मंत्र्यांच्या भेटीगाठींसाठी आमदारांची लगबग

mantralaya
mantralaya

मुंबई :  एरवी मंत्रालयात आठवड्यातून एखादा - दुसरा दिवस उपस्थित राहणारे मंत्री अधिवेशनामुळे विधानभवनात ठाण मांडून आहेत. त्याचा अचूक फायदा आमदार मंडळी घेत आहेत.

कार्यालयात मंत्री आहेत असे दिसले की आमदार लगेचच आता घुसून मंत्र्यांसमोर तीन – चार वेगवेगळी पत्रे समोर ठेवतात. मंत्रीही आमदारांना नाराज करायला नको म्हणून त्यावर प्रस्ताव सादर करा, योग्य ती कार्यवाही करावी, तपासून प्रस्ताव सादर करा, वगैरे शेरे मारतात.

अर्थात मंत्र्यांकडून विविध कामे मार्गी लावून घेण्यासाठी आमदारांना अधिवेशन पर्वणी ठरत आहे. मतदारसंघातील रस्ते, पिण्याचे पाणी, जलसंधारणाची कामे, अंगणवाडी, शाळा अशा अनेकविध विकास कामांसाठी आमदार मंत्र्यांकडे लॉबिंग करताना दिसत आहेत. पण मतदारसंघातील विकासकामांच्या निखळ हेतूने मंत्र्यांकडे कामांचा आग्रह धरणा-या आमदारांची संख्या तशी मोजकीच आहे.

अनेक आमदारांना कामे करून घेतल्यानंतर त्याचे कंत्राट आपले कार्यकर्ते, नातेवाईक यांना मिळवून द्यायचे असते. अनेक आमदार  कंपन्यांना कामे मिळवून देण्यासाठीही आमदार मंत्र्यांना भेटत असतात. आपल्याच कुटुंबांच्या, नातेवाईकांच्या नावाने संस्था असतात. या संस्थेच्या नावावर विविध योजना मिळवायच्या असतात, असेही या सूत्रांनी सांगितले.

मतदारसंघाच्या कल्याणाची भावना असो किंवा व्यक्तीगत स्वार्थ असो पण आमदारांनी आणलेल्या पत्रांवर शक्यतो कोणतेच मंत्री `नाही` म्हणत नाहीत. ते सकारात्मक शेरा पत्रावर मारतातच. पण सकारात्मक शेरा मारल्यानंतरही ते पत्र सचिव, उपसचिव, कक्ष अधिकारी व संबंधित जिल्हा यंत्रणेपर्यंत जाईपर्यंत त्या कामामध्ये कोलदांडा बसलेला असतो.

निधी शिल्लक नाही, या ठिकाणी हे काम करता येणार नाही अशा अनेकविध त्रुटी दाखविल्याने ते काम मार्गी लागत नाही. काम मार्गी लागले नाही म्हणून दुसरे विनंतीपत्र घेऊन येणा-या आमदारांचीही संख्या जास्त असते. ब-याचदा ज्या अधिका-याने काम लटकविले आहे, त्या अधिका-याला मंत्र्यांनी फोन करावा, असाही आग्रह आमदार धरतात. मग मंत्रीही आमदारांच्या समाधानासाठी फोन मारतात. त्यातून ब-याचदा काम मार्गी लागतेही किंवा लागतही नाही.

एखादे काम होणार नाही, हे मंत्र्यांनाही ठाऊक असते. पण केवळ आमदारांच्या समाधानासाठी ते पत्रावर सकारात्मक शेरा मारतात. अधिका-यांना फोन करतात. सध्या विधानभवनात प्रत्येक मंत्र्यांच्या दालनात हेच चित्र दिसत आहे.      

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com