

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरजसिंह राजपूत ऊर्फ परदेशी याच्या हत्या प्रकरणानंतर झालेल्या सभेत मुस्लिम समाजाविरोधात कथित आक्षेपार्ह आणि भडकावू वक्तव्ये केल्याचा आरोप करत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)ने कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
AIMIMचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी यासंदर्भात पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना पत्र देत आमदार संग्राम जगताप, भाजप आमदार अक्षय कर्डिले, आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्रामबापू भंडारे महाराज यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
डॉ. अशरफी यांनी आपल्या पत्रात पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील चौकात पोलिस (Police) अधिकारी आणि प्रशासनाच्या उपस्थितीत मुस्लिम समाजाविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्ये झाल्याचा दावा केला आहे. या वक्तव्यांमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
धीरजसिंह राजपूत याच्या हत्येचा निषेध करताना या प्रकरणात पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईचे स्वागत असल्याचे डॉ. अशरफी यांनी म्हटले आहे. मात्र, हत्येच्या घटनेचे राजकारण करून मुस्लिम (Muslim) अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. धीरजसिंह याला न्याय मिळायलाच हवा. मात्र, त्याच्या हत्येसाठी संपूर्ण मुस्लिम समाजाला जबाबदार धरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
धीरजसिंह याच्या हत्येनंतर आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अक्षय कर्डिले, संग्रामबापू भंडारे महाराज यांच्यासह इतरांनी पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केल्याचा दावा डॉ. अशरफी यांनी केला आहे.
हा महामार्ग पाच तासांपेक्षा अधिक काळ रोखण्यात आल्याचा तसेच पूर्वपरवानगी किंवा पूर्वसूचना न देता रस्ता अडवल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय, आंदोलनादरम्यान ध्वनीप्रदूषण झाल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकाराची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी AIMIMकडून करण्यात आली आहे.
मुस्लिम समाजाला लक्ष्य करत पाकिस्तान आणि बांगलादेशात पाठविण्याची भाषा, तसेच हिंसक वक्तव्ये करण्यात आल्याचा दावा डॉ. अशरफी यांनी केला आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे दोन धर्मांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
धीरजसिंह याला न्याय मिळवून देण्याऐवजी त्याच्या हत्येचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला. जमलेल्या युवकांना अधिक भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
AIMIMने केलेल्या या तक्रारीनंतर पोलिस आणि प्रशासनाकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे. तक्रारीतील आरोपांची चौकशी करून संबंधित वक्तव्ये, व्हिडिओ आणि सभेच्या पार्श्वभूमीची पडताळणी झाल्यानंतर पुढील कायदेशीर निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, धीरजसिंह राजपूत याच्या हत्या प्रकरणाचा तपास आणि त्यानंतर निर्माण झालेला राजकीय व सामाजिक तणाव या दोन्ही मुद्द्यांवर प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.