

Ahilyanagar DCC Bank Election Latest News : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच संगमनेर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडीतही विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील यांच्यातील संवादामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत नेमका काय तोडगा निघणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे तिघे एकत्र बसून तोडगा काढतील, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चांमध्ये कोणत्याही नेत्याला किंवा घटकाला दूर ठेवले जाणार नाही, असे सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले. सर्वांना विश्वासात घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
प्रा. राम शिंदे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेबाबत विचारले असता विखे पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेच्या संदर्भात बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे बैठक बोलावली होती. आपल्याला जसा फोन आला, तसाच इतरांनाही संपर्क करण्यात आला होता. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात जामखेड येथील दुष्काळी आढावा बैठकीनंतर चर्चा झाली आहे. त्यामुळे सर्वांचा विश्वास घेऊन या विषयावर मार्ग काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आपले वैयक्तिक मत विचाराल तर एकदा निवडणूक होऊन जाऊ द्यावी, असे आपल्याला वाटते, असे सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले. हे आपले वैयक्तिक मत असून भाजप किंवा मित्रपक्षांची अधिकृत भूमिका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असली, तरी त्यातूनही मार्ग काढता येऊ शकतो, असे विखे पाटील म्हणाले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांवर लढा उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, थोरात-विखे पाटील यांच्यातील संवाद, प्रा. राम शिंदे यांची भूमिका आणि जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यामुळे अहिल्यानगरच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होणाऱ्या चर्चेत कोणता तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.