

मुंबई : सांगली, सातारा, सोलापूर या दुष्काळग्रस्त भागांसाठी वरदान असणाऱ्या टेंभू उपसा सिंचन योजनेबाबत आज विधानसभेत चर्चा झाली. टेंभू योजनेच्या पाण्याच्या फेरनियोजनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. कृष्णा खोरे महामंडळाकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव आला आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्नशील असून एका महिन्याच्या आत यावर ठोस निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात दिली.
आज विधानसभेत २६३ अन्वये अनुदान मागणीवर चर्चा करण्यात आली. विधानसभेतील सर्व सदस्यांनी या चर्चेत भाग घेत जलसंपदा विभागातील विविध प्रकल्पासंबंधी विविध सूचना केल्या. याला उत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचावे यासाठी शासनाचा जलसंपदा विभाग काम करत आहे. गोदावरी थट कालवा दुरुस्तीच्या कामाला महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीत गती मिळाली, पुढील दोन वर्षात मोठे कार्य होईल, असे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे सरकार सत्ते आल्यापासून निळवंडे धरणाच्या कामाला गती मिळाली आहे. कोविडच्या काळात आर्थिक चणचण असताना या प्रकल्पासाठी ८२३ कोटी ७२ लाख रुपये दिले गेले. तर यावर्षी ३६५ कोटींची तरतूद आहे. निळवंडेच्या डाव्या कालव्याचे व उजव्या कालव्याचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे कार्य आपण विशेष प्राधान्याने करत आहोत, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
राज्यात ३० प्रवाही वळण योजना अस्तित्वात आणून मोठ्याप्रमाणात पाणी उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगून जयंत पाटील म्हणाले, दोन नदीजोड योजना प्रस्तावित आहेत. त्यासाठी अहवाल तयार केला जात आहे. या दोन्ही नदीजोड योजनांची कामे आम्ही तात्काळ सुरू करू. गोदावरी खोऱ्यात जसं शक्य होईल तसं पाणी आणण्याचा प्रयत्न करू.
जायकवाडी धरणाचे दोन्ही कालवे अत्याधुनिक करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगून जयंत पाटील म्हणाले, हे काम पूर्ण झाले तर मराठवाड्यातील पाणी टंचाई असलेल्या भागांना पाणी मिळेल. मराठवाड्याकडे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे, मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष आम्हाला कमी करायचे आहे. कोरोनाच्या काळात पहिल्या वर्षी निधीची कमतरता आली. मात्र, आम्ही मागे हटलो नाही, असे सांगून जयंत पाटील म्हणाले, ''प्रकल्प पूर्ण करण्याचे कालबद्ध कार्यक्रम आम्ही आखले आहेत. त्यामुळे येत्या काळात १०४ प्रकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत.''
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.