भुसावळ : येथील भाजपचे आमदार संजय सावकारे (BJP MLA Sanjay Savkare) यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासह राष्ट्रवादीमध्ये नव्याने प्रवेश केलेले आवर्जून उपस्थित होते. व्यासपीठावर त्यांचीच संख्या जास्त होती. विशेष म्हणजे, खडसेंचे एकमेव भाषण झाले. त्यात त्यांनी सावकारेंचे तोंड भरुन कौतुक केले.
आमदार सावकारे यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त शहर व तालुक्यात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी स्टार लॉन येथे सावकारे मित्रमंडळातर्फे भव्य सत्कार व शुभेच्छा स्वीकारण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भव्य बॅनरसह व्यासपीठ सजविण्यात आले होते. सावकारे यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मात्र, व्यासपीठावर आमदार सावकारे, रजनी सावकारे यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक प्रा. डॉ. सुनील नेवे, देवेंद्र वाणी, प्रमोद नेमाडे, माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचाच भरणा जास्त होता. भाजपचे युवराज लोणारी, मनोज बियाणी, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पिंटू राणे होते. पण भाजपचे शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे यांना सूत्रसंचालकाने नंतर व्यासपीठावर बोलावले.
भाजपचा जिल्हास्तरावरील कोणीही नेता उपस्थित नव्हता. या वेळी खडसे यांचे एकमेव भाषण झाले. ते म्हणाले सावकारे हे लोकप्रिय आहे. सगळ्यांना हवेहवेसे वाटणारे आहेत. बहुतेक मोठ्या लोकांचे वाढदिवस डिसेंबर महिन्यात येतात. सावकारे यांनी देखील तेवढी उंची गाठावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. खडसेंनी शाल व बुके देऊन सावकारेंना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आमदार सावकारे यांनी केक कापला. त्यांना खडसे यांनी आपल्या हाताने केक खाऊ घातला. अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपला. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावकारे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात किंवा नाही, यावर चर्चा रंगत होती.
संतोष चौधरींची उपस्थिती
मुख्य कार्यक्रम संपल्यावर शुभेच्छा देणाऱ्यांची एकच गर्दी व्यासपीठावर झाली. रांगेत सावकारेंना बुके देत एक एकजण पुढे सरकत होते. यात संतोष (दाढी) चौधरी हे डॉ. वसंत झारखंडे व इतर सहकाऱ्यांसोबत आले होते. संतोष चौधरी हे माजी आमदार संतोष चौधरी यांचे एकेकाळचे खंदे समर्थक होते. त्यांची नावे एकसारखी असून, एकाच वॉर्डात राहतात. संतोष दाढी या नावाने ते परीचित आहे. त्यांच्या उपस्थितीने कुजबुज सुरू झाली. तेव्हा दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीपासूनच संतोष दाढी हे सावकारेंचे समर्थक झाले असल्याची माहिती एका भाजप नगरसेवकाने दिली.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.