मुंबई : रोहा एमआयडीसीमधील कुठलीही कंपनी आम्हाला बंद करायची नाही, पण येथील एकाही कामगारावर जर अन्याय झाला तर मात्र भारतीय जनता पक्ष त्या कामगाराच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहील, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रोहा येथे दिला.
रोहा एमआयडीसीमधील एका कंपनीमधील दिनेश भोगटे या कामगाराला अन्यायाने कामावरून काढल्याविरोधात बुधवारी दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून कंपनीवर धडक देण्यात आली. याप्रकरणी त्या कंपनीच्या व्यवस्थापनाला विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी जाब विचारला. यासंदर्भात कंपनीचे अधिकारी दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहितीही दरेकर यांनी दिली.
दरेकर यांनी यापूर्वीही स्थानिकांची नोकरभरती करण्याबाबत आरसीएफला देखील इशारा दिला होता. यावेळी दरेकर यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी सदैव कामगारांच्या पाठीशी आहे. रोहा एमआयडीसी मधील काही कंपन्या कामगारांची पिळवणूक करीत असून वेठबिगाराप्रमाणे वागणूक देत असल्याच्या तक्रारी आहेत.
या कंपन्यांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही. कंपनीने कामगारांवर अन्याय केला तर भारतीय जनता पक्षाची पहिली वज्रमूठ त्या कंपनीवर पडेल. यासाठी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी कामगारांच्या बाजूने उभे रहावे.
कामगारांनीही चुकूनही चुकीचे वर्तन करू नये, चांगल्या प्रकारे काम करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मेक इन इंडियाचे धोरण असल्यामुळे आपल्या चुकीच्या वर्तनाने चांगले कारखाने बंद पडणार नाहीत याची दक्षता घ्या. कारण कामगार टिकला तर मेक इंडिया यशस्वी होऊ शकतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अन्यायग्रस्त कामगारांचा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याची आमची तयारी आहे, पण कंपनी प्रशासनाने मुजोरी दाखविली आणि कामगारांवर अन्याय केला तर मात्र, त्या कंपनीविरुध्द लढा उभारून आम्ही टोकाची भूमिका घेऊ, असा इशाराही दरेकर यांनी दिला. या मोर्च्यामध्ये आमदार रवीशेठ पाटील, भाजपचे रायगडचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग, वैकुंठ पाटील, राजेश मापारा, तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.