दिलीप गांधींचे पुनर्वसनाच्या शक्यतेने नेवासे तालुक्यातील दिग्गजांना धोक्याची घंटा

भाजपची हवा असतानाही लोकसभा निवडणुकीत पक्षहितासाठी उमेदवारीला तिलांजली द्यावी लागलेल्या माजी खासदार व नगर शहर-जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांचे आता नेवाशातून पुनर्वसन करण्याचे घाटत आहे. गांधी यांना नेवासे विधानसभा मतदारसंघातून लढविण्याबाबत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात चर्चा सुरू असून, लवकरच त्याबाबतचा ठोस निर्णय होईल, असे खात्रीलायक सांगण्यात येते. त्यामुळे गांधी यांची पक्षनिष्ठा फळाला येणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे नेवासे विधानसभा मतदारसंघातील दिग्गजांना धोक्याची घंटा आहे.
दिलीप गांधींचे पुनर्वसनाच्या शक्यतेने नेवासे तालुक्यातील दिग्गजांना धोक्याची घंटा

नगर : भाजपची हवा असतानाही लोकसभा निवडणुकीत पक्षहितासाठी उमेदवारीला तिलांजली द्यावी लागलेल्या माजी खासदार व नगर शहर-जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांचे आता नेवाशातून पुनर्वसन करण्याचे घाटत आहे. गांधी यांना नेवासे विधानसभा मतदारसंघातून लढविण्याबाबत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात चर्चा सुरू असून, लवकरच त्याबाबतचा ठोस निर्णय होईल, असे खात्रीलायक सांगण्यात येते. त्यामुळे गांधी यांची पक्षनिष्ठा फळाला येणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे नेवासे विधानसभा मतदारसंघातील दिग्गजांना धोक्याची घंटा आहे.

पक्ष, व्यक्तिगत पातळी व नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या माध्यमातून गांधी यांचा नेवाशात आजही तगडा संपर्क आहे. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ वर्तुळातही गांधी यांचा बोलबाला आहे. त्यामुळेच गांधी यांचे पुनर्वसन करण्याची लगबग सुरू झाल्याचे सांगण्यात येते. 

मूळ गावाची नाळ कायम
नगरसेवक ते थेट खासदार असा दिलीप गांधी यांचा प्रवास आहे. जेव्हा भाजपचे मोजकेच पदाधिकारी खडतर राजकीय परिस्थितीत पक्षाचे काम करीत होते, तेव्हापासून गांधी सक्रियपणे कार्यरत आहेत. नेवासे तालुक्‍यातील रस्तापूर हे मूळ गाव असलेल्या दिलीप गांधी यांना 1995 मध्ये थेट खासदारकीची संधी मिळाली. त्या काळात नेवासे तालुका हा नगर लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत होता. गांधी यांनी विविध समाजघटकांना बरोबर घेऊन पक्षबांधणी केली. त्यामुळे ते एकट्या जैन समाजापुरते सीमित राहिले नाहीत. सर्व समाजघटकांमध्ये त्यांचा वावर कायम राहिला आहे. पुढे नगर अर्बन मल्टिस्टेट शेड्यूल्ड बॅंकेच्या (पूर्वीची नगर अर्बन बॅंक) माध्यमातूनही त्यांनी नेवासे तालुक्‍यातील बाजारपेठांच्या गावांसह इतर गावांमध्येही काम केले. 

उमेदवारी डावलली; पक्षनिष्ठा कायम 
पुढच्या म्हणजे 2004 च्या लोकसभेला गांधी यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. पण विचलित न होता गांधी यांनी पक्षनिष्ठा जोपासली. त्याचा परिपाक म्हणून त्यांना 2009 व 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळाली. विशेष म्हणजे गांधी चांगल्या मताधिक्‍याने दोन्ही वेळा निवडून आले. या दोन्ही टर्ममध्ये गांधी यांचे नगर जिल्ह्यातील व पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळातील वजन चांगलेच वाढले. दरम्यानच्या काळात केंद्रात जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. गांधी यांना मंत्रिपद मिळाले, तेव्हा राजकारण व माध्यम क्षेत्रातील अनेकांनी तोंडात बोटे घातली. मंत्री म्हणूनही जेमतेम शिकलेल्या गांधी यांनी आपल्या कौशल्याने देशपातळीवर चांगले काम केले. 

