पिंपरीत विकास कामांना 'अच्छे दिन' : भाजपडून अवघ्या आठ महिन्यांत 35 टक्के खर्च

पिंपरीत विकास कामांना 'अच्छे दिन' : भाजपडून अवघ्या आठ महिन्यांत 35 टक्के खर्च

भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्ता स्थापन केल्यानंतर शहरातील विकास कामांना 'अच्छे दिन' आले आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत चालू वर्षी पहिल्या आठ महिन्यांतच विकासकामांवर सर्वाधिक खर्च करून भाजपने बाजी मारली आहे.

पिंपरी : भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्ता स्थापन केल्यानंतर शहरातील विकास कामांना 'अच्छे दिन' आले आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत चालू वर्षी पहिल्या आठ महिन्यांतच विकासकामांवर सर्वाधिक खर्च करून भाजपने बाजी मारली आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना 2015-16 या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत भांडवली कामांवर अर्थसंकल्पात एकूण तरतूद रक्कमेपैकी 29.23 टक्के रक्कम खर्च झाली होती. 2016-17 या आर्थिक वर्षात याचकालवाधीत भांडवली कामांवर 16.84 टक्के खर्च झाला होता. भाजपची सत्ता आल्यानंतर 2017-18 या आर्थिक वर्षात पहिल्या आठ महिन्यांत भांडवली कामांवर 34.79 टक्के रक्कम खर्च झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सलग दहा ते बारा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती. मात्र, फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला धोबीपछाड देत भाजपने सत्ता हस्तगत केली. त्यानंतर महापालिकेचा कारभार कसा चालणार, विकासकामे कशी राबविली जाणार, या बाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. महापालिका निवडणुकीला सामोरे जात असताना राष्ट्रवादीने तयार केलेला अर्थसंकल्प मंजूर करण्यापासून ते अंमलबजावणी करण्यापर्यंत भाजपसमोर आव्हान होते. मात्र, हे आव्हान भाजपने पेलले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

गेल्या दोन आर्थिक वर्षांत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत विकास कामांवर झालेल्या खर्चाची आकडेवारी पाहिल्यास भाजपने राष्ट्रवादीवर मात केल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना 2015-16 या आर्थिक वर्षांमध्ये 1 एप्रिल ते 30नोव्हेंबर या आठ महिन्यांत विकासकामांवर अर्थसंकल्पातील तरतूद रक्कमेपैकी 29 .23 टक्के रक्कम खर्च झाले होते. त्याच्या पुढचे आर्थिक वर्ष म्हणजे2016- 17 हे निवडणुकीचे वर्ष होते. या आर्थिक वर्षात पहिल्या आठ महिन्यांत विकासकामांवर अवघे 16.84 टक्के रक्कम खर्च झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. महापालिकेत भाजप प्रथमच सत्तेवर आला.

भाजपने अर्थसंकल्पाचे काटेकोर पालन करत विकास आराखड्याच्या शंभर टक्के अंमलबजावणीला महत्त्व दिले. त्याच प्रमाणे मोठ्या प्रकल्पांसह लहान कामांनाही महत्त्व देऊन त्यांना तातडीने मंजुरी देण्याची प्रशासकीय प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे अर्थसंकल्पावरील अंमलबजावणीबाबत भाजपने राष्ट्रवादीवर मात केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. महापालिकेचा 2017-18 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 5 हजार 150 कोटी 87 लाख रुपये इतका आहे. त्यामध्ये जेएनएनयुआरएम व केंद्र सरकारच्या इतर महत्त्वाच्या योजनांचाही समावेश आहे. या अर्थसंकल्पात भांडवली कामांसाठी तरतूद एकूण रक्कमेपैकी गेल्या आठ महिन्यात 34.79 टक्के रक्कम खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे सत्ताधारी म्हणून राष्ट्रवादीपेक्षा भाजपच्या काळात विकासकामांना 'अच्छे दिन' आल्याचे चित्र आहे.

स्थापत्य विभागाकडून मागील तीन आर्थिक वर्षांत
एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान झालेला भांडवली खर्च (सर्व आकडे कोटीत)

सन           असलेली तरतुद      झालेला खर्च       टक्केवारी
2015-16  647,01,43,000   189,14,28000     29.23
2016-17  618,43,47,000   104,16,66000     16.84
2017-18  793,28,85000     275,94,85000    34.79

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com