जनसामान्यांना नकोय आता लॉकडाऊन, आमदार दटके म्हणाले गरिबांचा विचार व्हावा

हॉकर्स, कॅब, ऑटोचालकामुळे कोरोनाचा प्रसार झाला किंवा यापैकी एकाही घटकातील व्यक्तीला कोरोना झाल्याचे आढळले नाही. परंतु, मनपा प्रशासनाने त्यांच्यावर बंदी लादून त्यांना उपाशी मारण्याचा प्रकार सुरू केल्याचा आरोप हॉकर्स संघटनेचे जम्मू आनंद यांनी केला.
nagpur zero mile-corona
nagpur zero mile-corona

नागपूर : शहरात रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत असले तरी, लॉकडाउनला यापुढे सामान्यांचे कितपत सहकार्य मिळेल, याबद्दल शंका वाटण्यासारखी परिस्थिती आहे. दररोज कमावून खाणाऱ्या गरीब आणि सामान्य माणसांचा तर लॉकडाउनला विरोधच आहे. तशा प्रतिक्रिया संबंधितांनी व्यक्त केल्या आहेत. थोडक्यात काय तर जनसामान्यांना आता लॉकडाऊन नकोय. 

गेल्या सुमारे चार महिन्यांपासून नागपुरात लॉकडाउनसदृश परिस्थिती आहे. लोकांनी त्यावेळी सहकार्य केले. आता रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, त्यांच्या बेशिस्तीसाठी रोजगार कमावणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आणणारा लॉकडाउन आता नको, असा मतप्रवाह आहे. जाणकारांच्या मते नागपूर महापालिका आणि नागपूर पोलिस यांच्यात अधिक समन्वय असण्याची आवश्‍यकता आहे. तसे झाले तर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिस रोखू शकतील व कारवाईही करू शकतील. त्याचवेळी ते रोजगारासाठी किंवा अत्यावश्‍यक कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना सहकार्य करू शकतील व गरजेप्रमाणे संरक्षणही देऊ शकतील. 

सरसकट लॉकडाउन किंवा संचारबंदी लावल्यास आता-आता सुरू झालेली छोटी-मोठी दुकाने किंवा तत्सम कोणतेही काम करून प्रपंचाचा गाडा ओढणारे लोक या सर्वांवर मोठी आपत्ती येण्याची शक्‍यता आहे. लॉकडाउन हा कायमचा उपाय होऊ शकत नाही हे साऱ्यांचेच म्हणणे आहे. तो या आजारावरचा तोडगाही नाही. कोरोना नियंत्रित करायचा असेल तर कंटेनमेंट झोनमध्ये अधिकाधिक कठोर व्यवस्था लावणे आणि पोलिसांच्या साह्याने विनाकारण फिरणाऱ्या व नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करणे हा लॉकडाउनपेक्षा अधिक चांगला मार्ग असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे. 

लक्ष्मीनगर परिसरात मक्‍याची कणसं विकून उदरनिर्वाह करणारे रामनिवास पटेल यांनी नव्याने लॉकडाउन लावण्याला तीव्र विरोध दर्शविला. लॉकडाउनमुळे माझ्यासारख्या फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुन्हा लाकडाउन लागल्यास आमच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. रामनिवास यांच्या परिवारात पत्नी, मुलगी व दोन मुले आहेत. त्यांनी गेले काही महिने उधारीवर कसेबसे दिवस काढलेत. आता मात्र एकेक दिवस कठीण जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

भूईमुगाच्या शेंगा विकणारे काछीपुरा येथील महंत सिंग म्हणाले, लॉकडाउनपूर्वी लिंबूपाणी विकून परिवाराला पोसायचो. आता शेंगा विकाव्या लागत आहेत. गिऱ्हाईक नसल्यामुळे कमाई कमी आहे. त्यामुळे घरखर्च भागत नाही. पुन्हा लॉकडाउन गोरगरिबांना परवडणारा नाही. फुलविक्री करणारे जयताळा येथील विनोद सोनेकर हेही लॉकडाउनच्या विरोधात दिसले. चार महिन्यांचा लॉकडाउन पुरेसा झाला. आता पुन्हा लॉकडाउन नको आहे. यासंदर्भात निर्णय घेताना सरकारने गोरगरिबांचा विचार अवश्‍य करावा. 

