पिंपरीतील नेत्यांच्या एकत्रित फराळावर सोशल मिडियातून बाण 

भाजप, शिवसेना,राष्ट्रवादी,मनसे,कॉंग्रेस अशा सर्वच पक्षांच्यानेत्यांचा एकत्रित फराळ झाला. त्याची चव जिभेवरून जाण्याच्या आधीच नेटिझन्सनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे. एकमेकांना खंडणीखोर, एजंट, असे एकमेकांना म्हणणारे नेते हास्यविनोद करताना पाहूनकार्यकर्तेही बुचकळ्यात पडले. त्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. पण, त्याचा उपयोग जनतेच्या प्रश्‍नांसाठी, शहराच्या विकासासाठी ते का एकत्र येत नाहीत, असाही प्रश्न उपस्थित झाला.
पिंपरीतील नेत्यांच्या एकत्रित फराळावर सोशल मिडियातून बाण 

पिंपरी : दिवाळी निमित्त शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते शनिवारी प्राधिकरणातील एका हॉटेलमध्ये एकत्र आले. एरवी एकमेकांवर खालच्या पातळीवरून चिखलफेक करणाऱ्या या नेत्यांना फराळाचे निमित्त एकत्र येण्यासाठी पुरेसे ठरते, मग जनतेच्या प्रश्‍नांवर, शहराच्या विकासाच्या प्रश्‍नांवर हे नेते एकत्र का येत नाहीत, असा सवाल करत हे वागणं बरं नव्हं... अशा शब्दांत नागरिकांनी नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. 

दिशा सोशल फाउंडेशनच्या या कार्यक्रमाला शहरातील सर्व नेत्यांनी झाडून हजेरी लावली. फराळाचा आस्वाद घेत हास्यविनोदात रंगलेल्या या नेत्यांचे छायाचित्र वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले आणि फेसबूक, व्हॉट्‌स ऍपवरून जनतेने प्रश्‍नांचा भडिमार सुरू केला. भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यातील सख्य सर्व शहराला माहिती आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि जगताप यांचेही राजकीय संबंध विळ्याभोपळ्याचे आहेत. महापालिकेत शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे विरोधीपक्षासारखे भाजपच्या कारभारावर तुटून पडतात. पण, येथे मात्र सर्वजण हास्यविनोदात दंग झालेले दिसतात. कार्यकर्त्यांनी भांडायचे आणि नेत्यांनी गळ्यात गळे घालायचे असे चित्र यावरून स्पष्ट होत असल्याचे काही नेटिझन्सनी म्हटले आहे.

एकत्र आलेल्या नेत्यांमध्ये गाववाल्यांचा भरणा अधिक आहे. शिवाय भाजपचा एकही जुना नेता दिसत नाही,असेही निरीक्षण सोशल मीडियावरील कॉमेंट्‌स पहावयास मिळाले.  हा फोटो कट्टर कार्यकर्त्यांना समर्पित, अशी टॅगलाइन करून वापरला आहे. त्यावरही आता कार्यकर्त्यांनी सावध व्हावे, असा सल्ला देण्यात आला आहे. 

जनतेच्या प्रश्नांची जंत्री 

शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. वायसीएम, तालेरासह इतर रुग्णालयांतून सुमारे दोन हजार डेंगीचे रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. खाटा नसल्याने रुग्णांना अक्षरश: जमिनीवर झोपविले जात आहे. पाणी, वीज, रस्ते यांची दुरवस्था आहे. शहरात कचऱ्याच्या मुद्यावरून राजकारण सुरू आहे. स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. वाहतुकीचा प्रश्‍न दिवसेंदिवस जटिल होत आहे. मेट्रोमुळे खणून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे ग्रेडसेपरेटरची वाट लागली आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडी-निगडी रस्त्यावरील नियोजित बीआरटी मार्गामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहतुकीला तो अडथळा ठरत आहे. सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्‍नही गंभीर होत आहे. अनधिकृत बांधकामाचा प्रश्‍न काही अंशी मार्गी लागला असला, तरी रिंगरोडवरून आंदोलने सुरू आहेत अशी जंत्रीच मांडण्यात आली आहे. 

रिंगरोड बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये टोकाची मते आहेत. आंदोलन झाले त्यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. तर आंदोलकांना समजावयाला गेलेल्या जगताप व एकनाथ पवार यांना भर सभेतून काढता पाय घ्यावा लागला होता. राष्ट्रवादीनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला. पण, दिवाळीच्या फराळाला मात्र ही नेतेमंडळी मांडीला मांडी लावून बसलेली दिसली. खरेतर या आंदोलकांच्या मागे एकही राजकीय पक्ष उभा नाही. कारवाई थांबविली नाही, तर हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com