आंबेगावला मंत्रिपदाचे वेध : संधी वळसे पाटलांना की आढळरावांना?

शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेत आलेच तर त्याचे सर्वाधिक परिणाम आंबेगाव-शिरूर या तालुक्यांत पडणार आहेत.
आंबेगावला मंत्रिपदाचे वेध : संधी वळसे पाटलांना की आढळरावांना?

शिक्रापूर : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघाची मंत्रीपद आणि सत्तेत राहण्याची सवय भाजपा-शिवसेनेच्या युतीमुळे गेल्या पाच वर्षात मोडली होती. मात्र आता शिवसेना-राष्ट्रवादीच एकत्र येवू घातल्याने आंबेगाव-शिरुरला पुन्हा एकदा राज्यात मंत्रीपदाच्या संधीचे वेध लागले आहेत.

अर्थात हे मंत्रीपद वळसेंना की, आढळरावांना याच विषयांवर मतदार संघात चर्चांवर चर्चा झडत आहेत. सन २००४ पासून वळसे-आढळराव समर्थक अगदी हाडवैरासारखे एकमेकांशी वागून इथपर्यंत आले असताना आता वळसे-आढळरावच एकमेकांच्या गळ्यात-गळा घातल्याचे चित्र दृष्टीपथात आल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आता वेध आहेत ते आपल्या नेत्याच्या मंत्रीपदाचे.

दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील या दोन्ही पाटलांची मैत्री सन २००४ मध्ये तुटली आणि राष्ट्रवादी-शिवसेना अशा दोन भिन्न विचारधारांच्या पक्षांमध्ये दोघांनीही आपापली राजकीय पत वाढविली. अर्थात कट्टर राजकीय शत्रुत्व असे दोघांनीही गेल्या १४-१५ वर्षात जपल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही बिलकूल सख्य राहिलेले नाही. दोन्ही नेत्यांच्या बाबतीत आजही खासगीत अगदी एकेरी भाषा वापरुन आंबेगाव-शिरुरमध्ये दोघांचाही उद्धार दोन्ही पक्ष कार्यकर्ते अगदी उघडपणे करीत असतात. मात्र राज्याच्या राजकारणात ’महाशिवआघाडी’ची सुत्रे फिरु लागल्याने शिरुर-आंबेगावमध्ये मात्र आता नेमके आपण काय बोलावे असा प्रश्न दोन्ही पक्षांच्या सर्वचस्तरातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना पडला आहे.

अर्थात या महाशिवआघाडीचे मंत्रीमंडळ स्थापन झाल्यावर आंबेगावला मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी सत्तेत तीन पक्ष असल्याने दिलीप वळसे पाटलांना कशी संधी मिळतेय याची उत्सूकता असतानाच पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा दबदबा निर्माण केलेले माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांना हमखास मंत्रीपदाची संधी मिळेल याबाबत आंबेगाव-शिरुरमधील शिवसैनिक आश्वस्त आहेत.

दरम्यानच्या काळात गेली १४-१५ वर्षे एकमेकांना पाण्यात पाहणा-या राष्ट्रवादी-शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आता एकत्र येवून आपला ’समान-सरकार-कार्यक्रम’ राबविताना दोन्ही नेत्यांना एकाच व्यासपीठावर पाहण्याशिवाय-त्यांचा जयघोष करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सद्य:स्थितीत आता नेमके काय बोलावे याबाबत कुचंबना आत्तापासूनच सर्वांची झालेली आहे हे नकी. तरीही आंबेगाव-शिरुरला मंत्रीपदाची संधी असल्याचे आता दोन्ही पक्षांचे नेते-पदाधिकारी-कार्यकर्ते बोलत असल्याने मंत्रीपदाची माळ घेण्यात वळसे की आढळराव भाग्यवान ठरणार याची उत्सुकता सरकार स्थापनेपेक्षा आंबेगाव-शिरुरकरांनाच जास्त आहे हे नक्की. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com