Doctor Arrested : गर्भलिंग निदान प्रकरणात आरोपींची संख्या 18 वर; नाशिकमधील डॉक्टरच निघाला मुख्य सूत्रधाराचा मित्र, रॅकेटमध्ये सहा डाॅक्टरांना अटक

Illegal sex determination racket in Ahilyanagar expands to Nashik; police arrest doctor and seize fourth illegal sonography machine : अहिल्यानगरमधील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती वाढली असून, पिंपरी निर्मळपासून निफाडपर्यंत पसरलेले बेकायदा सोनोग्राफीचे जाळे समोर आले आहे. आरोपींची संख्या 18 झाली असून, त्यात सहा डाॅक्टरांचा समावेश आहे.
doctors arrested
doctors arrestedSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar sex determination racket : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे.

या संपूर्ण रॅकेटची व्याप्ती थेट नाशिक जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असून, निफाड तालुक्यातील एका डॉक्टरसह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईनंतर या बहुचर्चित प्रकरणातील अटक आरोपींची संख्या तब्बल 18 वर पोहोचली असून, त्यात 6 डॉक्टरांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, तपासादरम्यान पोलिसांनी (Police) चौथे बेकायदा सोनोग्राफी मशीनही जप्त केले आहे. त्यामुळे राज्यभरात कार्यरत असलेल्या या रॅकेटची व्याप्ती आणखी मोठी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे कनेक्शनमधून उघड झाले नाशिकचे धागेदोरे

पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दोन डॉक्टरांसह मेडिकल साहित्य विक्री करणाऱ्या दलालांकडून चौकशी करताना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील काही डॉक्टरांनाही विनापरवाना सोनोग्राफी मशीन विकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

doctors arrested
Illegal Sonography Racket : बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरण तापलं; 'पुणे कनेक्शन'सह गुन्ह्यातील आरोपी डॉक्टरांची संख्या पाचवर, एकूण 16 अटकेत

दोन डाॅक्टरांचा चार दिवसांची कोठडी

श्रीरामपूरचे अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या विशेष पथकाने नाशिकमध्ये सापळा रचत निफाड परिसरात छापेमारी केली. या कारवाईत डॉ. कुणाल प्रभाकर वल्टे (वय 33, रा. सरस्वती नगर, निफाड) आणि त्याचा साथीदार सागर शांताराम उल्हाळ (वय 25, रा. नांदूर मधमेश्वर, ता. निफाड) यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

doctors arrested
Sex Determination Case : महाराष्ट्र हादरवणारं गर्भलिंग निदान रॅकेट! 12वी शिकलेल्याकडून चाचण्या, गोठ्यापासून धावत्या कारपर्यंत ‘सेटअप’, IMA डॉक्टरसह 12 जण अटकेत, शेकडो गर्भपात

वर्गमित्र निघाला मुख्य आरोपीचा ‘सहकारी’

तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेला डॉ. कुणाल वल्टे हा या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. राहुल भणगे याचा वर्गमित्र असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, डॉ. वल्टे याने पुण्यातील नरेंद्र ठाकरे (रा. केशनांदगाव, ता. हवेली) याच्याकडून बेकायदा गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन खरेदी केले होते. संशय टाळण्यासाठी हे मशीन स्वतःच्या दवाखान्यात न ठेवता त्याने शेजारील सागर उल्हाळ यांच्या ब्लड टेस्टिंग लॅबमध्ये लपवून ठेवले होते.

विशेष पथकाने लॅबवर छापा टाकत हे चौथे बेकायदा मशीन जप्त केले. या कारवाईमुळे संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे आता राज्यातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तपासली जात आहे.

असा उलगडत गेला रॅकेट

पहिला टप्पा

पिंपरी निर्मळ येथे छापा टाकून मुख्य आरोपी डॉ. राहुल भणगेसह 9 जणांना अटक करण्यात आली. यावेळी 1 सोनोग्राफी मशीन आणि 3 वाहने जप्त करण्यात आली.

दुसरा टप्पा

एजंट प्रदीप ढगे याच्याकडून दुसरे बेकायदा सोनोग्राफी मशीन पोलिसांनी जप्त केले.

तिसरा टप्पा

श्रीरामपूर येथील डॉ. रविंद्र कुटे आणि डॉ. राज शेख यांना बेकायदा गर्भपात आणि औषध पुरवठ्याप्रकरणी अटक करण्यात आली.

चौथा टप्पा

पुण्यातील दोन डॉक्टर आणि मेडिकल दलालाला अटक करण्यात आली. तसेच वडगाव मावळ येथील बोगस डॉक्टरकडून तिसरे मशीन जप्त करण्यात आले.

पाचवा टप्पा

पुण्यातील आरोपींच्या चौकशीतून ‘नाशिक कनेक्शन’ समोर आले. त्यानंतर डॉ. कुणाल वल्टे आणि त्याच्या साथीदाराला अटक करत चौथे मशीन हस्तगत करण्यात आले.

इतर जिल्ह्यातही बेकायदा गर्भलिंग निदानाचे जाळे

या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, बेकायदा गर्भलिंग निदानाचे जाळे अनेक जिल्ह्यांत पसरल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांकडून आता आर्थिक व्यवहार, मशीन पुरवठा साखळी आणि संबंधित डॉक्टरांचे नेटवर्क यांचाही तपास सुरू करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com