समोर नेता असो की अभिनेता चौथ्यांदा लोकसभेत जाणे निश्चित : आढळराव 

समोर नेता असो की अभिनेता चौथ्यांदा लोकसभेत जाणे निश्चित : आढळराव 

पुणे : "इतिहासातील महापुरुषांची प्रतिमा वापरून किंवा त्यांचे नाव वापरून निवडणुकीमध्ये राजकारण करणे दुर्दैवी आहे. माझं नाव शिवाजी आहे, ते नैसर्गिक आहे. पण, समोरचा उमेदवार संभाजी महाराजांची भूमिका करत आहे, म्हणून त्याची सहानुभूती घेणे चुकीचे आहे. पण, लोकं शहाणी झाली आहेत. लोकं सुज्ञ झाली आहेत. त्यांना कळतंय की, 12 इंचाच्या टीव्हीमध्ये कोणाला पहायचे आणि विस्तीर्ण जगामध्ये कोणाला पहायचे,'' असे मत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. 

आढळराव पाटील यांनी सकाळ आणि सरकारनामाच्या फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, "ज्या अर्थी मी फार्म भरला, त्या अर्थी मी जिंकणार. ही माझी तीन निवडणुकांची परंपरा या वेळीही अबाधित राखणार आहे. गेल्या पाच वर्षात माझ्या सरकारने माझ्या मतदारसंघात साडेचौदा हजार कोटींची कामे केली आहेत. अशी कामे पूर्वी झालेली नाहीत. सरकारच्या विविध योजनांचा लाभ लोकांना झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने या सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून टीका केली की हे सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन आहे. शेतकरी विरोधी आहे. उद्योगपतींच्या विचारांचे सरकार आहे. पण, सरकारने शेतकऱ्यांसाठी फार योजना आणल्या आहेत.'' 

"अभिनेत्या विरोधातील ही निवडणूक मला विशेष वाटत नाही. पण, मी कुढल्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखत नाही. मग अभिनेता असो, नेता असो, नाही तर कोणी असो. लोकांचा आशीर्वाद व विकासकामांचे गाठोडे माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे अभिनेता असो नाही तर नट असो, मला काही फरक पडत नाही,'' असा विश्‍वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादीकडून जातीचा मुद्दा 
आढळराव पाटील म्हणाले, ""जातीचा मुद्दा राष्ट्रवादी कॉंग्रेसने आणलेला आहे. त्यांचा जाणीवपूर्वक ट्रॅप होता. शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील व उमेदवार जातीयवादाचे विष पसरविण्याचे काम करत आहेत. मी जे बोललो नाही, त्याचा वापर करून सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जातीपातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी शाहू, फुले, आंबेडकर, प्रबोधनकारांना मानणारा आहे. माझ्या 15 वर्षांच्या काळात मी कधीही जातपात काढली नाही. मी कधीही जातीचा अनादर करणार नाही. शिवसेनेत जात हा प्रकार नसतो.''  

खेडमधून विमानतळ गेल्याचा कोणताही फटका मला बसणार नाही. तो फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेला एक मुद्दा आहे. 2005 ते 13 या आठ वर्षांत सहा वेळा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सर्वे झाला. त्यात सांगितले की, या भागात विमानतळ होऊ शकत नाही. पाईट परिसरात विमान करायचे असेल; तर नदीची दिशा बदलावी लागेल. पाच डोंगर जमीनदोस्त करावे लागतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसने ती फाईल बंद केली. त्यांच्या अपयशाचे खापर खासदारावर फोडण्यासाठी त्यांचा प्रयत्न झाला,'' असा आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले, ""मी मातीतला माणूस आहे. लोकांची दुःख दूर करण्यासाठी मी खासदार झालो आहे. गेल्या 15 वर्षात मी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही. त्यामुळे अँटी इन्कंबन्सीचा फटका मला बसणार नाही. काही प्रमाणात अँटी इन्कंबन्सी आहे. मी गेल्या 15 वर्षांपासून असल्यामुळे ती आहे. पण, अगदी कमी प्रमाणात आहे. पण, लोकं, आढळराव नको तर दुसरं कोण? या प्रश्नावर येऊन थांबतात.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com