पिंपरीच्या वायसीएममध्ये सुरु आहे 'दुकानदारी'

जुन्नर आणि लोणावळ्यापासूनचे नागरिक स्वस्तात आणि खात्रीशीर उपचार मिळत असल्याने वायसीएम रुग्णालयात येतात महागड्या उपचारांमुळे खासगी रुग्णालय डावलून आलेल्यांना येथील डॉक्‍टर पुन्हा खासगी रुग्णालयाची वाट दाखवत आहेत. यातून डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांना दरमहा हजारो रुपयांचे कमिशन मिळत आहे. मात्र सामान्य नागरिकांना आयुष्याची पुंजी खर्च करावी लागत आहे.
पिंपरीच्या वायसीएममध्ये सुरु आहे 'दुकानदारी'

पिंपरी (पुणे) : वायसीएम रुग्णालयात आलेल्या रुग्णांना खासगी दवाखान्यात येण्यास सांगणे, अतिदक्षता विभागात जागा नसल्याचे सांगून खासगी रुग्णालयात पाठविणे, बाहेरील औषध ठराविक दुकानामधून घेण्यास सांगणे आणि रुग्णवाहिका चालकाच्या मदतीने रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवून कमिशन उकळणे, हे प्रकार सध्या जोरदार सुरू आहेत. ज्यांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नाहीत असेच रुग्ण वायसीएममध्ये येतात. मात्र डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांकडून त्यांची लूट सुरू आहे. प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. 

जुन्नर आणि लोणावळ्यापासूनचे नागरिक स्वस्तात आणि खात्रीशीर उपचार मिळत असल्याने वायसीएम रुग्णालयात येतात महागड्या उपचारांमुळे खासगी रुग्णालय डावलून आलेल्यांना येथील डॉक्‍टर पुन्हा खासगी रुग्णालयाची वाट दाखवत आहेत. यातून डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांना दरमहा हजारो रुपयांचे कमिशन मिळत आहे. मात्र सामान्य नागरिकांना आयुष्याची पुंजी खर्च करावी लागत आहे. कधी कधी तर कर्त्या पुरुषाला वाचविण्यासाठी शेती आणि घरही गहाण ठेवावे लागत आहे. 

वायसीएम रुग्णालयात आलेल्या गरीब रुग्णांना आपल्या खासगी रुग्णालयात चांगले उपचार होतील, असे सांगत वैद्यकीय सेवेतला एक डाॅक्टर चांगलाच तरबेज शिकारी झाला आहे. या डॉक्‍टरच्या ओपीडीच्या टेबलच्या खणामध्ये खासगी रुग्णालयाच्या व्हिजिटिंग कार्डचा गठ्ठा ठेवला आहे. आपल्यावर कोणी कारवाई करू शकत नाही, असा त्यांचा समज झाला आहे. हाडांच्या उपचारासाठी वायसीएममध्ये आलेल्या जी. प्रदीप या रुग्णाला बाहेरील ठराविक मेडिकलमधून औषधे घ्या, असे सांगून हा डॉक्‍टर परस्पर निघून गेला. वायसीएम रुग्णालयात सर्व प्रकारची औषधे मिळत असताना, अशी सक्‍ती का, असा प्रश्‍न रुग्ण विचारत आहेत. 

वायसीएममध्ये आलेल्या रुग्णास तातडीने अतिदक्षता विभागाची गरज आहे. पण आमच्याकडे बेड उपलब्ध नसल्याने तुम्ही त्वरित ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला सीएमओ नातेवाइकांना देतात. मात्र, एवढ्या लांब जाऊनही तुम्हाला अतिदक्षता विभाग मिळण्याची खात्री नाही. तुम्हाला जर अतिदक्षता विभाग पाहिजे असल्यास तुमच्यासाठी मी प्रयत्न करतो, असे सांगत येथे आलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवून हजारो रुपयांचे कमिशन उकळले जाते. 

वायसीएममधील एक कर्मचारी रुग्णालयाच्या परिसरात अगदी सुटीच्या दिवशीही फिरत असतो. येथे तुम्हाला चांगले उपचार मिळणार नाहीत, अशी भीती तो रुग्णांना दाखवतो. रुग्णवाहिका चालकांना तो त्याने सांगितलेल्या रुग्णालयात नेण्यास सांगतो. 

रुग्णांना अशी वागणूक कोणी देत असेल आणि वायसीएम रुग्णालयास बदनाम करीत असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. 
- डॉ. पवन साळवी, वायसीएम रुग्णालय प्रमुख

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com