपी यांची मागील दोन वर्षापुर्वी ईन्स्टाग्रामवर ओळख होवून मैत्री झाली होती. दरम्यान पीडितने स्वतःचे काही फोटो आरोपीला पाठविले होते. तर आरोपीने नागपूर येथे पीडितला भेटायला बोलावून भेटी दरम्यान तिची ईच्छा नसतांना वाईट कृत्य केले. यानंतर पीडितने त्याचा नंबर ब्लॉक केल्याने आरोपीने पीडितचे आक्षेपहार्य अर्धनग्न फोटो पीडितेच्या आई आणि आजीला व्हॉटस्अँपवर पाठवले. तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

नीलम गोरे यांची सोशल मीडियावरील गैरवापराबाबत तीव्र प्रतिक्रिया...

सोशल मीडियावर वाढत चाललेल्या बेजबाबदारपणाबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः पोक्सो प्रकरणांमध्ये निरपराध मुलींचे फोटो चुकीच्या पद्धतीने व्हायरल केले जात असल्याचे त्यांनी म्हटले.“आजकाल सोशल मीडियावर कोणतीही माहिती पडताळणी न करता टाकली जाते. पोक्सोमधील पीडित मुलींचे फोटो सापडले नाहीत तर दुसऱ्याच मुलींचे फोटो वापरून त्यांना पीडित म्हणून दाखवले जाते, ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे अश्लीलता आणि स्त्रीशोषणाला चालना मिळत आहे.” असेही त्यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकातील नेतृत्व बदलाबाबत काँग्रेस हायकमांडचा ‘जैसे थे’?

राज्यात २०२८ च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कर्नाटकातील नेतृत्व बदलाबाबत काँग्रेस हायकमांड अत्यंत सावधगिरीने पावले टाकण्याची शक्यता आहे, कारण सध्या काँग्रेससमोरील सर्वात मोठे आव्हान सत्ताविरोधी लाटेला रोखणे हे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील कोणत्याही गटाच्या दबावाला पक्षश्रेष्ठी सहजासहजी बळी पडण्याची शक्यता नाही. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना सिद्धरामय्या यांना पक्षाचा निर्विवाद चेहरा कायम ठेवायचा आहे. तर शिवकुमार यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम ठेवून परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवायची आहे.

फडणवीसांच्या ड्रिम प्रोजेक्टला तीव्र विरोध; शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, 'शक्तीपीठ' महामार्गासाठी जमीन नाहीच

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला कामेरी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत तीव्र विरोध दर्शवित एकमुखी ठराव संमत करण्यात आला. ‘आमच्या सुपीक जमिनी कोणत्याही परिस्थितीत महामार्गासाठी देणार नाही, ’ असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.

राहुरीच्या विजयाची पुण्यात चर्चा...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. बारामती मधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात आहेत तर दुसरीकडे दिवंगत आमदार कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले राहुरी विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान भाजप कडून राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या अक्षय कर्डिले यांना विजयाबाबत शुभेच्छा देण्यात आले आहेत. पुण्यातील नगर रोड परिसरात “मित्र अभिनंदन आमदार झाला बद्दल” अशा मजकुराचे फ्लेक्स झळकत आहेत.

नसरापूर अत्याचार प्रकरणी एसआयटीची स्थापना

नसरापूर येथील अत्याचार प्रकरणी राज्य सरकारने एसआयटी नेमली आहे. या एसआयटी समितीमध्ये एकूण सहा अधिकारी आहेत. त्यात दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुणे जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारीही या समितीत असणार आहे. ही एसआयटी तपास करून आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे.

नसरापूर सलग तिसऱ्या दिवशी बंद

नसरापूर येथील चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या विरोधात गावात सलग तिसऱ्या दिवशी बंद पाळण्यात आला आहे. तसेच खेड शिवापूर टोल नाक्यावर टायर जाळून आंदोलन करण्यात आले आहे.

मिसिंग लिंकवर सेल्फी काढणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई

मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वरील मिसिंग लिंकवर सेल्फी काढणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांकडून आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. ‘एक्स्प्रेस वे’वर शंभरच्या स्पीडने गाड्या धावत असतात, त्यामुळे मिसिंग लिंकवर थांबून सेल्फी काढण्याच्या प्रकारामुळे अपघात घडू शकतो, त्यामुळे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. भविष्यात आम्ही संबंधित वाहनचालकांवर गुन्हे दाखल करणार आहोत, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

धक्कादायक : बीडमध्ये आजोबाकडून तीन वर्षांच्या नातीवर अत्याचार

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसूफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५४ वर्षीय आजोबाने तीन वर्षांच्या नातीवर अत्याचार केला आहे. आरोपी आजोबांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या मारहाणीबाबत मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे तक्रार करणार : हिरामण खोसकर

कुंभमेळ्याच्या रिंगरोड भूसंपादनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकार शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधीला विश्वासात घेत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय चालला आहे. याबाबत मी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे तक्रार करणार आहे, असेही खोसकर यांनी म्हटले आहे.

