निवडणूक येता जवळी, आढळराव पोचती वाडीवस्तीवरी!

निवडणूक येता जवळी, आढळराव पोचती वाडीवस्तीवरी!

पाईट : खेड-शिरूर हा लोकसभा मतदारसंघ मोठा आहे. सर्वसामान्यांच्या समस्या विचारात घेण्यासाठी मी आलो आहे, असे सांगत शिवसेनेचे खासादर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सध्या वाड्यावस्त्यांवर भेटी सुरू केल्या आहेत. 

आढळराव पाटील यांची सन 2019 ला होणाऱ्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीची नांदी असल्याचे दिसून येत आहे . त्यांच्या निवडणुकीची पूर्वतयारी नेहमीप्रमाणेच खेड तालुक्‍यातील आदिवासी गावांपासून सुरु होते. या गावभेटीच्या वेळी आमदार सुरेश गोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे व शिवसैनिक उपस्थित होते. 

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावभेटीमधे कोळीये, गडद, आंभू, वांद्रा, आढे, तोरणे खुर्द, विराम, आंबोली, आडगाव, औढे, सातकरवाडी, अनावळे, पाळू या दुर्गम व आदिवासी गावांचा समावेश आहे. या गावांमधील ग्रामस्थ, महिला, तरुणांच्या भेटी घेऊन त्यांच्या मूलभूत समस्यांचा त्यांनी आढावा घेतला. 

यामध्ये प्रामुख्याने पिण्याचे पाणी, रस्ता, वीज यांचा समावेश होता. यावर मार्ग काढण्यासाठी काही गावांमधे त्यांनी विकासकामांबददल आश्वासने दिली तर काही समस्यांबाबत संबंधीत अधिका-यांना दूरध्वनीवरून आढळराव यांनी सूचना दिल्या. 

आंबोली येथील सभेमधे आढळरावांनी माजी आमदार (स्व) नारायणराव पवार यांचा आवर्जून उल्लेख केला. खासदारकीच्या पहिल्या निवडणुकीमधे पवारांच्या सहकार्याचा मोलाचा सिंहाचा वाटा असल्याचेही उपस्थितांसमोर मान्य केले.

कर्जत-भीमाशंकर रस्ता, पुणे- नाशिक रेल्वे, जुन्नर तालुक्‍यातील दा-या घाटामधील रस्ता याबददल माहिती दिली. या रस्त्यांमुळे आदिवासींसाठी दळणवळणाच्या मार्ग सुकर होईल. तसेच या भागातील उत्पादित शेतीमाल तासाभरात मुंबईच्या उपनगरांमधे पोहोचू शकेल. 
कर्जत-भीमाशंकर व दा-या घाट रस्त्यामुळे कल्याण, पनवेल अशा बाजारपेठांपर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचणे आदिवासीना शक्‍य होईल. यासाठी सातत्याने 15 वर्षे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

कर्जत- भीमाशंकर रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी नुकतेच सरकारच्या वतीने सुमारे सहा कोटींचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहीती आढळरावांनी दिली. ठिकठिकाणच्या गावभेटीमधे त्यांनी ग्रामस्थांची निवेदने देखील स्वीकारली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com