Raver Constituency News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या घाऊक पक्षांतरे होत आहेत. अनेक पक्षांमध्ये प्रवेशासाठी गर्दी आहे. यामागे उमेदवारीसाठी इच्छुक नेत्यांची सोय, गैरसोय कारणीभूत आहे.
उमेदवारीसाठी अनेक नेत्यांच्या मुंबई तसेच पक्षाच्या नेत्यांच्या भेटीसाठी दौरे जोरात आहेत. अनेक इच्छुक स्थानिक पदाधिकाऱ्यांना गोडी गुलाबीने बरोबर घेत, नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यात दंग आहेत. अशीच स्थिती रावेर विधानसभा मतदारसंघातही आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र अशा एका नेत्याला स्पष्ट शब्दातच सांगून टाकले. रावेर येथील काँग्रेस नेते आणि माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
त्याआधी मोहंम्मद यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला होता. स्थानिक नेत्यांना बरोबर घेऊन ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार होते. रावेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी ही त्यांची अपेक्षा होती.
गेले सहा महिने श्री. मोहम्मंद काँग्रेस पक्षाकडे देखील उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी तयारी सुरू केली होती. मात्र उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून त्यांना चांगलाच झटका बसला.
उपमुख्यमंत्री पवार यांनी जळगावच्या स्थानिक नेत्यांना देखील याबाबत आपल्या नेहमीच्या शैलीत सुनावले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटात प्रवेश करणाऱ्या दारा मोहम्मद यांना त्यांनी उमेदवारीसाठी येत असाल तर येऊ नका. मी तुम्हाला प्रवेश देणार नाही, असे स्पष्टच सुनावले.
उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमागे विविध राजकीय कारणे आहेत. सध्या महायुतीमध्ये जागा वाटपावरून चांगलीच ओढताण सुरू आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ तर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लहान भाऊ अशी स्थिती आहे.
भाजपमधील इच्छुकांच्या गर्दीमुळे अजित पवार गटाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे. रावेर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे आहे. या मतदारसंघातून शिवसेना अथवा राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिल्याचा वा त्यांनी प्रबळ लढत दिल्याचा इतिहास नाही.
या मतदारसंघातून भाजपकडे प्रबळ उमेदवार उमेदवारी करणार आहे. ही वस्तुस्थिती माहीत असल्याने उपमुख्यमंत्री पवार यांनी दारा मोहम्मद यांना प्रवेश नाकारला. जळगाव जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील पाच मतदार संघात सध्या भाजपचे आमदार आहेत.
भाजपकडे जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात पक्षाचे खासदार आहेत. भाजप जळगाव मध्ये प्रमुख पक्ष असल्याने सात ते आठ जागांवर या पक्षाने उमेदवार देण्याची तयारी केली आहे. विधानसभा जागावाटपाची महायुतीची चर्चा जवळपास सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर महायुतीतील अन्य पक्षांकडे इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक आयाराम, गयाराम यांना पक्षांतराचे वेध लागले आहेत. जळगाव मध्ये गेल्या महिन्याभरात सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे. मात्र काँग्रेसच्या नेत्याला महायुतीत प्रवेश नाकारण्याची ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.