परांडा : शिवसेनेचे आमदार तानाजी सांवत यांचे चिरंजीव गिरीराज व पिंपरी चिंचवडचे शहर भाजप अध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची पुतणी राजेश्वरी रविवारी परांडा-सोनारी येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द झाले. त्यांच्यासोबतच 111 जोडप्यांच्या लग्नगाठी देखील यावेळी बांधल्या गेल्या.
सांवत आणि जगताप या दोन राजकीय घराण्यांनी विवाह सोहळ्यावर उधळपट्टी न करता सामुदायिक विवाह सोहळ्यात गिरीराज आणि राजेश्वरीचा विवाह लावण्याचा निर्णय घेत आदर्श निर्माण केल्याची चर्चा या निमित्ताने विवाहस्थळी होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे या विवाह सोहळ्या प्रसंगी गिरीराज- राजेश्वरी यांच्यासह विवाहबध्द झालेल्या 111 जोडप्यांना आर्शिवाद देण्यासाठी उपस्थित होते.
शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर, पालकमंत्री अर्जुन खोतकर, मदन येरेवार, संजय राठोड, सहपालकमंत्री महादेव जानकर, खासदार विजयसिंह मोहिते, सिनेकलावंत नितीश चव्हाण, शिवानी बावकर, शशांक केतकर, नेहा पेंडसे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार प्रशांत परिचारक, मधुकरराव चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, दिनकर माने, राजन पाटील, महेश लांडे, राजाभाऊ राऊत, रश्मी बागल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे बाळासाहेब हाडोग्रींकर या राजकीय मंडळीसह सर्वच स्तरातील वऱ्हाडी या सोहळ्याला हजर होते.
जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (ता. 18) स्व. बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्याच्या मैदानावर हा विवाह सोहळा संपन्न झाला. प्रा. तानाजी सावंत व प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने 18 वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.