Ahmednagar Valu Mafia : अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर पोलिस पाटलाच्या मुलासह सुमारे 13 वाळू चोरांनी हल्ला केला. वाळू चोरांनी या हल्ल्यात पथकातील कर्मचाऱ्यांना लाकडी दांडक्याने, लोखंडी गजाने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पथकाचे वाहन देखील वाळू चोरांनी फोडले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे राज्याचे महसूल खातं आहे. त्यांच्याच जिल्ह्यातील महसूल पथकावर हा हल्ला झाल्याने यावर ते काय अॅक्शन घेतात याकडे लक्ष लागले आहे.
महसूल पथकावर हल्ल्याची ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील चवरसांगवी शिवारात सीना नदीपात्रात घडली. या हल्ल्यात कामगार तलाठी शाहरुख रशीद सय्यद यांच्यासह मिलींद पोपटराव जाधव, भारत महादेव चौधरी, कुंदेकर अनिल शंकर, गुजर कृष्णा उध्दव, चाकणे संदीप भिवा, काळे महेंद्र मालन, खताळ ऋषीकेश लक्ष्मण, झाडे गणपत मुरलीधर असे 8 कर्मचारी गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस (Police) ठाण्यात बनपिंप्री तलाठी शाहरुख रशीद सय्यद यांच्या फिर्यादीवरून सागर सुदाम बोरुडे (रा. घोगरगाव, ता.श्रीगोंदा) याच्यासह त्याच्याबरोबर असलेल्या 13 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे Radhakrishna Vikhe यांच्याच होमग्राऊंडवर म्हणजेच, नगर जिल्ह्यात हा प्रकार झाला आहे. मंत्री विखे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तसेच महसूल खाते देखील त्यांच्याच अधिपत्याखाली येते. वाळू चोरांनी त्यांच्यात खात्यातील पथकावर, असा गंभीर हल्ला केला आहे.
मंत्री विखे महसूल पथकावर वाळू चोरांचा, माफियांचे वाढलेल्या हल्ल्यांची दखल घेऊन कोणती अॅक्शन घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, महसूलमंत्री विखे यांनी वाळू संदर्भात नवीन धोरण राबवण्याचा प्रयत्न देखील केला होता.
महसूल पथकावरील हल्ल्याचा घटनाक्रम
श्रीगोंदा तालुक्यातील चवर सांगवी शिवारातील सीनानदीपात्रात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांना मिळाली. श्रीगोंदा तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांना त्यांनी पथक पाठवून कारवाईच्या सूचना दिल्या.
तहसीलदार वाघमारे यांनी कामगार तलाठी शाहरुख रशीद सय्यद यांच्यासह इतर 8 कर्मचाऱ्यांचे पथक कारवाईसाठी पाठविले. पथक चवरसांगवी शिवारात सीनानदीपात्रात गेले असता सीना नदीपात्रातील वाळू विनापरवाना बेकायदा जेसीबी मशीनचे सहाय्याने दोन विना क्रमांकाच्या वाहनांमध्ये भरुन वाहतूक सुरू होती.
या वाहनांवर कारवाई सुरू असताना तेथे आलेल्या तिघांपैकी एकाने सागर सुदाम बोरुडे नाव सांगत घोगरगाव येथील राहणारा आहे. मी पोलीस पाटलाचा मुलगा आहे. तुम्हाला काय करायचे ते करा, मी गाड्या घेऊन जाणार, असे म्हणून वाहने पथकाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करत पळवून नेली.
कर्मचारी लपले शेतात
पथकाबरोबर झालेल्या घटनेची माहिती तहसीलदार वाघमारे यांना देत पोलिस मदत मागवली पोलिस पथकाची वाट पाहत असताना सागर सुदाम बोरुडे याने 10 ते 13 साथीदारांना घेऊन येत पथकावर हल्ला चढवली. लाकडी दांडक्याने व लोखंडी गजाने पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
अचानक झालेल्या हल्ल्याने तसेच अंधार असल्याने घाबरलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांनी जीव वाचविण्यासाठी असलेल्या ऊस, मकाच्या शेतात आणि मोठ्या खड्ड्यांत लपून बसले. तरी हल्लेखोर पथकातील कर्मचाऱ्यांचा शोध घेत होते. पथकातील कर्मचारी न सापडल्याने हल्लेखोरांनी तेथे उभे असलेले सरकारी वाहनाचे नुकसान केले.
तहसीलदार डाॅ. क्षितिजा वाघमारे यांनी वाळू चोराची वाढलेली दादागिरी खपवून घेणार नाही. पथकावर हल्ला केला म्हणून महसूल प्रशासन शांत बसणार नाही. येथून पुढे अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या माफियांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.