हे नवीन पुणे , नेत्यांनो जुनी जातीची गणिते विसरा 

नवमतदारांनी संकेत दिलाय... "प्रत्येक वेळच्या परिस्थितीवर आमचं मत अवलंबून असेल, मग पक्ष कोणताही असला तरी आणि उमेदवार कोणताही असला तरीही...'
gaikwad-kakde-bapat.
gaikwad-kakde-bapat.

पुणे : "कॉंग्रेसची परंपरागत साडेतीन ते चार लाख मते आणि भारतीय जनता पक्षाची अडीच ते तीन लाख मते. कॉंग्रेसच्या मतांमध्ये फूट झाली तर भाजपला पुण्यात विजय शक्‍य', हे पुण्यातील राजकारणातील लाडकं समीकरण, पण त्या समीकरणावरील निवडणूक इतिहासजमा झाल्याचं 2014 च्या निवडणुकीनं दाखवून दिले. परंपरागत मतपेट्या ही संकल्पनाच मोडीत निघण्याची ती सुरवात होती.

त्याचमुळे विशेषतः नवमतदारांनी संकेत दिलाय... "प्रत्येक वेळच्या परिस्थितीवर आमचं मत अवलंबून असेल, मग पक्ष कोणताही असला तरी आणि उमेदवार कोणताही असला तरीही...' तरीही "समोरचा उमेदवार कोणत्या जातीचा असेल, त्यावर आमचा उमेदवार ठरेल', अशा मानसिकतेत कॉंग्रेस आणि भाजप अडकले आहेत. त्यामुळंच मतदार म्हणताहेत, तुमचा आमच्यावर भरोसा नाय काय ?...

"अमुक मतदारसंघ हा अमुक पक्षाचा बालेकिल्ला, झोपडपट्ट्यांचा हा भाग या पक्षाच्या दावणीला बांधलेला तर पलिकडचा सोसायट्यांचा भाग त्या पक्षामागं आंधळेपणानं जाणार, उमेदवाराची जात कोणती अन त्या जातीची किती मतं मतदारसंघात आहेत...' अशी गणितं मांडत अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या. हे ठोकताळे अचूक ठरत गेले. पुण्यापुरतं बोलायचं तर पुणे शहर तसा बऱ्यापैकी कॉंग्रेसचा बालेकिल्ला. म्हणजे काय तर कॉंग्रेसच्या परंपरागत मतांची संख्या प्रमुख विरोधी पक्षापेक्षा अधिक. त्यामुळं इथे विरोधी पक्षाला म्हणजे भाजपला निवडून यायचं तर कॉंग्रेसच्या मतांमध्ये फूट पडली पाहिजे. कधी ती प्रत्यक्ष उमेदवारीनं तर कधी अप्रत्यक्षरित्या पाडापाडीच्या राजकारणानं. 

अशा फुटीतूनच पुणे लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा कमळ फुललं ते 1991 मध्ये अण्णा जोशींच्या रूपानं. कॉंग्रेसमधल्या तेव्हाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्याच पाठीत खंजीर खुपसला आणि पक्षाचे उमेदवार ज्येष्ठ नेते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्या विरोधात "मते फिरवली.' त्यानंतर 1999 च्या निवडणुकीत भाजपचे प्रदीप रावत लोकसभेवर गेले तेही कॉंग्रेसची मते फुटल्याने. 

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रूपानं कॉंग्रेसची मतं विभागली गेली अन त्याचा फायदा रावतांना झाला. प्रदीप रावतांना 3 लाख चार हजार मते मिळाली होती. कॉंग्रेसच्या मोहन जोशी यांना 2 लाख 13 हजार तर राष्ट्रवादीच्या विठ्ठल तुपे यांना 1 लाख 98 हजार मते मिळाली. म्हणजेच दोन्ही कॉंग्रेसची मतं भाजपपेक्षा एक लाखाहून अधिक होती. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये कॉंग्रेस पुन्हा एकसंघतेने लढल्यानं दोन्ही वेळेस कॉंग्रेसचे सुरेश कलमाडी विजयी झाले.

 फुटीचा निकालावर परिणाम होतो, या समीकरणाची ही उदाहरणं हाताशी असतानाच 2014 ची लोकसभा निवडणूक आली, मात्र कॉंग्रेस एकसंघ असतानाही भाजपने पुण्यात देदीप्यमान विजय मिळवला. त्या पक्षाच्या अनिल शिरोळे यांनी कॉंग्रेसच्या विश्‍वजित कदम यांच्याविरोधात तब्बल 3 लाख 15 हजार मतांची आघाडी घेतली. अनेक निवडणुका कॉंग्रेसमागं हमखास जाणाऱ्या भागांमध्येही भाजपनं मुसंडी मारली. "मतदारांना आता गृहीत धरू नका', असा सांगावाच या मतदारांनी दिला.

अर्थात, प्रत्येक लाटेच्या वेळेस असेच मतदार वागतात, यंदा मोदी लाट होती. ती ओसरली की मतदार पुन्हा आपल्या परंपरागत पक्षाकडं वळतील, असाही युक्तिवाद करण्यात येतो, मात्र नवमतदार याला अपवाद असल्याचं उत्तर त्याला देण्यात येते. ते आता कोणत्याही एका पक्षामागं आंधळेपणानं जाणार नाहीत, प्रत्येकवेळची परिस्थिती पाहून निर्णय करतील, कोणत्याही जाती-पातींची लेबलं तर चिकटवून घेणारच नाहीत, हे मात्र यावेळी स्पष्ट झालं.

देशातील गेल्या निवडणुकीचा असा लख्ख संदेश असतानाही मतदारांवर भाजप, कॉंग्रेस या प्रमुख पक्षांचा भरवसा नसल्याचं सिद्ध करणाऱ्या कृतीच गेल्या काही दिवसांपासून हे पक्ष करत आहेत. पुण्यात ब्राह्मण उमेदवार विरूद्ध मराठा उमेदवार अशी लढत झाली तर बहुजन मते एकवटू शकतील, का ? याची चाचपणी सुरू झाली. त्याला उत्तर देताना प्रतिस्पर्धी पक्षही बावरून मग आपण कोणता उमेदवार द्यायचा अशा संभ्रमात पडला. भाजपकडून गिरीश बापट यांच्या उमेदवारीची चर्चा पक्षात होती. मात्र कॉंग्रेसकडून उमेदवार म्हणून कोण येते आहे, यावर आपण उमेदवार ठरवू, अशा मानसिकतेत तो पक्ष गेल्याचं दिसून आलं.

कॉंग्रेसने मराठा उमेदवार दिला तर अनिल शिरोळे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी शक्‍यता व्यक्त होऊ लागली. या गोंधळात "समोरच्या उमेदवारावर आमचा उमेदवार अवलंबून असेल' असे तत्त्व दोन्ही पक्षांनी ठरवल्याचं दिसले. या शह-काटशहामुळे उमेदवारी ठरविण्यास विलंब लागला.

वास्तविक, विजयाची खात्री वाटणाऱ्या भाजपला अशा डावपेचात पडायचं काहीच कारण नव्हतं आणि बालेकिल्ला पुन्हा हिसकावून घेण्याचा दावा करणाऱ्या कॉंग्रेसला जाती-पातींच्या कुबड्या घेण्याचीही गरज नव्हती. हा मतदारांवर अविश्‍वास म्हणावा काय ? त्यामुळंच मतदार विचारताहेत, तुमचा आमच्यावर भरोसा नाय काय ?...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com