कॉंग्रेसवरील स्ट्राईकसाठी केला त्याग 
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांना लोकसभेची उमेदवारी देऊन कॉंग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची व्यूहरचना भाजपने केली होती. त्याचाच एक भाग म्हणून गांधी यांना उमेदवारी डावलण्यात आली. त्या वेळी गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी व त्यांचे समर्थक बंडखोरीच्या पवित्र्यात होते. परंतु दिलीप गांधी यांनी हे बंड शमवीत पक्षाच्या कामाला प्राधान्य दिले. डॉ. सुजय यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या मताधिक्‍यात गांधी यांचाही वाटा असल्याचे पक्षाची मंडळी नाकारत नाहीत. लोकसभा प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगरला झालेल्या सभेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच गांधी यांच्या त्यागाचा उल्लेख करीत त्यांना न्याय देणार असल्याची भूमिका व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांच्या त्या जाहीर वक्तव्यालाही गांधी यांच्या नेवाशातून होऊ घातलेल्या संभाव्य पुनर्वसनाला विशेष महत्त्व असल्याचे बोलले जाते. 

नेवाशातील निष्ठावंतांनीही केली मागणी 
नेवाशातील दिनकर गर्जे, सचिन देसर्डा, नितीन दिनकर, रामचंद्र खंडाळे, ऍड. संजय लवांडे, कुंदन भंडारी यांच्यासह मोजक्‍या निष्ठावंतांनी नेवासे तालुक्‍यातून आमदार बाळासाहेब मुरकुटे (भाजप) व माजी आमदार शंकरराव गडाख (शेतकरी क्रांतिकारी पक्ष) यांच्याबाबत जनतेच्या खूप तक्रारी असल्याने दिलीप गांधी यांची भाजपकडून उमेदवारी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा दावा केला आहे. आमदार मुरकुटे यांच्या देवगाव गावात, तसेच भाजपचे वर्चस्व मानले जात असलेल्या भेंडे जिल्हा परिषद गटातही भाजपची चांगलीच पीछेहाट झाल्याचे ही मंडळी वरिष्ठांना पटवून देत आहे. विधानसभेनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, मुळा साखर कारखाना, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ आदी ठिकाणी मुरकुटे यांना अपयश आल्याचेही पक्षाच्या वरिष्ठांना सांगण्यात येत आहे. संघ परिवारातील ज्येष्ठांच्या मनातही ही बाब ठसविण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे गांधी यांची उमेदवारी निश्‍चित झाल्यास मुरकुटे व गडाख यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. 

विखेंचीही मूक संमती असणे स्वाभाविक 
सुजय विखे पाटील यांना खासदारकी मिळाल्यानंतर आता त्यांचे वडील राधाकृष्ण यांनाही या आठवड्यात कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्‍यता आहे. विखे यांनाही राज्याबरोबरच स्वतःच्या होम पीचवर चमकदार कामगिरी करून दाखवावी लागेल. त्या पार्श्‍वभूमीवर विधानसभेची एकेक जागा महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे विखेही गांधी यांच्या पुनर्वसनासाठी सकारात्मक असणे स्वाभाविक आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी स्वतः लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीची सूत्रे हाती घेतली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस व राधाकृष्ण विखे पाटील यांची राजकीय मैत्रीही सर्वश्रुत आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांना गांधी यांना "प्रोजेक्‍ट' करावयाचे झाल्यास विखे यांच्या इशाऱ्यावर मुरकुटे यांनाही गांधी यांची पाठराखण करावी लागणार आहे, हे उघड गुपित आहे. एकंदर गांधी यांच्या पुनर्वसनावर भाजपचे एकमत झाल्याचे चित्र सध्या तरी आहे, हे मात्र नक्की. 

इफ्तार पार्टी अन्‌ तालुक्‍याचा दौराही! 
नेवाशातून लढण्यासाठी भाजपच्या निष्ठावंतांनी दिलीप गांधी यांची आज नगरला भेट घेऊन त्यांना गळ घातली. गांधी यांनीही या मंडळींना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 4 जूनला नेवाशात गांधी यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वधर्मीयांचा मेळावा, असे स्वरूप या "इफ्तार'ला देण्यात येणार आहे. कदाचित गांधी यांच्या नेवाशातील प्रचाराची ही सुरवात ठरेल. त्यानंतर गांधी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने नेवासे तालुक्‍याचा दौराही सुरू करणार असल्याची माहिती समजली आहे. गांधी यांनीही "सकाळ'शी बोलताना याबाबत दुजोरा दिला. 

पक्ष सांगेल तसे : दिलीप गांधी
मी पक्षाचा पाईक आहे. भाजप माझ्या नसानसांत भरलेला आहे. पक्षाने थांबायला सांगितले, तर थांबतो. लढण्याचा आदेश दिला की लढतो. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करीत पक्षादेश पाळणार आहे. 
- दिलीप गांधी, माजी खासदार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com