पंक्‍चर दुरुस्ती करून कुटुंबाचे पालनपोषण करणारे धंतोली येथील परमेश्‍वर वाघमारे म्हणाले, लॉकडाउन पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे रोजीरोटी पुन्हा बंद होईल. श्रीमंतांना अजिबात फरक पडणार नाही. गोगरिबांचेच सर्वाधिक हाल होतात. त्यामुळे प्रशासनाने निर्णय घेताना हातावर पोट असणाऱ्यांचा अवश्‍य विचार करावा. 

फक्त ऑटोनेच कोरोना होतो काय? ः आमदार खोपडे 
शहरात कार, ट्रक, मिनीबस, व्यावसायिक चारचाकी वाहने सुरू आहेत. फक्त ऑटोरिक्षा बंद ठेवण्यात आले आहेत. इतर गाड्यांमध्ये कोरोना शिरत नाही फक्त ऑटोमध्येच त्याचा प्रसार होतो का? असा सवाल आमदार कृष्णा खोपडे यांनी ऑटोबंदीचा आदेश काढणाऱ्या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना केला. घरखर्च, बॅंकेचे हप्ते, इन्शुरन्स, टॅक्‍स, परमिट हे सर्व ऑटोचालकांना भरावे लागते. इतर छोट्या व्यावसायिकांचेही हाल बेहाल आहे. त्यामुळे लॉकडाउन करण्यापूर्वी सर्व घटकांचा विचार करावा, असे मत कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केले. 

कडक अंमलबजावणी सुरू 
कोविडसंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणी महापालिका प्रशासन व पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे सोमवारी बाजारपेठा जवळपास बंदच होत्या. रस्त्यावरच्या भाजीविक्रेत्यांना हुसकावून लावण्यात आले. बर्डीसारख्या वर्दळीच्या ठिकाणी दुपारी शुकशुकाट होता. सायंकाळी सातनंतर सर्व दुकाने बंद करण्यात आली. उघडपणे होणारी मद्यविक्री बंद करण्यात आली. 

गोरगरिबांचा विचार व्हावा ः आमदार दटके 
अनेकांचे हातावर पोट आहे. मध्यमवर्गीयही झळ सोसत आहेत. लॉकडाउनचा विचार करताना या घटकांचाही विचार होणे गरजेचे असल्याचे माजी महापौर व आमदार प्रवीण दटके यांनी नमूद केले. लॉकडाउनचा निर्णय पोलिस, मेडिकलचे अधिष्ठाता, व्यापारी संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करूनच घेण्यात यावा. तत्पूर्वी मनपा व पोलिस प्रशासनाने एकमेकांशी समन्वय साधावा, असेही दटके म्हणाले. 

हॉकर्स, कॅब, ऑटोचालकावर अन्याय 
हॉकर्स, कॅब, ऑटोचालकामुळे कोरोनाचा प्रसार झाला किंवा यापैकी एकाही घटकातील व्यक्तीला कोरोना झाल्याचे आढळले नाही. परंतु, मनपा प्रशासनाने त्यांच्यावर बंदी लादून त्यांना उपाशी मारण्याचा प्रकार सुरू केल्याचा आरोप हॉकर्स संघटनेचे जम्मू आनंद यांनी केला. आतापर्यंत दोन हॉकर्सने आत्महत्या केली. यापुढे कोरोनाने मरणार, परंतु उपाशी नाही, अशी भूमिका जाहीर करीत जम्मू आनंद यांनी आंदोलनाचा इशारा दिला.   (Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com