जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अण्णांचे उपोषण निश्चित

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्लीतील रामलीला किंवा जंतरमंतरवर शेतकऱ्यांच्यामागण्यांसाठी शेवटचे उपोषण सुरू करणार आहे.
anna-hazare--7-may-ff.jpg
anna-hazare--7-may-ff.jpg

राळेगण सिद्धी : शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्यांसाठी पुन्हा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आता भाजपचे नेते भेटीसाठी येत असले, तरी आपण उपोषणावर ठाम आहोत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात उपोषण निश्चित करणार असून, मैदान उपलब्ध झाले नाही, तर प्रसंगी तुरुंगात उपोषण करू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी `सकाळ`शी बोलताना दिला.

हजारे म्हणाले, की गेल्या चार वर्षांपासून केंद्र सरकारशी संघर्ष सुरू आहे. एकदा दिल्लीत तर एकदा राळेगण सिद्धीत उपोषण केल्यानंतरही केंद्र सरकारने दिलेली दोन्ही लेखी आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्लीतील रामलीला किंवा जंतरमंतरवर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेवटचे उपोषण सुरू करणार आहे.

आंदोलनासाठी मैदान उपलब्ध झाले नाही, तर अटक करून घेऊन प्रसंगी तुरूंगात उपोषण करू, असा निर्धार हजारे यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारला उपोषणाचा इशारा दिल्यानंतर काल गुरूवारी सकाळी भाजपचे संकटमोचक तथा माजी मंत्री गिरिष महाजन यांनी हजारे यांची भेट घेऊन दीड तास चर्चा केली होती. त्याआधी सोमवारी विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे व राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली होती.
त्यावर हजारे म्हणाले, की सन २०१८ पासून केलेला पत्रव्यवहार, २०१८ व २०१९ च्या उपोषणादरम्यान पंतप्रधान कार्यालय व तत्कालीन कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांनी दिलेली लेखी आश्वासने, याबाबी माजी मंत्री महाजन यांना दिल्या आहेत. ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून दिल्लीतील सरकारशी बोलणार असल्याचे म्हणाले आहेत.

राज्य कृषी मूल्यआयोगाने केंद्र सरकारच्या कृषीमूल्य आयोगाने गेल्या वर्षी तांदळासाठी ३ हजार २५१ रूपये प्रतिक्विंटल हमीभाव सुचविला होता. परंतु केंद्राने १ हजार ५५० रूपये भाव दिला. म्हणजे ५२ टक्के कपात केली. ज्वारीला राज्य कृषीमूल्य आयोगाने ज्वारीसाठी २ हजार ८५६ प्रति क्विंटल रूपये हमीभाव सुचविला, तर केंद्राकडून मिळाला १ हजार ७०० रूपये. ४० टक्के कमी, तर बाजरीसाठी ३ हजार २५२ रूपये प्रति क्विंटल हमीभाव राज्य कृषीमूल्य आयोगाने दिल्यानंतर केंद्राने १ हजार ४२५ रूपये भाव दिला. याचाच अर्थ केंद्रिय कृषीमूल्य आयोगाकडून ४० टक्के ५० टक्के हमी भाव कमी केला जात आहे, असे ते म्हणाले. 

केंद्राने स्वामिनाथन आयोगाचा अहवाल स्विकारला आहे. तसेच संसदेत शेतमालाला उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले असले, तरी वास्तव वेगळेच असल्याचे दिसून येत आहे. राज्य कृषीमूल्य आयोगाने पाठविलेल्या दरात केंद्रिय कृषीमूल्य आयोगाकडून मोठी कपात केली जाते. केंद्राचा कृषीमूल्य आयोग हा केंद्र सरकार व केंद्रिय कृषीमंत्र्याच्या आधिन आहे. त्यामुळे केंद्रिय कृषीमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे संविधानात्मक दर्जा देऊन स्वायत्तता देण्याची गरज आहे.

राज्य कृषीमूल्य आयोगात विविध कृषीविद्यापीठांचे शास्रज्ञ व अधिकारी आहेत. ते काही राजकीय नाहीत. ते शेतकऱ्यांच्या विचारपूस करून व अभ्यास करूनच शेतमालाला राज्य कृषीमूल्य आयोगाकडून हमीभाव केंद्राला सुचविला जातो.
भाजीपाला व दुधालाही खर्चावर आधारित हमी भाव मिळण्याची गरज आहे. एक लिटर दुधाला किती खर्च येतो, त्याचे मूल्य काढले पाहिजे. भाजीपाल्याचा उत्पादन खर्च काढून हमीभाव मिळाला पाहिजे, असे झाले तर शेतकरी कशाला दूध रस्त्यावर ओतेल. कांदे, बटाटे कशाला रस्त्यावर टाकेल, असे ते म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोनदा उपोषणे केल्यानंतर लेखी आश्वासने मिळाली. केंद्र सरकारला १८ पत्रे लिहली आहेत. परंतु त्याची अमंलबजावणी केंद्र सरकारने केली नाही. त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा उपोषण आंदोलन करावे लागत आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात उपोषण आंदोलनासाठी रामलीला मैदानाची मागणी नवी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे. त्या प्रक्रियेला वेळ लागणारच आहे.  तोपर्यंत एक महिनाभर केंद्र सरकार काय भुमिका घेते, याची आपण वाट पाहू. नाहीतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्ली येथे उपोषण सुरू करण्याचा निर्धार हजारे यांनी व्यक्त केला.

पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण करून पाठिंबा दिला होता. त्यावेळी आपण सांगितले होते, की देश पेटून उठल्याशिवाय केंद्र सरकारला जाग येणार नाही. ज्या वेळी अन्याय अत्याचार होतो, त्यावेळी कार्यकर्ता व प्रत्येक व्यक्तीने पेटून उठले पाहिजे. सर्व काही अण्णा हजारे यांनीच करावे, ही भूमिका सोडून दिली पाहिजे.

राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी मला सांगितले की, तुमचे वय आता ८३ वर्षे झाल्याने या वयात उपोषण तुम्हाला झेपणार नाही. परंतु मी त्यांना सांगितले की समाज व राष्ट्रहितासाठी व्रत घेतले आहे. वैद्यक शास्राप्रमाणे ८३ व्या वर्षी उपोषण झेपत नसले, तरी ह्रदयविकार येऊन मरण्यापेक्षा समाज व राष्ट्रहितासाठी मरण आले तर काय वाईट आहे, असे हजारे म्हणाले.  

वाटाघाटी करण्यासाठी आलेल्या माजी मंत्री गिरीश महाजन व इतरांना देखील राज्य कृषीमूल्य आयोग व केंद्रिय कृषीमूल्य आयोग ठरवीत असलेल्या दरांबाबत माहिती नाही, हे दुर्दैव आहे, अशी खोचक टीका हजारे यांनी केली.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com