तंटामुक्तीचा अध्यक्ष घोड्यावरून मतदानासाठी दाखल

तंटामुक्तीचा अध्यक्ष घोड्यावरून मतदानासाठी दाखल

डोर्लेवाडी : डोर्लेवाडी (ता. बारामती) ः ग्रामपंचायतीसाठी मतदान करण्यासाठी येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दादासाहेब मोरे हे थेट घोडण्यावरून आले. बारामती तालुक्‍यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या डोर्लेवाडी व गुनवडी येथील ग्रामपंचायतीचे मतदान आज (ता.26) शांततेच्या वातावरणात पार पडले.

डोर्लेवाडी येथे 78.69 व गुनवडी येथे 83.56 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक अधिकारी संजीवकुमार मारकड व सुनील जगताप यांनी दिली. मोरे यांना घोडेस्वारीचा छंद आहे. शेतात फेरफटका असो की कोणा पाव्हण्याचे लग्न त्यांची स्वारी ही घोड्यावरूनच प्रवास करते. त्यांच्याकडे दोन घोडे आहेत. गावातील लग्नात ते नवरदेवाला मोफत घोडा देतात. याच छंदापायी ते आज मतदानासाठी घोड्यावरून आले. साहजिकच तो चर्चेचा विषय झाला. 

तालुक्‍याच्या राजकीय क्षेत्रात या दोन्ही गावांना नेहमीच महत्वाचे स्थान असते.त्यामुळे या गावातील होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.दोन्ही गावात सकाळ पासूनच मतदान केंद्रावर गर्दी होती.मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वहानांची मोठ्या प्रमाणात सोय करण्यात आली होती. 

गुनवडी येथे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने या ठिकाणी मोठी चुरस होती.गेल्या आठ दिवसांपासून येथे मतदारांना दोन्ही गटांकडून जेवणावळी सुरू होत्या.अखेरच्या दिवशी तर जोरदार रैली व सांगता सभा घेऊन शक्ति प्रदर्शन करण्यात आले होते.तर एका मताला पाच हजार रुपयांचा भाव पडल्याचीही येथे चर्चा होती.डोर्लेवाडीत 15 पैकी 7 जागा बिनविरोध झाल्याने त्या तुलनेत येथील वातावरण शांत होते. 

प्रभाग क्रमांक एक व दोन मध्ये फार चुरस होती.येथील सरपंचपद अनुजातीसाठी राखीव आहे.सात जागा बिनविरोध झाल्याने येथे सरपंच पदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते.काही ठिकाणी मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचीही चर्चा होती.दोन्ही गावे संवेदनशील असल्याने या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.त्यामुळे दोन्ही गावांना छावणीचे स्वरूप आले होते.गुनवडी येथील ढेलेवस्ती या ठिकाणी बोगस मतदान होत असल्याची तक्रार झाल्यानंतर येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com