एसटीतील ते आमदार पाहण्यासाठी वाहकासह वरिष्ठही आले!

गणपतराव आबांच्या बाबतीत असे अनेक किस्से आहेत. सन 1978 मध्ये आबा पुलोद सरकारमध्ये मंत्री होते. पण, त्यांनी कधीही पत्नी, मुले यांना मुंबईला मंत्री निवासात नेलं नाही. त्या वेळी ज्या क्षणाला आबांचे मंत्रिपद गेलं, तेव्हा आबांनी सरकारी बंगला, गाडी लगेच सोडली. तिथून ते टॅक्‍सीने परेल एसटी स्टॅंडवर गेले आणि मुंबई-सांगोला गाडीने गावाकडे आले.
Seniors also came with the conductor to see the MLA from ST
Seniors also came with the conductor to see the MLA from ST

पुणे : काही व्यक्तींचे साधेपण हेच त्यांचे मोठेपण असते. अशा व्यक्तीमत्त्वांपैकी एक म्हणजे सांगोल्याचे माजी आमदार, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख. त्यांच्या साधेपणाच्या अनेक कथा या दंतकथा बनल्या आहेत. त्यांच्या साध्या वागण्यातून ते किती मोठे आहेत, हे पदोपदी जाणवत राहते. 

मुंबईला जायचं होतं; म्हणून गणपतराव ऊर्फ आबा देशमुख एक दिवस सातारा एसटी स्टॅंडवर आले. मुंबईला जाणाऱ्या गाडीत ते बसले. त्यानंतर थोड्या वेळाने वाहक गाडीत येऊन बुकिंग करू लागला. तिकीट काढत तो आबांजवळ आला, तेव्हा आबा म्हणाले, "मला मोफत प्रवास आहे. मी आमदार आहे.' ते वाहक आबांना ओळखत नव्हते. पण, त्यांना एक आमदार आपल्या गाडीतून प्रवास करत आहेत, याचंच आश्‍चर्य वाटलं. ते सरळ गाडीतून खाली उतरले आणि वरिष्ठांना जाऊन ही गोष्ट सांगितली. गाडीत बसलेले आमदार नेमके कोण? हे बघायला वाहकासोबत त्यांचे वरिष्ठही आले. त्यांनी येऊन बघितलं तर ते आमदार होते, गणपतराव देशमुख. आबांना बघून त्यांना खूप आनंद झाला. ते आबांना सन्मानाने कार्यालयात घेऊन गेले. त्यांचा सत्कार केला. आबांच्या साधेपणाचे दर्शन सर्व प्रवासी, एसटी कर्मचारी यांना झाले. 

मंत्रिपद जाताच बंगला गाडी सोडली 

गणपतराव आबांच्या बाबतीत असे अनेक किस्से आहेत. सन 1978 मध्ये आबा पुलोद सरकारमध्ये मंत्री होते. पण, त्यांनी कधीही पत्नी, मुले यांना मुंबईला मंत्री निवासात नेलं नाही. त्या वेळी ज्या क्षणाला आबांचे मंत्रिपद गेलं, तेव्हा आबांनी सरकारी बंगला, गाडी लगेच सोडली. तिथून ते टॅक्‍सीने परेल एसटी स्टॅंडवर गेले आणि मुंबई-सांगोला गाडीने गावाकडे आले. अलीकडच्या काळात दंतकथा वाटतील, अशा आबांच्या सत्यकथा आहेत. आबांचे अवघे जीवन अशा साधेपणानी भरले आहे. 

आंब्याच्या झाडाखाली जेवण 

एक गोष्ट तर त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितलेली आहे. आबा कोल्हापूरला निघाले होते. जेवणाची वेळ झाली. मग आबांनी एका शेताजवळ गाडी थांबवायला लावली. तिथं शेतात पाणी सुरू होत. एका आंब्याच्या झाडाखाली बसून दोघांनी जवळची भाकरी खाल्ली आणि पुढच्या प्रवासाला निघाले. चालक नवीन होता, त्याला या गोष्टीचं खूप आश्‍चर्य वाटलं. 

विधिमंडळातील आबासाहेब 

महाराष्ट्राच्या विधिमंडळात सर्वपक्षीय आमदारांना ज्यांच्याबद्दल आदर वाटतो, असे आबा. पण हा आदर वाटण्याचं कारण म्हणजे आबांची साधी राहणी आणि समतोल विचारसरणी. सगळे त्यांना प्रेमाने "आबासाहेब' म्हणतात. पण, आबासाहेब या पदापर्यंत येण्यासाठी गणपतराव देशमुखांनी घेतलेले कष्ट, जपलेली समाजाची बांधिलकी या गोष्टींचा अभ्यास करण्याची गरज आहे. 

राज्यातील अनेक कार्यकर्त्यांना आधार 

आबांचे वय आता 93 वर्ष आहे. पण, कोणी पोस्ट कार्ड टाकले तरी त्याची ते दखल घेतात. एवढ्या वयातही ही उर्जा कोठून येते, असा प्रश्‍न त्यांच्याकडून पाहून पडतो. देशमुख हे सांगोल्याचे आमदार आहेत. पण, ते सगळ्या महाराष्ट्रातील जनतेचे आहेत. आजही आबांकडे पाहून आम्हाला आधार वाटतो, असे सांगणारे कार्यकर्ते गावोगावी भेटतात. आबांचे आयुष्य हीच या कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे. 

बारा निवडणुकीत विजय 

आबांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात दोन अपवाद वगळता 12 वेळा निवडणुकीत विजय मिळवला आहे. दोन वेळा मंत्रिपदाची संधी मिळाली, तरीही ते आयुष्यभर साधेच राहिले. गणपतराव देशमुख यांचा आज (ता. 10 ऑगस्ट) वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना निरोगी, दीर्घायुसाठी शुभेच्छा! 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com