नसरापूर प्रकरणातील आरोपीचा न्यायालयात अजब दावा

नसरापूर येथील चिरमुडीच्या अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता त्याने अजब दावा केला आहे. ‘मला किरकोळ मारामारीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे,’ असे त्याने कोर्टाला सांगितले. आरोपीने कोर्टात खोटं सांगून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

Ashok Kharat खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! 70 कोटींच्या संशयावर ED ची एन्ट्री

समता पतसंस्था प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. संस्थापक काका कोयटे यांना ईडीने नोटीस बजावली असून 10 मेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशोक खरात यांच्या नावे असलेल्या 100 बनावट खात्यांमधून तब्बल 70 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड झालं आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठा आर्थिक घोटाळा उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी प्रतिभा चाकणकर यांचीही चौकशी झाल्याने आता ईडीची कारवाई अधिक तीव्र होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संपूर्ण अपडेटसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

Pune Bhor Crime:  नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपीचा स्वत:च्या बचावासाठी धक्कादायक बनाव

 नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपीला पोलिसांनी कोर्टात सुनावणी साठी हजर केलं होतं. आरोपीला काही तक्रार आहे का? असे न्यायाधीशांनी विचारले. दरम्यान "किरकोळ भांडणातून मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे," असा बचाव केला. मात्र, पोलिसांनी सादर केलेले प्राथमिक पुरावे आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्याचा हा दावा फोल ठरला.

Rahuri by election राहुरी पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी होणार, 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार

राहुरी पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी होणार आहे. 20 टेबलांवर ही मतमोजणी होणार असून 27 फेऱ्यात मतमोजणी पार पडणार आहे. राहुरी शहरातील धुमाळ महाविद्यालयात मतमोजणीची प्रकिया होणार असून, प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये

नसरापूर येथील पीडित मुलीच्या वडिलांनी राजकीय नेत्यांनी आपल्याला भेटायला येऊ नये, असे स्पष्ट भूमिका मांडली आहे. माझ्या मुलीला जो पर्यंत न्याय मिळत नाही, जो पर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तो पर्यंत कुटुंबाला भेटायला येऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

Pawan Khera news : जामीन मंजूर झाल्यानंतर पवन खेडा दिल्लीत दाखल

सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा हे आज अनेक दिवसांनंतर दिल्लीत दाखल झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून खेडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक टाळण्यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली होती.

खेड शिवापूर टोलनाक्यावर तणाव

नसरापूर घटनेच्याविरोधात विविध राजकीय पक्ष, संघटना आक्रमक झाले आहे. खेड शिवापूर टोलनाक्यावर संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी टायरही जाळले, त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले आहे. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Nanded Update : रसायनमिश्रित हातभट्टी दारू अन् बनावट सिंधी निर्मिती अड्ड्यांवर कारवाई

नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणी व शिवणी तांडा परिसरात अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या पथकाने छापे टाकत रसायनमिश्रित हातभट्टी दारू आणि बनावट सिंधी निर्मिती अड्ड्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत हजारो लिटर शरीरासाठी अत्यंत घातक असलेली हातभट्टी दारू आणि शिंदी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.

Petrol Update : परभणीत इंधनपुरवठा सुरळीत; बहुतांश पेट्रोल पंप सुरू, नागरिकांना दिलासा

परभणी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जाणवत असलेल्या पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण झाली होती. अनेक पंपावर पेट्रोल डिझेल नो स्टॉकचे फलक लावले होते. मात्र आज सकाळपासून पेट्रोल पंपावर सुरळीत सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर इंधनपुरवठा पुन्हा सुरळीत सुरू झाला असून ‘नो स्टॉक’चे फलक हटवण्यात आले आहेत.

