BJP Pune| भाजप आमदार सुनील कांबळेंची स्थानिक नागरिकांना दमदाटी
पुणे : पुण्यात भाजप (BJP) आमदाराकडून स्थानिक नागरिकांना दमदाटी केल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. शहरातील कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याकडून मार्केट यार्डमधील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दमदाटी केल्याचा हा व्हिडीओ आहे. तेथील स्थानिक नागरिकांना तिथून हाकलून लावण्यासाठी आमदार कांबळे आणि त्यांचे साथीदार स्थानिकांना दमदाटी करताना दिसत आहेत.
आमदार सुनील कांबळे आणि त्यांच्या साथीदारांकडून मार्केट यार्ड परिसरामधील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये काही स्थानिक नागरिकांना दमदाटी केली जात आहे. एका खाजगी बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी कांबळे आणि त्यांचे साथीदार तेथील झोपडपट्टीतील रहिवाशांना दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा असा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे. इतकेच नाही तर कांबळे यांच्या एका साथीदाराने झोपडपट्टीतील रहिवाशांना मारण्यासाठी हातात लोखंडी हातोडा घेऊन त्यांच्यावर धावल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे आनंदनगर झोपडपट्टी परिसरामध्ये आमदार सुनील कांबळे यांच्याबाबत मोठी दहशत निर्माण झाली आहे.
या प्रकरणी आनंदनगर झोपडपट्टीतील स्थानिक नागरिकांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे तक्रार केली आहे. स्थानिक मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये आमदारांच्या विरोधात तक्रार घेणार नाही, म्हणून नागरिकांनी आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
आमदार सुनील कांबळे यांनी दमदाटी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वीही त्यांनी महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून दमदाटी केली होती. दमदाटी करतानाचा त्यांची कथित ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आमदार सुनील कांबळे यांच्याकडून स्थानिकांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.