मेहता, देसाई यांच्या राजीनाम्या शिवाय चौकशी अशक्‍य

subhash-desai-prakash-mehat
subhash-desai-prakash-mehat

मुंबई :  गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या चौकशीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली तरी त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. महेता आणि देसाई विद्यमान मंत्री असल्याने त्यांची चौकशी कशी करायची अशा संभ्रमात सरकार आणि प्रशासन सापडल्याचे अपर मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

गृहनिर्माण मधील एसआरए आणि उद्योग विभागातील एमआयडीसी जमीनींचे हस्तांतरण प्रकरणी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा केली होती. महेता यांची चौकशी राज्याच्या लोकायुक्‍त करणार असून देसाई यांची चौकशी नेमकी कोण करणार याबाबतचा निर्णय राज्यसरकारने अद्यापपर्यंत घेतला नाही.

लोकायुक्‍त हे पद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती दर्जाचे असल्याने महेता यांची चौकशी लोकायुक्‍त करू शकतात. प्रशासनातील कर्मचारी, अधिकारी आणि मंत्र्यांची चौकशी करण्याचे अधिकार त्यांना आहेत. मात्र आएएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी केंद्र शासनाच्या सेवेतील असल्याने लोकायुक्‍तांकडून त्यांची चौकशी केली जाऊ शकत नसल्याचे आयएएस अधिकाऱ्यांचे मत आहे.

 एसआरए प्रकरणी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव किंवा एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेष्ठ आएएएस अधिकारी आहेत. या प्रकरणात चौकशीसाठी आवश्‍यक असणारी कागदपत्रे किंवा फाईल्स लोकायुक्‍तांकडे सोपविण्याचे काम हे अधिकारी करू शकतात. त्या संदर्भातील काही प्रश्‍नही त्यांना विचारले जावू शकतात, मात्र प्रकरणात अंशताही सचिव किंवा सीईओ यांचा दुरान्वये संबंध दिसून आल्यास त्यांची चौकशी घटनात्मक दृष्टया केली जावू शकत नसल्याचे जेष्ठ आएएएस अधिकाऱ्याने सांगितले.

सुभाष देसाईंच्या चौकशीचे स्वरूप अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. मात्र ते मंत्रीपदावर असल्याने त्यांची चौकशीही तांत्रिक बाबीत अडकली आहे. देसाई मंत्री असल्याने त्यांची चौकशी मुख्य सचिव, अपरमुख्य सचिव, प्रधान सचिव, सेवानिवृत्त सचिव, सेवानिवृत्त मुख्य सचिव किंवा सचिव दर्जाचा अधिकारी करू शकत नाही.

न्यायालयीन चौकशीचा एकमात्र पर्याय त्यांच्यासाठी शिल्लक असू शकतो, मात्र तरी देखिल मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याशिवाय ही चौकशी कशी होणार असा प्रश्‍न सरकारपुढे आहे. त्यामुळे देसाई यांना राजीमाना द्यावा लागल्यास महेतांच्या राजीनाम्याचाही सरकारवर दबाव वाढणार असल्याचे प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com