पुणे : महाराष्ट्राच्या माजी गृहराज्यमंत्र्याला पुणेरी चोरट्यांनी हिसका दाखवला आहे. त्यासाठी त्यांना पोलिस ठाण्याच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. आता गृहराज्यमंत्र्यांकडे झालेली चोरी पोलिस किती तत्परतेने उघडकीस आणणार, याकडे लक्ष लागले आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात गृहराज्यमंत्री म्हणून काम पाहिलेले आणि सध्या पुणे शहर काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणाऱ्या रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांचे रिव्हाॅल्वर चोरीला गेले आहे. याबाबत त्यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बागवे यांनी दिलेल्या फिर्य़ादित म्हटले आहे की आपण कारमधील सीटच्या मागील कप्प्यात रिव्हॉल्व्हर ठेवले होते. २८ डिसेंबर दिवशी दिवसभर विविध कार्यक्रम होते. त्या दरम्यान, चोरट्याने कारमधून हे रिव्हॉल्व्हर लंपास केले आहे. काही वेळेने हे रिव्हॉल्व्हर चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर घरात देखील सर्व ठिकाणी शोधले. त्यानंतर आता खडक पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे. गंजपेठेतील अरुणकुमार वैद्य स्टेडिअमसमोर बागवे यांनी गाडी पार्क केली होती.
ही चोरी कशी झाली, याचा उलगडा बागवे यांना अद्याप झाला नाही. सुमारे एक लाख रुपये किमतीचे हे रिव्हाॅल्वर होते. हे रिव्हाॅल्वर लोडेड (गोळ्या भरलेले) होते की नाही, याची माहिती समजू शकली नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.