ही जखम शिवसेनेला अजूनही भळभळती...

लोकसभेनंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील शिवसेनेच्या मतदारांनी झालेली चूक सुधारली आणि जिल्ह्यातील चारही जागा मताधिक्याने जिंकल्या. अगदी कन्नडमधून हर्षवर्धन जाधव देखील पराभूत झाले आणि त्यांच्या नावाआधी माजी लागले. युतीचे सरकार सत्तेवर येईल असे वाटत असतांना राज्यात आणखी एक चमत्कार झाला, महाविकास आघाडच्या प्रयोगाने आज महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. पण औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या पराभवाची भळभळती जखम अजूनही अनेकांच्या मनात घर करून आहे.
chandrakant khaire and imtiaz jalil news
chandrakant khaire and imtiaz jalil news

औरंगाबादः आजच्या दिवशी म्हणजेच गेल्या २३ मे २०१९ रोजी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा धक्कादायक पराभव झाला होता.  सातत्याने चार लोकसभा निवडणुका जिंकत शिवसेनेने औरंगाबाद हा शिवसेनेचा गड असल्याचे राज्याला दाखवून दिले होते. पण २०१९ ची लोकसभा निवडणुक शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि औरंगाबादकरांना एक भळभळती जखम देऊन गेले.

ज्या प्रखर हिंदुत्वाच्या मुद्याने शिवसेनला औरंगाबाद लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही गेली अनेक वर्ष भरभरून दिले, त्याच जनतेने लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पराभूत करत एमआयएमचे इम्तियाज जलील यांना दिल्लीत खासदार म्हणून पाठवले. अर्थात शिवसेनेच्या माजी आमदार हर्षवर्धन यांनी केलेली बंडखोरी एमआयएमच्या पथ्यावर पडली आणि स्वप्नातही वाटले नसेल असा अशक्यप्राय विजय या पक्षाला मिळाला. वर्ष उलटून गेले तरी पराभवाची ही भळभळती जखम अजून शिवसेनेला सतावते आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल म्हणून ज्याकडे पाहिले गेले, तो म्हणजे शिवसेनेचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमच्या उमेदवाराकडून झालेला पराभव. अनपेक्षित अशा या पराभवाने शिवसेनेचे मुंबईतील नेते देखील हादरून गेले. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी तर हा पराभव चंद्रकांत खैरेंचा नाही, तर माझा असल्‍याचे सांगत शिवसेनेसाठी औरंगाबादची जागा किती महत्वाची होती हे दाखवून दिले होते.

सलग चार लोकसभा निवडणुका मताधिक्याने जिंकणारे चंद्रकांत खैरे पाचव्यांदा मैदानात उतरले. त्यांचा विक्रमी विजय होणार असे वाटत असतांना जिल्ह्यातील काही जुन्या राजकीय घडामोडी, पक्षातील अंतर्गत विरोधकानी ऐन निवडणुकीत केलेली खेळी, त्याला भाजपचा मिळालेला छुपा पांठिबा यामुळे खैरे यांच्या सलग पाचव्या विजयाचे स्वप्न भंगले आणि गेली २०-२५ वर्ष औरंगाबादवर डौलाने फडकणारा भगवा खाली उतरला.

राज्यात नव्यानेच आकाराला आलेल्या वंचित बहुजन आघाडीने औरंगाबादची जागा एमआयएमला दिली, आणि मध्यचे तत्कालीन आमदार इम्तियाज जलील यांना पक्षाने उमेदवारी दिली. जातीय राजकारणाचा बळी ठरलेला हा मतदारसंघ पुन्हा एकदा त्याच वळणावर गेला. ऐरवी शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्यावर मते मिळायची, परंतु शिवसेनेतूनच बंडखोरी झाल्यामुळे या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फुट पडली.

