

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील तब्बल २३ महसुली गावांमध्ये आजही स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. परिणामी अनेक गावांमध्ये मृतांवर उघड्यावर किंवा तात्पुरत्या जागेत अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईकांवर येते. पावसाळा आणि उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र बनते.
गेव्हंडे पुनर्वसन वसाहत आणि आंदर मावळातील कुसवली येथे घडलेल्या दोन घटनांनी हा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मावळ तालुक्यात १०३ ग्रामपंचायती आणि १७९ महसुली गावे आहेत. त्यापैकी बहुतांश गावांमध्ये स्मशानभूमीची सुविधा असली, तरी २३ गावांमध्ये आजही ही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. ग्रामपंचायतींकडून जागा उपलब्ध करण्याचे प्रयत्न होत असले तरी वन विभागासह विविध शासकीय विभागांच्या जमिनींवरील निर्बंध, तसेच खासगी जमिनींचे गगनाला भिडलेले दर यामुळे स्मशानभूमीचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे.
याच समस्येचे विदारक चित्र पवना धरणग्रस्तांच्या गेव्हंडे पुनर्वसन वसाहतीत पाहायला मिळाले. गीताबाई चिंधू बोडके यांचे गुरुवारी (दि. ३०) निधन झाले. मात्र, वसाहतीत स्मशानभूमी नसल्यामुळे त्यांच्या पार्थिवावर तातडीने अंत्यसंस्कार करता आले नाहीत. परिणामी आज (ता. ३१) सकाळपर्यंत पार्थिव घरातच ठेवावे लागले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जोवण–तिकोणा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
स्मशानभूमीसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आंदोलकांनी केली. दुसरीकडे आंदर मावळातील कुसवली येथेही अशीच हृदयद्रावक घटना घडली. गिरजाबाई चिमटे यांचे निधन झाल्यानंतर एकीकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे अंत्यसंस्कारासाठी योग्य जागाच उपलब्ध नव्हती. गावात स्मशानभूमी नसल्याने अखेर नातेवाईकांनी पत्र्याचे तात्पुरते शेड उभारून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धरणासाठी स्वतःच्या जमिनी देणाऱ्या नागरिकांनाच पुनर्वसनानंतर अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नसल्याची शोकांतिका गेव्हंडे परिसरात उघड झाली आहे. तर कुसवलीसारख्या गावांमध्ये पावसातही मृतांच्या सन्मानपूर्वक अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
स्मशानभूमी ही नागरिकांची मूलभूत गरज असून, या प्रश्नाकडे केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून पाहण्याची वेळ आली आहे. मावळातील २३ गावांतील नागरिकांनी शासन आणि प्रशासनाने तातडीने जागा उपलब्ध करून स्मशानभूमी उभाराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. विकासाच्या दाव्यांमध्ये अशा मूलभूत सुविधांकडे होणारे दुर्लक्ष आता असह्य झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.