भाजप आमदार व त्यांच्या भावासह तरुणीविरोधात गुन्हा दाखल

खंडपीठाच्या आदेशानुसार आमदार नारायण कुचे, त्यांचे बंधू देविदास कुचे व संबंधित युवतीविरोधात चंदनझिरा पोलिसात भादंवि कलम २९४, ५०७, ३४ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
fir ragisterd against mla narayan kuche news
fir ragisterd against mla narayan kuche news
Published on
Updated on

औरंगाबाद: जुन्या कौटुंबिक वादाचा आकस बाळगत एका युवतीला हाताशी धरून भाच्याला अश्‍लील संदेश पाठवत त्रास दिल्याप्रकरणात पीडित भाच्याने चंदनझिरा (जि. जालना) पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने भाच्याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने संबंधित भाचा दीपक डोंगरे यांच्या दोन मार्च रोजीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश पोलिसांना दिले.

त्यानुसार मंगळवारी (ता.सात) बदनापूरचे आमदार नारायण कुचे, त्यांचा भाऊ देविदास कुचे आणि अश्‍लील संदेश पाठविणाऱ्या संबंधित युवतीविरोधात चंदनझिरा (जि. जालना) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 
  
डोंगरे हे व्यवसायानिमित्त सख्खे मामा आमदार नारायण कुचे यांच्याकडे वास्तव्यास होते. तक्रारीत नमूद केल्यानुसार डोंगरेंनी कुचे यांना ४० लाख रुपये निवडणुकीसाठी दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कुचे परिवाराने त्यांच्या मुलीशी डोंगरे यांचा विवाह लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो डोंगरेंसह त्यांच्या नातेवाइकांना मान्य होता. यातून कुचे परिवारातील मुलीशी डोंगरे यांचे प्रेम जुळले.

डोंगरेंनी पैशांच्या मागणीसंदर्भात संपर्क केला असता, नारायण कुचे यांना प्रेम प्रकरणाविषयी समजले. दरम्यान, कुचे यांचा राग अनावर होऊन त्यांनी कंत्राटाचे प्रमाणपत्र रद्द करून काळ्या यादीत टाकतो, काटा काढतो अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच आमदार कुचे यांच्यासह त्यांचे बंधू देविदास कुचे यांनी आपणाविरोधात षडयंत्र रचून एका युवतीस आपणास अश्‍लील संदेश पाठविण्यास सांगत जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचेही नमूद केले आहे. 

खंडपीठाच्या आदेशानुसार गुन्हा 

दोन मार्च २०२० रोजी दीपक डोंगरे यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरणात पोलिसांनी पाच मार्च रोजी डोंगरेंना अश्‍लील संदेश पाठविणाऱ्या संबंधित युवतीला चौकशीसाठी बोलावत जबाब नोंदविला. पाच मार्च रोजी युवतीने दिलेल्या जबाबानुसार देविदास कुचे यांच्या सांगण्यावरून आपण डोंगरे यांना प्रेमाचे संदेश पाठविल्याचे सांगितले.

यानंतरही पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही. या नाराजीने डोंगरे यांनी ॲड.रवींद्र गोरे यांच्यातर्फे खंडपीठात धाव घेतली. सुनावणीदरम्यान युवतीचा सदर जबाब याचिकाकर्त्यातर्फे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. सुनावणीअंती डोंगरे यांनी दोन मार्च रोजी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

खंडपीठाच्या आदेशानुसार आमदार नारायण कुचे, त्यांचे बंधू देविदास कुचे व संबंधित युवतीविरोधात चंदनझिरा पोलिसात भादंवि कलम २९४, ५०७, ३४ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. रवींद्र गोरे यांनी काम पाहिले. ॲड. गोरे यांना ॲड. चंद्रकांत बोडखे यांनी साहाय्य केले.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com