किरीट सोमय्याही वामनराव परबांच्या वाटेवर.... दोघांनाही सेनेशी पंगा नडला! 

किरीट सोमय्याही वामनराव परबांच्या वाटेवर.... दोघांनाही सेनेशी पंगा नडला! 

मुंबई : मुलूंड विधानसभेतून भाजपचे वामनराव परब हमखास पुन्हा निवडून येणार पण त्यांना त्यांचा कडवा शिवसेना विरोध नडला. 1970च्या दशकात शिवसेना भवनवर झालेल्या हल्ल्यात परब यांनी शिवसेनेचा झेंडा खाली काढला होता. हे कृत्य परब यांना भोवले. तीच गत आता शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या किरीट सोमय्या यांची झाली.

मुलूंडच्या स्थानिक शिवसेनच्या कार्यकर्त्यांनी परब यांच्या उमेदवारीला विरोध केला आणि आयत्या वेळी त्यांच्या जागी किरीट सोमय्या यांना विधानसभेची उमेदवारी दिली. आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या उमेदवारील विरोध केल्यानंतर बरीच चालढकल झाल्यावर आज नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

वामनराव परब 1990 मध्ये मुलूंड मधून आमदार म्हणून निवडून आले होते.जनसंघापासूनचे कार्यकर्ते असलेले परब यांची मतदार संघातही चांगली पकड होती. 1995 च्या निवडणुकीतही तेच निवडून येणार होते. मात्र,ते शिवसेनेला पाण्यातही पाहत नसतं. शिवाजी पार्क येथे 1977 ला जयप्रकाश नारायण यांच्या सभेनंतर जमलेल्या लोकांनी शिवसेना भवनवर हल्ला चढवला होता. त्यावेळी परब यांनी शिवसेना भवनवर चढून शिवसेनेचा झेंडा उतरवला होता.

हे कारण पुढे करत मुलूंडच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी 1995 मध्ये परब यांना उमेदवारी देण्यास विरोध करत मोर्चेही काढले होते. त्यानंतर अनपेक्षित पणे किरीट सोमय्या यांना उमेदवारी मिळाली होती. शिवसेनेच्या 1995 मधील परबांना विरोधाचा सोमय्या यांना फायदा झाला होता. शिवसेनेच्या आता त्याच खेळीने सोमय्या आता घायाळ झाले आहेत. 

गेल्या विधानसभेत युती तुटल्यानंतर सोमय्या यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर माफियागिरीचे आरोप केले होते. महापालिका निवडणुकीच्या काळात तर सोमय्या यांनी पालिकेतील अनेक भ्रष्टाचार उघड केल्याचा दावा करत `मातोश्री`वर हल्ला चढवला होता.

त्यानंतर लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली तशी युतीच्या मनोमिलाची प्रक्रिया सुरु होऊ लागली. शिवसेना कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागताच त्यांनी सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध सुरू  केला. शिवसेनेने कारवाई केली तरी चालेल पण सोमय्यांच काम निवडणुकीत करणार नाही, असा संदेशच त्यांनी `मातोश्री`वर पाठवला. त्यानंतर आता 16 व्या यादीत भाजपने अखेरीस किरीट सोमय्या यांना डच्चू देत कोटक यांना उमेदवारी जाहीर केली. इतिहासाची पुनरावृत्ती होते ती अशी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com