सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळताच चिखलीकर म्हणाले, विजय नेहमी सत्याचाच होतो..

सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवतखासदार प्रताप पाटील चिखलीकरांना दिलासा दिला. त्यामुळेआता जिल्हाबॅंकेची निवडणूक लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
Nanded District Bank- Pratap chikhlikar- Ashok Chavan news
Nanded District Bank- Pratap chikhlikar- Ashok Chavan news

नांदेड ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचे मतदान अवघ्या दोन दिवसांवर आले असतांना सुप्रीम कोर्टाने भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दिलासा देणारा निकाल दिला आहे. यामुळे त्यांचा जिल्हा बॅंकेची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा बॅंकेवर वर्चस्व राखण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण व चिखलीकर यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर संचालक मंडळासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विरोधकांकाडून आक्षेप घेण्यात आला होता. यासाठी  उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु निकाल चिखलीकरांच्या बाजूने लागला. त्यामुळे विरोधक आता माघार घेतील असे वाटत असतांनाच त्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. 

मात्र विरोधकांना इथेही यश आले नाही. सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना दिलासा दिला. त्यामुळे आता जिल्हा  बॅंकेची निवडणूक लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजकीय वर्चस्वातून यावेळी होणारी नांदेड जिल्हा बॅंकेची निवडणूक राज्यभर चर्चेत आली आहे. मागील कार्यकाळात खासदार चिखलीकर यांनी सेना, भाजप व राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेवून जिल्हा बॅंकेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती.

परंतु राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा बॅंकेची सत्ता खासदार चिखलीकरांच्या ताब्यात जावू नये यासाठी व्युहरचना आखली आहे. जिल्हा बॅंकेची मतदारयादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच खासदार चिखलीकर यांचे मतदार यादीतील नाव वगळण्यात यावे, अशी तक्रार एका कार्यकर्त्याने विभागीय सहनिबंधक यांच्याकडे केली होती. 

तेव्हा मतदार यादीतून नाव रद्द करण्याचा निर्णय देताच याविरुद्ध खासदार चिखलीकरांनी हायकोर्टात दाद मागितली होती.  हायकोर्टाने दिलासा देत मतदारयादीतील नाव कायम ठेवले. परंतु, या निर्णयाविरुद्ध पुन्हा तक्रारकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. प्रारंभीची सर्व प्रक्रिया पाहता गुरुवारी (ता.१८) सुप्रिम कोर्टात या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीअंती तक्रारकर्त्यांची याचिका फेटाळून लावत खासदार चिखलीकर यांचे जिल्हा बॅंकेच्या मतदारयातील नाव कायम ठेवण्याचा निकाल आला. 

चिखलीकर यांच्यावतीने अॅड. ब्रिजकिशोर व अॅड. शिवाजीराव जाधव यांनी बाजू मांडली तर तक्रारकर्त्यांच्या बाजूने प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली  दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निवाड्यावर मी समाधानी असून सत्याचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया चिखलीकरांनी व्यक्त केली आहे.

Edited By : Jagdish Pansare 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com