Bajargaon Incident : नागपूर येथून जवळच असलेल्या बाजारगावमधील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नऊ कामगारांच्या परिवाराला राज्य शासनाने प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीला मंजुरी प्रदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
रविवारी (ता. 17) सकाळी सोलर कंपनीत स्फोटकांच्या पॅकिंगचे काम सुरू असताना स्फोट झाला. या घटनेत 6 महिला आणि 3 पुरूष कामगारांचा मृत्यू झाला. सरकार मृतक कामगारांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर, पोलिस महानिरीक्षक छेरींग दारजे, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार बाजारगावातील सोलर कंपनीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. कंपनीचा परिसर सील करण्यात आला आहे. अग्निमशन दल, एनडीआरएफ आणि स्फोटांचा तपास करणाऱ्या तज्ज्ञाचे पथक कंपनीतील घटनास्थळाचा तपास करीत आहेत.
आपण सातत्याने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या संपर्कात आहोत. राज्य सरकारकडून घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना तात्काळ पाच लाख रुपयांची प्रत्येकी मदत देण्याचे निर्देश देण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सोलार कंपनीतील मृत कामगारांप्रती सहवेदना व्यक्त केलीय. घटनेत जखमी झाले असतील त्यांना तातडीने आधुनिक वैद्यकीय उपचार देण्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आलीय, असं शिंदे यांनी नमूद केलय.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सोलर कंपनीतील स्फोटात मरण पावलेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहिली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी देखील या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. घटनेबाबत माहिती मिळताच काटोलचे आमदार तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी सकाळपासूनच बाजारगावातील सोलर कंपनीत तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देत त्यांनी कामगारांच्या मदतीसाठी धाव घेतली.
मृतक कामगारांपैकी काही जण वर्धा, अमरावती, भंडारा जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रवाना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. स्फोट नेमका कसा झाला, यासंदर्भातील माहिती मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कंपनीतील इतर कामगारांकडून माहिती गोळा करण्यात येत आहे. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा असल्यास त्याचे फूटेज मिळवत नेमक्या निष्कर्षावर पोहोचता येणार आहे. तूर्तास पॅकिंगचे काम सुरू असताना स्फोट झाला, एवढीच माहिती उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.