Gadchiroli Naxalite activity : माओवाद्यांनी पेरलेल्या भूसुरूंगाचा स्फोट; चार जवान शहीद, केंद्राच्या नक्षलमुक्तीला धक्का

छत्तीसगड राज्य माओवादमुक्त झाल्याच्या अधिकृत घोषणेला काही दिवस उलटत नाहीत तोच, नक्षलवाद्यांनी पेरलेले आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात डीआरजीच्या (जिल्हा राखीव दल) चार जवानांनी प्राण गमावले. छत्तीसगडच्या कांकेर-नारायणपूर सीमावर्ती भागात 2 मे रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. याचबरोबर केंद्र सरकारच्या नक्षलमुक्तीच्या घोषणेला धक्का बसला आहे.

Ashok Kharat Update : अशोक खरातची भक्ताच्या पैशावर 21 देशांमध्ये भ्रमंती.....

भोंदू अशोक खरात नवव्या गुन्ह्यात चार दिवस पोलिस कोठडी सुनावली. भोंदू खरातने फिर्यादी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यास अवतार पूजा करायची आहे, असे सांगून चार ते पाच कोटी रुपये या गुन्ह्यात उकळले. याशिवाय परिसराची शक्ती प्राप्त करण्याकरिता 21 देशांमध्ये भ्रमण करावे लागेल व तसे न केल्यास नागदेवता तुला दंश करील त्यात तुझा मृत्यू होईल, अशी भीती घालून 21 देशांमध्ये मौजमजा करून आला. एवढेच नव्हे तर मृत्यूची भीती दाखवून जासूदची कार स्वतःच्या नावावर करून घेतली.

Nandurba Update : बर्ड फ्लूचा शिरकाव, नंदुरबारमध्ये दोन दिवसांत 44 हजार पक्षी कलिंग ऑपरेशन...

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून दुसऱ्या दिवशीही कलिंग ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत पशुसंवर्धन विभागाच्या 50 कर्मचाऱ्यांच्या पथकाने मोठी कारवाई करत सुमारे 44 हजार कोंबड्या, 20 हजार अंडी आणि तब्बल 44 टन पशुखाद्य नष्ट केले आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने कोंबड्यांचे कलिंग केले जात असून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत.

Navi Mumbai : धक्कादायक! एपीएमसी बाजारात केमिकलने आंबे पिकवण्याचा प्रकार

नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईत टरबूज खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार समोर आल्याने अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Pune Navale bridge Rasta Roko : नसरापूरच्या ग्रामस्थांवर कोणताही लाठीचार्ज केला नाही, पोलिस आयुक्त अमितेश कुमार

नसरापूरच्या ग्रामस्थांनी पीडित मुलीचा मृतदेह घेऊन पुण्यातील नवले ब्रीजवर रास्ता रोको आंदोलन केले. पुणे बंगळुरू महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प होती. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर लाठीमार करत आंदोलकांना नवले पुलावरून पांगवले आणि हा रस्ता मोकळा केला. मात्र, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशाप्रकारचा कोणताही लाठीचार्ज झालाच नसल्याचे म्हटले आहे.

नसरापूर प्रकरणी मोठीअपडेट, आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला आहे. चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची कबुली त्याने दिलीय. कबुलीमुळे आता या नराधमाला कठोर शिक्षा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय...

विधान परिषद निवडणूक बिनविरोध

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध झालीय.. शनिवारी झालेल्या छाननीत भाजपचे 5, शिंदेसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि ठाकरेसेना 1 अशा नऊ प्रमुख उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नसरापूर घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

नसरापूर घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली होती. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स यांना या प्रकरणाची दखल घेऊन तपासावर देखरेख ठेवण्याचे आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आयोगाकडून आवाहन करण्यात आले आहे. वेळेत आरोपपत्र दाखल करणे आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद सुनावणी सुनिश्चित करण्यावरही आयोगाकडून भर देण्यात आला आहे.

उपसभापती निलम गोऱ्हे घेणार नसरापूर पीडित कुटुंबीयांची भेट

आज रविवार दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता, विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे या नसरापूर घटनेतील पिडीत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी धायरी येथील DSK विश्व या ठिकाणी जाणार आहेत.

नसरापूर घटनेची निषेध, आज भोर, राजगड तालुका बंदची हाक

चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त नागरिक शनिवारी रात्री रस्त्यावर उतरले होते. त्यांनी तीन तास रस्ता रोको केला. आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली. चिमुरडीवरील अन्यायाविरोधात आज संपूर्ण भोर, राजगड तालुका बंद ची हाक देण्यात आली आहे. व्यापारी आणि दुकानदारांनीही आपली दुकाने बंद ठेवून या निषेधात सहभाग नोंदवण्याचे आवाहनहवेली, भोर वेल्हा मधील आंबेडकरी संघटनांच्या वतीने खेड शिवापूर टोल नाका बंदची हाक दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com