लक्ष्मण ढोबळे यांचे उपद्रवमूल्य भाजपच्या फायद्याचे ठरणार!

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना मानणारा गट मंगळवेढा तालुक्यात आहे. त्याचा उपयोग भाजपला होऊ शकतो. ढोबळे यांनी आपले उपद्रवमूल्य दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत दाखवले होते.
लक्ष्मण ढोबळे यांचे उपद्रवमूल्य भाजपच्या फायद्याचे ठरणार!

मंगळवेढा : माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांच्या समर्थकांची संभ्रमावस्था कायम आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराला ढोबळेंचा लाभ होणार असला तरी शिवसेना-भाजप यांच्या युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. या मतदारसंघात ढोबळे समर्थकांची भूमिका निर्णायक असली तरी युतीच्या जागावाटपात ही जागा कुणाच्या वाट्याला जाते हे देखील महत्त्वाचे आहे.


ढोबळे यांनी मंगळवेढ्यातून राजकारणाचा श्रीगणेशा केला.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपले बस्तान बसविले. घरची राजकीय पार्श्वभूमी नसताना आपल्या प्रभावी वाणीने त्यांनी आपली राजकीय ताकद वाढविली.  विविध खात्याचे मंत्री म्हणून राजकीय बस्तान बसवताना विविध कामे केली.

मंगळवेढा सोडून ते 2009 मध्ये मोहोळचे आमदार झाले. त्यामुळे मंगळवेढा परिसरातील त्यांच्या समर्थकांनी आमदार भालके, परिचारक, जिल्हा बॅकेचे संचालक आवताडे गटाचा आसरा घेतला. राष्ट्रवादीत त्यांचा गट आहे. हे गट पक्षापेक्षा स्वबळावरच अधिक तग धरून आहेत. ढोबळे हे मोहोळचे लोकप्रतिनिधी असताना अंतिम टप्यात लागलेले गालबोट आणि या परिस्थितीत पक्षाने साथ दिली नसल्याने ते पक्षावर नाराज झाले. आमदार रमेश कदम व ढोबळे यांच्यात संघर्ष झाला. या नाराजीत अजित पवारांवर ढोबळे यांनी शाब्दिक प्रहारही केला. तेव्हापासून ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून सध्या विद्यमान खासदार शरद बनसोडे, अमर साबळे यांची नावे चर्चेत असताना आता ढोबळेंच्या रूपाने तिसरे नावही चर्चेत आले. त्यांना सोलापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते किती स्वीकारतील, हे महत्वाचे आहे. ढोबळे हे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचेही दावेदार होऊ शकतात. युतीच्या जागावाटपात पंढरपूर व मोहोळ कुणाच्या वाट्याला येते हे देखील महत्वाचे आहे.

भाजपला ढोबळे यांच्या प्रवेशाचा उपयोग होईल. पक्षाची धोरणे, सत्ता काळात केलेले काम जनतेत नेण्यासाठी राज्यभर प्रभावी वक्ता भाजपला त्यांच्या रूपाने  मिळाला आहे.  गेल्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूरमधून प्रशांत परिचारकांना थोड्या मताने पराभव स्वीकारावा लागला. ते सध्या  भाजपचे सहयोगी सदस्य आहेत.

ढोबळेंचे उपद्रव्यमूल्य दामाजी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिसल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते निर्णायक भुमिका घेवू शकतात. पण सध्या त्यांचे अनुयायी व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com