Nana Patole : पटोलेंच्या ‘त्या’ कॉलमुळे सुकर झाला धीरज लिंगाडेंचा विजय !

Dhiraj Lingade : नाना पटोलेंच्या कॉलमुळे धीरज लिंगाडे आणि त्यांची टीम सतर्क झाली.
Dhiraj Lingade, Congress.
Dhiraj Lingade, Congress.Sarkarnama

Amravati Graduate Constituency News : अमरावती पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांनी मोठा विजय मिळविला आहे. गत १२ वर्षांपासून भाजपचा गड असलेल्या मतदारसंघात त्यांनी प्रस्थापितांना धूळ चारली. पुन्हा मोजणी करण्याची मागणी झाल्यानंतर त्यामध्ये गडबड होण्याची शक्यता होती आणि तेव्हाच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धीरज लिंगाडेंना कॉल केला.

नाना पटोलेंच्या कॉलमुळे धीरज लिंगाडे आणि त्यांची टीम सतर्क झाली आणि त्यांचा विजय सुकर झाला. त्यानंतर अवैध मतांना मॅनेज करून आपला लीड कमी व्हावा व डॉ. रणजीत पाटलांचा विजयाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी विरोधकांनी अधिकाऱ्यांना खोक्यांची ऑफर दिली असल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार धीरज लिंगाडे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार धीरज लिंगाडे यांचा बुलढाण्यात सत्कार करण्यात आला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, काँग्रेसचे नेते श्यामबाबू उमाळकर, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे, संजय राठोड, शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार लिंगाडे म्हणाले की, अमरावतीमध्ये (Amravati) मतमोजणी सुरू असताना सायंकाळी आठ साडेआठ वाजताच्या सुमारास सुमारे आठ हजारांहून अधिक मते अवैध ठरली होती. या मतांची पुन्हा मोजणी करण्याची मागणी विरोधातील उमेदवार आमदार डॉ. रणजीत पाटील यांनी केली होती. मागणी करताच अधिकारी तातडीने तयार झाले. मात्र दरम्यानच्या काळात आपल्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन आला व ते म्हणाले की, डोळ्यात तेल घालून मतमोजणीकडे लक्ष द्या.

Dhiraj Lingade, Congress.
Amravati : नवीन चेहरा असलेले धीरज लिंगाडे आमदार झाले, त्याची ‘ही’ आहेत कारणे...

आता काहीही झाले तरी मतमोजणी कक्ष सोडू नका. विरोधकांनी जास्तीत जास्त मते रणजीत पाटलांकडे वळविण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. यासाठी अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खोक्यांची ऑफरही दिली असल्याचे नाना पटोले (Nana Patole) यांनी मला सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी २८ टेबलवर पुन्हा ही अवैध मतांची मोजणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी आपण आक्षेप घेऊन २८ नाहीस तर केवळ दहा टेबलवर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोजणी करावी, अशी भूमिका घेतली.

आमची भूमिका अधिकाऱ्यांनी मान्य केली व अवैध मतांमधूनही मोजणीनंतर आपल्यालाच जास्त मते मिळाली. त्यामुळे आपला विजय निश्चित झाल्याचे लिंगाडे यांनी सांगितले. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी देखील यावेळी बोलताना अशक्य वाटणारा विजय महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) एकोप्यामुळे व नेते कार्यकर्ते आदी सर्वांनीच परिश्रम घेतल्यामुळे शक्य झाल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com