कन्नडचे माजी शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत पत्नीच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी लोकसभेच्या आखाड्यात उडी घेतली आणि थेट चंद्रकांत खैरे यांनाच आव्हान दिले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सर्वप्रथम दिलेला राजीनामा, आरक्षणाची मागणी करत मराठा तरुणांचाचे जाणारे बळी रोखण्यासाठी मराठवाड्यात काढललेली समुपदेशन यात्रा याची सहानुभूती जाधव यांच्या पथ्यावर पडली. 

शिवाय भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई असल्यामुळे जिल्ह्यातील सगळी भाजपा जाधवांच्या दिमतीला होती, असा आरोप देखील त्यावेळी करण्यात आला. हे कमी की काय? म्हणून शिवसेनेतील खैरेंच्या अतर्गंत विरोधकांनी देखील उचल खाल्ली. या सगळ्याचा परिणाम म्हणून शिवसेनेचा अवघ्या साडेपाच हजार मतांनी लोकसभेला पराभव झाला. हर्षवर्धन जाधव यांची उमेदवारी कायम राहिल्यानंतर एमआयएमच्‍या आशा पल्लवीत झाल्या होत्या. इम्तियाज जलील यांच्यासाठी असदुद्दीन ओवेसी, वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त सभा घेऊन जोरदार हवा निर्माण केली. ओवेसींनी तर आठवडाभर औरंगाबादेत मुक्कामच ठोकला. शहरी भागासह ग्रामीण भागही पिंजून काढला. हे करत असतांनाच हर्षवर्धन जाधव हिंदूंची किती मते फोडण्यात यशस्वी ठरतात याकडे देखील एमआयएमचे लक्ष होते.

हर्षवर्धन जाधवाना हलक्यात घेणे महागात पडले..

एमआयएमचा अंदाज निवडणूक निकालानंतर खरा ठरला, तर हर्षवर्धन जाधव यांना हलक्यात घेणे शिवसेनेला चांगलेच महागात पडले. एमआयएमने दलित, मुस्लिम आणि काही प्रमाणात वंचित घटकांची मते आपल्याकडे वळवली, तर शिवसेनेच्या हक्काच्या मतांवर जाधव यांनी अक्षरशः दरोडाच टाकला, तब्बल २ लाख ८३ हजार मते मिळवत जाधव यांनी खैरेंच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले.

खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू होती, पण मतमोजणीत खैरेंच्या मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी होत होती, तर इम्तियाज यांना एकगठ्ठा मते मिळत होती. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये इम्तियाज जलील याचा विजय पक्का झाला, आणि आतापर्यंत भगव्या रंगाचा सडा पाहिलेल्या औरंगाबादच्या रस्त्यांवर हिरवा आणि निळा रंग मनसोक्त उधळण्यात आला होता. 

शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी इम्तियाज जलील यांना दिलेले अलिंगन तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले होते. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता. संपुर्ण राज्याचे लक्ष औरंगाबादेतील निकालाकडे लागले होते. स्वपनातही पाहिली नसेल असा पराभव शिवसेनेने प्रत्यक्षात अनुभवला. या पराभवानंतर त्यांचे चिंतन, आरोप, प्रत्यारोप झाले. आज या धक्कादायक पराभवाची वर्षपुर्ती, पण पराभवाच्या जखमा शिवसैनिकांच्या मनात अजूनही ताज्या आहेत.

लोकसभेनंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील शिवसेनेच्या मतदारांनी झालेली चूक सुधारली आणि जिल्ह्यातील चारही जागा मताधिक्याने जिंकल्या. अगदी कन्नडमधून हर्षवर्धन जाधव देखील पराभूत झाले आणि त्यांच्या नावाआधी माजी लागले. युतीचे सरकार सत्तेवर येईल असे वाटत असतांना राज्यात आणखी एक चमत्कार झाला, महाविकास आघाडच्या प्रयोगाने आज महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. पण औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या पराभवाची भळभळती जखम अजूनही अनेकांच्या मनात घर करून आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com