नगर-शिर्डी - विश्‍लेषण : सुप्त मोदीलाटेचा फायदा

चुरशीच्या लढती झालेल्या नगर व शिर्डी मतदारसंघांतील अंदाज कुणालाही वर्तवता आला नव्हता. नगरमधून भाजपचे डॉ. सुजय विखे-पाटील आणि शिर्डीतून शिवसेनेचेच्या सदाशिव लोखंडे यांचे मताधिक्‍य पाहता, नगर जिल्ह्यातही सुप्त मोदीलाट होती, असे म्हणायला वाव आहे.
नगर-शिर्डी - विश्‍लेषण : सुप्त मोदीलाटेचा फायदा

नगर : डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिवंगत आजोबा बाळासाहेब विखे पाटील, वडिल राधाकृष्ण विखे पाटील, आई शालिनी यांच्या "रेडिमेड प्लॅटफॉर्म'चा "इमेज बिल्डिंग'साठी फायदा करून घेतला. या तिघांचे काम आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या जनसंपर्काचा लाभ सुजय यांना झाला.

"राष्ट्रवादी'चे आमदार संग्राम जगताप यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. "नेक टू नेक फाइट' असे वर्णन झालेल्या या निवडणुकीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः लक्ष ठेवून होते. मात्र, विखेंची "सर्वार्थाने' तयारी व सुप्त मोदी लाटेपुढे जगताप यांचा निभाव लागला नाही.मोदी यांच्या नगरच्या सभेत खासदार दिलीप गांधी यांचे भाषण थांबविल्याने उठलेले वादळ, गांधी यांना उमेदवारी नाकारल्याने जैन समाजाची विखे यांच्याबद्दलची कथित नाराजी, संग्राम यांचे सासरे व भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डिले यांनी अखेरच्या क्षणी जावयाला दिलेले झुकते बाब आदी बाबी विखेंनी योग्य पद्धतीने हाताळल्या. त्याही सुजय यांच्या विजयासाठी पूरक ठरल्या. 

राहुल यांच्या सभेचा परिणाम नाही
राधाकृष्ण विखे-पाटील आणि आमदार बाळासाहेब थोरातांनी शिर्डीची जागा प्रतिष्ठेची केली होती. विखेंनी ताकद लावल्याने शिर्डीतच लोखंडे यांना 60 हजारांची आघाडी मिळाली. थोरातांचा संगमनेर व पिचडांचा अकोले तालुका वगळता कांबळे यांना अन्य मतदारसंघांत मताधिक्‍य मिळाले नाही. राहुल गांधी यांच्या सभेचा परिणाम संगमनेरपुरता मर्यादित राहिला. श्रीरामपूरच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विखे यांना, "आमची एवढे सीट काढून द्या,' असे आवाहन केले होते. त्यामुळे विखे यांच्या "गुड बुक'मध्ये नसतानाही लोखंडे पुन्हा खासदार झाले. 

हा विजय आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांन अर्पण करतो. विखे-पाटील यांच्या नातवाचे हट्ट मतदारांनी पुरविले. मला कुठल्या अन्य आजोबांची गरज नाही. महाराष्ट्रातील पहिल्या तीन मताधिक्‍यापैकी माझे मताधिक्‍य आहे. मित्रपक्षांचे नेते, आमदार, पालकमंत्री यांचे आभार.
- डॉ. सुजय विखे पाटील

जनता, राधाकृष्ण विखे-पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे मला विजय मिळाला. मतदारसंघातील प्रश्‍न सोडविण्यासाठी कटिबद्ध असेन.
- खासदार सदाशिव लोखंडे

जनतेला गृहित धरून निवडणुका लढविण्याचे दिवस संपले. आपल्यासाठी कोण काम करू शकतो, याची कल्पना मतदारांना आली आहे. परिवर्तनासाठी मोदी आणि फडणवीस यांनी केलेली कामे प्रत्यक्षात उतरल्याचे जाणवते. 
- राम शिंदे, पालकमंत्री 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com