राणेंच्या मतदारसंघात काॅंग्रेसकडून हुसेन दलवाई किंवा मुणगेकर यांना पसंती

राणेंच्या मतदारसंघात काॅंग्रेसकडून हुसेन दलवाई किंवा मुणगेकर यांना पसंती

चिपळूण : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसतर्फे राज्यसभेचे खासदार हुसैन दलवाई किंवा अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कोकणातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदेश कॉंग्रेसकडे केली आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेश सचिव इब्राहिम दलवाई यांनी "सरकारमामा'ला दिली. 

ते म्हणाले की लोकसभेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत जागा वाटपावरून सुरू असलेली चर्चा अंतिम टप्यात आली आहे. कॉंग्रेस आघाडीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन प्रमुख पक्ष असले तरी इतर प्रादेशिक पक्षांनी आघाडीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही जागा त्यांनाही सोडण्यात येणार आहेत. कोकणातील दोन जागांबाबत पक्षश्रेष्ठींकडून कार्यकर्त्यांची मते आजमावण्यात आली, तेव्हा कोकणातील कार्यकर्त्यांनी राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई व डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नावाची शिफारस केली आहे.

या दोघांची मतदारांमध्ये चांगली प्रतिमा आहे. दोघेही कॉंग्रेसचे निष्ठावंत आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यात कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत. दोघांपैकी एकाला उमेदवारी द्यावी. पक्ष जो उमेदवार देईल, त्याला आम्ही निवडून आणू. पक्षाने आघाडीचा उमेदवार दिल्यास आम्ही त्याचेही काम करू, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केल्याचे दलवाई यांनी सांगितले. 

जनसंघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळेल 

केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारविरोधी कॉंग्रेसने राज्यात जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. लवकरच ती कोकणात येणार आहे. त्याची तयारी पक्षीय पातळीवर सुरू आहे. कोकणात कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास दलवाई यांनी व्यक्त केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com